पालघर: ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन, क्रीडा क्षेत्राला नवी दिशा आणि आदिवासी तरुणांना क्रीडा क्षेत्रात व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभमुहूर्तावर पालघर जिल्ह्यासह संपूर्ण देशात ‘सांसद क्रीडा महोत्सव २०२५’ ची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

पालघरचे लोकसभा खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी या महोत्सवाची घोषणा केली आहे. ‘खेळात भारत जगातील महासत्ता बनावा’ या स्वप्नाला बळ देण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही चळवळ सुरू केली आहे. २१ सप्टेंबर पर्यंत खेळाडू ऑनलाईन नोंदणी करू शकणार असून 21 सप्टेंबर ते 25 डिसेंबर या काळात सांसद खेल महोत्सव होणार आहे. तालुकास्तरावर या स्पर्धा खेळवल्या जाणार असून त्यानंतर जिल्हास्तरावर विजेत्या वैयक्तिक व सांघिक स्पर्धकांना खेळण्याची संधी मिळणार आहे.

पालघरसारख्या आदिवासी संस्कृतीने समृद्ध असलेल्या जिल्ह्यातून या अभियानाची सुरुवात होणे, ही एक विशेष बाब आहे. हा महोत्सव शहरातील तसेच ग्रामीण भागातील, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह प्रत्येक युवा खेळाडूला आपले कौशल्य दाखवण्याची एक सुवर्णसंधी देणार असल्याचा विश्वास खासदार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. तसेच खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. खेळामुळे अनुशासन, सांघिक भावना आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना वाढते. प्रत्येक युवक खेळाशी जोडला गेल्यास, त्याचे जीवन निरोगी आणि शिस्तबद्ध होईल. याच माध्यमातून भारत क्रीडा क्षेत्रात जगाचे नेतृत्व करू शकेल असेही सांगितले.

या महोत्सवात अनेक लोकप्रिय आणि पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल, अॅथलेटिक्स (धावणे, लांब उडी, उंच उडी), कुस्ती, मॅरेथॉन, बॅडमिंटन, टेबल टेनिस, मल्लखांब, योगासन आणि पारंपरिक आदिवासी खेळांचा समावेश आहे. या स्पर्धेत अधिकाधिक खेळाडूंनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले असून २९ ऑगस्ट ते २१ सप्टेंबर पर्यंत खेळाडू आपली नोंदणी www.sansadkhelmahotsav.in या अधिकृत वेबसाइटवर करू शकतात.

त्यानंतर ऑनलाईन पासून या स्पर्धांना सुरुवात होणार असून 21 सप्टेंबर ते 25 डिसेंबर या काळात सांसद खेल महोत्सव संपन्न होणार आहे. पालघर जिल्ह्याच्या समृद्ध आदिवासी युवा शक्तीमध्ये प्रचंड ऊर्जा आणि क्षमता आहे. आगामी काळात हेच खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पालघर जिल्ह्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करतील. या महोत्सवातून अनेक नवीन प्रतिभावान खेळाडू समोर येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या महोत्सवामुळे पालघरमध्ये एक नवीन क्रीडा क्रांतीचा अध्याय सुरू झाला आहे. युवकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.