पालघर : पालघरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण तातडीने हाती घेण्यात येणार असून दरवर्षी खराब होणाऱ्या गोठणपूर परिसरातील रस्त्याच्या भागाचे काँक्रिटीकरण तातडीने हाती घेण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. यामुळे या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी व वाहन चालकांची होणारी गैरसोय कमी होण्यास मदत होणार आहे. डहाणू पारनाका ते सफाळे वरई पर्यंतच्या असणाऱ्या मुख्य राज्यमार्गचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम हायब्रीड ऍन्यूटी अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतली असून त्यासाठी १८४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. प्रत्यक्षात या कामाला सुरुवात झाली नसल्याने या राज्यमार्गाचा भागावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज ते जिल्हाधिकारी कार्यालय हे याच मुख्य राज्यमार्गावर येत असून या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे स्वतंत्र तरतूद नसल्याने सणासुदीच्या निमित्ताने या रस्त्यांची दुरुस्ती नगर परिषदेमार्फत केली जात आहे. पालघर नगर परिषदेने याकरिता आवश्यक निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याची तयारी दर्शवली होती.दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यानच्या रस्त्यावर काही ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून त्यावरून वाहन चालकाला चालणे खूप कठीण झाले आहे. या परिसरात असणाऱ्या शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय व औद्योगिक वसाहत येथील कर्मचाऱ्यांना देखील त्याची झळ बसत आहे.

या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने गोठणपूर पासून छत्रपती शिवाजी महाराज चौका दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण व काँक्रिटीकरणाचे काम तातडीने हाती घेण्याचा निश्चय केला असून हे काम हायब्रीड ऍन्यूटीच्या अंतर्गत सुरू करण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी लोकसत्ता ला दिली. हे काम पूर्ण झाल्यानंतर तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या रुंदीकरणानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे होणारी वाहतूक कोणती निवळेल अशी आशा आहे.

ऑक्टोबर महिन्यात नवली पूल होणार खुला

नवली पुलाच्या गर्डर वरील गाळ्यांचे काँक्रिटीकरण काम पूर्ण झाले असून या मार्गीके वरून लहान वाहनांना प्रवास करण्यासाठी पुढील आठ दिवसात खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसह लहान वाहन व दुचाकी यांना या मार्गावरून प्रवास करणे शक्य होणार आहे. परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुलावरील चार गाळ्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण करून त्यानंतर अवजड वाहतूक सुरू करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.