प्रदूषण, वाळू उपशाचा फटका; पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागात येणाऱ्या कासवांची संख्या नगण्य
कुणाल लाडे, लोकसत्ता
डहाणू : किनारपट्टीवरील प्रदूषण, वाळू उपसा आणि वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे प्रजनन काळात कासवांनी डहाणू समुद्रकिनाऱ्याकडे पाठ फिरवली आहे. कोंकण किनारपट्टीवर सागरी कासवांच्या विणीचा हंगाम सुरू झाला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग या जिल्ह्यांमधील काही किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले प्रजातीची मादी कासवे अंडी घालण्यासाठी आल्याचे दिसून येत आहे. फेब्रुवारी ते मार्च महिना हा कासवांच्या विणीचा हंगाम असल्यामुळे या काळात प्रजननासाठी समुद्रकिनाऱ्यावर येत असतात. त्यातुलनेत पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागात येणाऱ्या कासवांची संख्या अगदीच कमी असल्याची माहिती मिळते. साधारण २० ते २५ वर्षांपूर्वी डहाणू तालुक्यातील चिंचणी ते झाईदरम्यान साधारण ३५ किलोमीटरच्या समुद्रकिनाऱ्यावर कासवे अंडी देण्यासाठी येत. मात्र आता येथे येणाऱ्या कासवांचे प्रमाण अत्यल्प झाले असून चुकून एखादे कासव येथे आल्याचे पाहायला मिळते.
या कासवाचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणी हे कासव अंडी देण्यासाठी येते हा या कासवाचा नैसर्गिक गुणधर्म आहे. अभ्यासकांच्या मते कासवांची डहाणूकडे विणीसाठी येण्याची शक्यता नाकारता येत नाही; परंतु अशा वेळेस किनाऱ्यावरील परिस्थिती अनुकूल असल्याची गरज आहे.
दरम्यान, शनिवार, ११ मार्च रोजी डहाणू तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीचे मादी कासव मृत अवस्थेत आढळून आले होते. या कासवाच्या पोटात अंडी असल्यामुळे ते अंडी देण्यासाठी किनाऱ्यावर आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र अंडी देण्यासाठी किनाऱ्यावर आलेल्या कासवाचा मृत्यू नेमका कसा झाला असावा याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
कारणे काय?
किनारपट्टी भागात गेल्या काही वर्षांत समुद्रकिनाऱ्यावरील वस्त्या, किनाऱ्यालगत वाहनांची वर्दळ, प्रकाशदिवे, पहाटे आणि रात्रीच्या वेळी किनाऱ्यावर माणसांचा वावर, कासवांच्या घरांसाठी आवश्यक असलेल्या वाळूचा उपसा ही कारणे असल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. किनाऱ्यावर अंडी देण्यासाठी येणाऱ्या कासवांना किनाऱ्यावर अनैसर्गिक हालचाली जाणवल्यास ही कासवे किनाऱ्यावर येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रजनन प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. यावर उपाय म्हणून कासवांच्या प्रजननासाठी अनुकूल असलेला किनारपट्टी भाग सुरक्षित करण्याची गरज अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
महत्त्व ऑलिव्ह रिडले हे कासव समुद्रातील खेकडा, झिंगा व तत्सम जीवांसह शेवाळ आणि इतर पदार्थ खाते. त्यामुळे समुद्रातील जीवांची अन्नसाखळी सुरळीत होण्यास मदत होते व समुद्राचा समतोल राखला जातो.