बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यामध्ये वायु गळतीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली. प्लॉट क्रमांक टी-१५० वरील आरती ड्रग्स लिमिटेड या कारखान्यातून संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास वायुगळती झाल्यामुळे परिसरातील सालवड शिवाजीनगर येथील नागरिकांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली.

कारखान्यात उत्पादन प्रक्रिया सुरू असताना हायड्रोक्लोरिक आम्ल बाहेर पडून हवेमध्ये पसरल्यामुळे नागरिकांना डोळे चुरचुरणे आणि घसा खवखवणे सारखे त्रास सुरू झाले. वायुगळती सुरू झाल्यानंतर कंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी तात्काळ उपाययोजना आखून वायू गळतीवर नियंत्रण मिळवले. मात्र या वायुगळतीमुळे शिवाजीनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरून अनेक नागरिकांनी घरातून बाहेर पळ काढला.

कारखान्यामध्ये वायू गळती झाल्याची खबर मिळताच तारापूर अग्निशमन दल आणि बोईसर पोलीस घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणली. मागील वर्षी याच कारखान्यात ब्रोमीन नावाच्या वायूची गळती झाली होती. आरती ड्रग्स या कारखान्यात वारंवार वायू गळतीच्या घटना घडत असल्यामुळे शिवाजीनगर मधील नागरिकांनी संतप्त होऊन पोलिसांना घेराव घातला व कारखाना बंद करण्याची मागणी केली.