राजेश पाटील – बहुजन विकास आघाडी, पालघर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकटा खासदार जिल्ह्याचा विकास कसा करणार? प्रचाराचे मुद्दे काय?

● आमच्या अध्यक्षांनी एका मताच्या जोरावर वसई- विरारची पाणी योजना तेव्हा मंजूर करवून घेतली होती. एका मताला किंमत असते, ताकद असते. त्यामुळे एकटा खासदार म्हणून केंद्रात जाऊन जिल्ह्याच्या विकासाच्या योजना मंजूर करून आणू शकतो. आमचा पक्षच मुळात विकासाच्या मुद्द्यावर स्थापन झाला आहे. आमचे माजी खासदार बळीराम जाधव यांनी केलेली कामे आम्ही लोकांपुढे मांडत आहोत. संपूर्ण जिल्ह्याचा विकास दुर्लक्षित राहिलेले प्रश्न आणि विकासाच्या विविध योजना हा आमच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे.

जिल्ह्याच्या विकासासाठी काय योजना आहेत?

● मागील दहा वर्षांत जिल्ह्याचा विकास रखडला आहे. जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अनेक योजना आम्ही तयार केल्या आहेत. किनारपट्टीचा विकास करण्यासाठी सीआरझेडची मर्यादा उठविणे, जिल्ह्याच्या अनेक निसर्गसंपन्न भागांचा पर्यंटनस्थळ म्हणून विकास करणार, जिल्ह्यात घोडसारळ येथील पर्यंटन केंद्र विकसित करणार. जव्हार मोखाडामधील प्राणी प्रश्न अद्याप सुटलेला नाही. तो प्राधान्याने सोडविणार. रोजगारनिर्मितीसाठी रोजगार कौशल्य विकास योजना राबविणार. आयआयटीच्या जागा दुपटीने वाढविणार. कृषीविकासासाठी जिल्ह्यात कृषी विद्यापीठ स्थापन करणार. त्यामुळे आधुनिक पद्धतीने शेती करून शेतीला चालना मिळू शकणार आहे. बोईसर आणि वसईचे उद्याोग क्षेत्र बाहेर जाऊ नये यासाठी महावितराणाचे तीन फेज बसविणे, भारनियमाचे नियोजन करून पायाभूत सुविधा विकसित करण्याचा प्रयत्न असेल. जिल्ह्यात १२ टक्के सिंचन क्षेत्र असून ते वाढविण्यावर भर असेल.

हेही वाचा >>> डॉ. हेमंत सवरा यांना पालघरमधून भाजपाचे तिकीट

प्रस्तावित वाढवण बंदराबाबत आपली भूमिका काय आहे?

● डहाणूमधील प्रस्तावित वाढवण बंदराला आम्ही सर्वात आधीपासून विरोध केला आहे. यासाठी आम्ही सदैव नागरिकांच्या बाजूने आहोत. स्थानिक नागरिक, मच्छीमार, शेतकरी यांचे नुकसान करणारे बंदर होऊ नये अशीच आमची भूमिका आहे.

मतदारसंघाची व्याप्ती मोठी असल्याने प्रचार कसा सुरू आहे?

● मुळात मी आमदार असताना मागील साडेचार वर्षांत जिल्हा पिंजून काढला आहे. विविध विकास कामांच्या माध्यमातून जनसंपर्क तयार झालेला आहे. कार्यकर्त्यांची मोठी फळी असल्याने नियोजनबद्ध प्रचार सुरू आहे. गेल्या काही वर्षांत पक्षाचा संपूर्ण जिल्ह्यात विस्तार झाला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये बहुजन विकास आघाडीचे सदस्य असून जिल्ह्यात सर्वाधिक सरपंच हे आमच्या पक्षाचे आहेत. जिल्ह्याच्या सहकार, कृषी, सामाजिक, शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यात पक्षाचे जाळे पसरले आहेत. त्यामुळे परिस्थिती बदलली असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर मतदान होईल.

(मुलाखत: सुहास बिऱ्हाडे)

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suhas birhade interview bahujan vikas aghadi palghar candidate rajesh patil zws
Show comments