वाडा : शिर्डी वरून “नाशिक – खोडाळा” मार्गे वाड्याकडे येणाऱ्या एसटी बसचा मांडवा (परळी) येथे अपघात झाला असुन या अपघातात चालकासह १३ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत तर एक दुचाकीस्वारक गंभीर जखमी झाला आहे. या जखमींवर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

वाडा आगराची एसटी बस एमएच एन ९१६४ सकाळी ६ वाजता शिर्डी येथून सुटून ती वाड्याकडे येण्यासाठी प्रस्थान झाली होती. सुरुवातीला नाशिक येथे थांबा घेतला.

त्यानंतर सकाळी ९ वाजता नाशिक वरून- खोडाळा- परळी मार्गे वाडा येथे येत होती. ती मांडवा येथील चढाव चढल्यानंतर उतारावरून खाली येत असताना पावसाच्या रिमझिममुळे रस्त्यावर झालेल्या चिखलावर बस घसरली. यावेळी बसची गती कमी करण्यासाठी चालक दिलीप अंभोरे यांनी ब्रेक लावले असता रस्त्यावरील चिखलावर बस अधिकच सरकत गेली असल्याचे चालकाने सांगितले.

दरम्यान बस घसरत रस्त्याखाली जात असता इतक्यातच परळी दिशेकडे जाणारा भरधाव वेगाने दुचाकीस्वारक बस समोरून आल्याने त्याला वाचविण्यासाठी बस चालकाने एसटी बस दुसऱ्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र यात रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर बस धडकली. या अपघातात चालकासह ४४ प्रवाशांपैकी १३ प्रवाशी जखमी झाले आहेत.

बस अपघातातील जखमींची नावे

१) प्रशांत गणपत पवार (२१ वर्षे, कोळीमशेत),
२) सुमन प्रकाश वाघचौरे (५० वर्षे, कुडूस),
३) दरशथ गणपत थोटगे (५२ वर्षे, पाचघर)
४) गणपत चंदर झुगरे (३५ वर्षे, ओगदा) ,
५) अजय मिठाराम मिसाळ (२७ वर्षे, साई- देवळी)
६) संकेत सकरु वारे (२४ वर्षे, पोचाडे),
७) श्रेया शिवम शिंदे (२४ वर्षे, कोयना)
८) मोक्ष शिवम शिंदे (३.६ वर्षे, कोयना)
९) डी. बी. जाधव (५० वर्षे, वाडा),
१०) तेजस महाले (३८ वर्षे, वाडा),
११) निर्मला धपले (३६ वर्षे, वाडा)
१२) दिलीप अंभोरे (३० वर्षे, एसटी बस चालक)
१३) आकाश गंगोडे (५८ वर्षे, नाशिक)
१४) अनंता पाटील (६७, भोपोली)

यांच्या हात, पाय, छाती, डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. तर भरधाव वेगाने दुचाकीस्वारक रूपेश घाटाळ (२० वर्षे, मोहमाळ) हा बसच्या पाठीमागील बाजू लागल्याने तो खाली पडून जखमी झाला आहे. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक नियंत्रक रघुनाथ मिसाळ हे घटनास्थळी पोहचले. जखमींना वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करून त्यांची विचारपूस केली आहे.

मात्र एसटी प्रशासनाकडून उपचारांसाठी तातडीची आर्थिक मदत न मिळाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. अपघाताची वाडा पोलीस ठाण्यात नोंद व पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

“वाडा – परळी- खोडाळा” मार्ग बनलाय धोकादायक

“वाडा – परळी- खोडाळा” हा ३५ किमी मार्ग अरुंद जरी असला तरी तो चांगल्या स्थितीत झाल्याने या मार्गावरून वाहने भरधाव वेगाने जात असतात, या मार्गावर अनेक छोटी – मोठी वळणे आहेत. त्यामुळे तो धोकादायक बनला आहे.
या मार्गावरून समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज वाहन चालकांना बऱ्याचदा येत नसल्याने तसेच वाहनाच्या गतीवर मोठ्या वाहन चालकांची किंवा दुचाकीस्वारकांचे अनेकदा नियत्रंण राहत नसल्याने येथे मोठ्या प्रमाणावर अपघात घडत असतात. त्यामुळे याकडे प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करणे व लक्ष देणे गरजेचे आहे.