१७ सप्टेंबर रोजी रात्री पावणेआठ वाजल्याच्या सुमारास मुंबईकडून वलसाडकडे जाणाऱ्या वलसाड फास्ट पॅसेंजर केळवे रोड स्थानकात उभी असताना इंजिनला आग लागल्याने पश्चिम रेल्वे सेवा अडीच तास खोळंबली होती. दुर्गम स्थानकात अग्निशमन व्यवस्था पोहोचल्यास व प्रभावीपणे काम करण्यास अनेक अडचणीचा सामना केल्यानंतर इंजिनला लागलेली आग आटोक्यात आली. पश्चिम रेल्वे विरार ते डहाणू रोड दरम्यान चौपदरीकरण करत असताना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी असणाऱ्या व्यवस्थेवर गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
धावत्या गाडीत इंजिनमध्ये आग लागण्याचा प्रकार घडला असता तर कदाचित ही आग मागील डब्यांमध्ये पसरण्याची शक्यता होती. सफाळे रेल्वे स्थानकापर्यंत या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असल्याने हा प्रकार विरार ते केळवे दरम्यान कोणत्याही ठिकाणी घडला असता तर पश्चिम रेल्वेला आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम करावे लागले असते. विशेष म्हणजे या भागात अनेक नद्या व खाद्यांवर पुल असून अशा ठिकाणी अग्निशमन व्यवस्था पोहोचवण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नाही. शिवाय आग लागल्यानंतर इंजिनमध्ये असणारे आग विझवण्याचे अग्निशामक यंत्र लागलेल्या आगीला नियंत्रणात ठेवण्यास अपयशी ठरल्याचे प्रवाशांनी काढलेल्या व्हिडिओवरून दिसून आले. इतर गाड्यांमध्ये देखील इंजिनच्या लगत असणाऱ्या सामान्य डब्यांमध्ये इतर डब्यांपेक्षा अधिक प्रवासी संख्या असल्याने इतर गाड्यामध्ये देखील अशा आगीच्या प्रकारांची पुनरावृत्ती झाली तर धोकादायक ठरणारी बाब आहे.
केळवे रोड येथे गाडी थांबून दोन्ही दिशेचा विद्युत पुरवठा (पावर सप्लाय) खंडित केल्यानंतर फलाटावर असणारी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आग विझवण्याच्याकामी उपयुक्त ठरली नाही. विशेष म्हणजे उच्च दाबाने इंजिन जवळ किंवा फलाटावर काही ठिकाणी पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था विरार ते डहाणू रोड दरम्यानचे उपनगरीय क्षेत्रातील कोणत्याही फलाटांवर उपलब्ध नसल्याने आगीच्या आपत्कालीन परिस्थितीत विरार, पालघर, तारापूर व बोईसर येथील अग्निशमन व्यवस्थेवर अवलंबून राहणे गरजेचे होत आहे.
सध्या पश्चिम रेल्वेचे चौपदरीकरण केळवे रोड व पालघर पर्यंत पोहोचले असून त्या ठिकाणी असणारा मातीचा भराव व सुरू असलेल्या बांधकामामुळे फलाटा जवळ अग्निशमन यंत्रणा अथवा रुग्णवाहिका पोचण्यासाठी मार्गीकांची आखणी झालेली नाही. त्यामुळे क्षमता विस्तार प्रकल्प हाती घेताना आपत्कालीन व्यवस्था हाताळण्यासाठी हंगामी व कायमस्वरूपी यंत्रणा कार्यान्वित नसल्याने नियोजनातील कच्चे दुवे समोर आले आहेत. शिवाय अजूनही या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने चिखलमय खड्डेयुक्त परिस्थितीत वजन असणारे अग्निशमन वाहन पोहोचवणे व आवश्यकतेनुसार त्याचा उपयोग व्हावा या दृष्टीने पोषक परिस्थिती नसल्याचे दिसून आले आहे.
पालघर, बोईसर या गर्दीच्या प्रमुख स्थानकांसह इतर स्थानकांच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे रिक्षा, खाजगी वाहन, खाजगी दुचाकी व रेल्वे कर्मचाऱ्यांची वाहना राजरोसपणे पार्किंग केली जात असतात. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुख्य रस्त्यापासून रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचणारे रस्ते अरुंद असल्याने अग्निशमन व्यवस्था दुर्घटना स्थळापर्यंत पोहोचण्यास अडचणी येण्याची शक्यता आहे. चौपदरीकरण प्रकल्प राबविताना आपत्कालीन मार्गीका निश्चित करणे व त्या ठिकाणी अतिक्रमण अथवा बेकायदेशीर पार्किंग होणार नाही यासाठी रेल्वे प्रशासनाने खंबीर राहणे आवश्यक आहे.
रेल्वेमध्ये उद्भवणारी आग ही बहुतांश वेळा विद्युत प्रकाराची असते. त्यामुळे सर्वसामान्य जळाळू पदार्थ व ज्वलनशील पदार्थांना लागणाऱ्या आगीपेक्षा अशा आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी माती, रेती व इतर अग्निशमन यंत्रांची मुबलक प्रमाणात उपलब्धता असणे आवश्यक आहे. पूर्वी रेल्वे फलाटावर दिसणारे मातीच्या बादल्या भरलेले स्टॅन्ड गेल्या काही वर्षांपासून दिसेनासे अथवा अडगळीत पडल्याचे दिसून आल्याने यापूर्वी विद्युत केबल मध्ये लागलेली आगीवर नियंत्रण ठेवण्यास व कंट्रोल रूम अथवा इतर उपकरणांची हानी टाळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणे आवश्यक झाले आहे.
केळवे रोड परिसरात वलसाड फास्ट पॅसेंजर थांबवून ठेवल्यानंतर प्रवाशांना खानपानाची व्यवस्था अत्यंत तोटक होतील. अशीच परिस्थिती अनेक लहान रेल्वे स्थानकांवर दिसून येत असून अपघात अथवा इतर आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी अशा फलाटांवर प्रवासी गाडी थांबून ठेवल्यास प्रवाशांचे हाल होताना दिसून आले आहेत.
अपघात झाल्यानंतर तो पूर्ववत होण्यासाठी अंदाजे किती वेळ लागेल हे स्थानिक पातळीवरून प्राथमिकरित्या सांगणे कठीण होत असल्याने अशा आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बस, खाजगी सेवा किंवा अन्य व्यवस्था करण्यासाठी यंत्रणेच्या मर्यादा स्पष्ट होत आहेत. शिवाय प्रत्येक रेल्वे स्थानकात प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक सहजगत उपलब्ध नसल्याने आपत्कालीन यंत्रणेपर्यंत पोहोचण्यास विलंब लागत असल्याचे गेल्या काही महिन्यात घडलेल्या अपघातांवरून स्पष्ट होत आहे.
रेल्वे प्रशासनाने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीबाबत अनेकदा धडे दिले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल विभाग, तालुका व जिल्हा प्रशासन यांच्याशी संपर्क व समन्वय साधण्यासाठी एकत्रित मॉकटेल सारखे उपक्रम नियमित राबविणे आवश्यक झाले आहे. एकीकडे रेल्वेने समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग कार्यान्वित केला असून त्या माध्यमातून होणाऱ्या मालवाहतुकीला आग लागली किंवा अन्य परिस्थिती उद्भवल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्थेची आखणी करणे गरजेचे आहे.
या भागात होणाऱ्या नागरीकरणामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी रेल्वे फलाटांवर असणारे प्रवेश मार्ग, त्यालगत होणारी वाहनांची पार्किंग, आपत्कालीन परस्थितीत एकत्र येण्याचे ठिकाण निश्चित करणे, पर्यायी वाहतूक सुविधा उपलब्ध करणे, आवश्यकता भासल्यास कमी वेळेत फलाट परिसर मोकळा करण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. शिवाय रेल्वेच्या समांतर रस्त्यांची उभारणी करणे व त्याद्वारे कोणतीही गाडी दोन स्थानकां दरम्यान थांबल्यास त्या ठिकाणापर्यंत मदत कार्य पोहोचवणे याची देखील रेल्वेने आखणी करणे गरजेचे आहे. केळवे रोड येथील इंजिनला लागलेल्या आगीच्या प्रसंगा मधून रेल्वे प्रशासनाला आपत्कालीन परिस्थिती हाताळने संदर्भात गंभीर इशारा मिळाला असून जीवितहानी टाळण्यासाठी तसेच रेल्वेच्या मालमत्तेचे किमान नुकसान व्हावे या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने ठोस व्यवस्था उभारणे व उपलब्ध स्थानिक व्यवस्थेसोबत समन्वय व संपर्क ठेवणे गरजेचे झाले आहे.