पालघर : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे हाहाकार माजला असून सततच्या पावसामुळे नद्या, नाले, धरणे तुडुंब भरली आहेत. वैतरणा, पिंजाळ आदी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर वांद्री व कुर्जे धरण पूर्णपणे भरल्यामुळे त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हवामान खात्याने १४ जुलैपर्यंत पालघर जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ दिला असून जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकण्याचा धोका लक्षात घेत ग्रामीण व दुर्गम भागातील सर्व शाळांना दुपारी दोननंतर सुट्टी देण्यात आली. पूरजन्य परिस्थितीमध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याचे जिल्हाधिकारी यांनी शिक्षण विभागाला सूचित केले.
जिल्ह्यातील धामणी धरण क्षेत्रामध्ये पाणीसाठा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सूर्या नदीमध्ये या धरणाचे पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण महाजन यांनी डहाणू पालघर व विक्रमगड तहसीलदारांना दिले आहेत.
वाडामध्ये तानसा, वैतरणा, गारगाई, पिंजाळी, देहर्जा या पाचही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तानसा नदीकाठच्या निंबवली, अकलोली कुंड, वैतरणा नदी काठच्या बोरांडा, गातेस तसेच पिंजाळ नदीच्या काठावरील पीक, मलवाडा, पाली आश्रमशाळा यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. अतिवृष्टीमुळे वाडा तालुक्यातील भातशेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे बांध वाहून गेले आहेत. तर अलीकडेच पेरणी केलेल्या भाताची रोपे कुजून गेली आहेत.
तालुक्यातील लहान, मोठे नाले ओसंडून वाहु लागले आहेत. या नाल्यांचे पाणी रस्त्यांवर आल्याने अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, गेल्या सहा दिवसांपासून झालेल्या या अतिवृष्टीत कुठेही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती वाडा तहसीलदार उद्धव कदम यांनी दिली.
जव्हार तालुक्यात संपर्क तुटला
जव्हार तालुक्यातील काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडली आहेत. सर्वत्र पाणीच पाणी असून, नदी, ओहोळ, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तालुक्याला जोडणाऱ्या धानोशी ते साकुर गावाजळील मुख्य रस्त्यावरील मोरी पाण्याखाली गेल्याने साकुर, रामिखड, कडाची मेट, पाथर्डी, डोंगर पाडा, वांगान पाडा, जंगल पाडा, मेढा, सोलेचा पाडा अशा आठ ते दहा गावांचा संपर्क तुटला आहे.
तसेच तालुक्यातील झाप, पोंढीचापाडा, वावर वांगणी, जामसर, िपपळशेत, ओझर असा अनेक भागांतील मोऱ्या, पूल बुडल्याने अनेक नागरिकांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, जव्हारला येणारे ग्रामस्थ, रुग्णांचे मोठे हाल झाले. जव्हार शहरातील यशवंतनगर येथील रहदारीच्या ठिकाणी रस्त्यालगत विद्युतवाहिनीवर झाड पडल्याने परिसरातील नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरू आहेत.
दरम्यान पावसाळय़ात पुरामध्ये जिल्ह्यातील चार जण वाहून गेले असून त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत देण्यात आली. या वेळी आमदार विनोद निकोले, आमदार श्रीनिवास वनगा, साहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, तहसीलदार अभिजीत देशमुख आदी उपस्थित होते. आतापर्यंत ३९ घरांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांना आवाहन
पालघर जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भात व नागली रोपवाटिका, भाजीपाला व नवीन फळबाग लागवड क्षेत्रातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. पिकांना देण्यात येणारी खते व कीटकनाशकांच्या फवारणीची कामे पुढे ढकलावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राने केले आहे.
धरण विसर्ग (क्यूसेक्स)
४५.३६५ वांद्री
२१ कुर्झे
नदी पातळी(मीटरमध्ये)
नदी पातळी इशारा धोका
वैतरणा १००.११ १०१.९० १०२.१०
पिंजाळ १००.२ १०२.७५ १०२.९६
मासवण सूर्या ६.०३ ११ १२.१०
