-
मुंबईमध्ये सोमवारी झालेल्या वादळामुळे आणि अवकाळी पावसाने अवघ्या मुंबईकरांची दाणादाण उडाली. तसेच घाटकोपरमध्ये एक भलेमोठे होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला. तर ८५ जण या घटनेत जखमी झाले आहेत.
-
या घाटकोपर दुर्घटनेतील होर्डिंग कंपनीचे मालक भावेश भिंडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच भावेश भिंडे बेपत्ता झाल्याची माहिती सांगितली जात आहे. यानंतर भाजपाचे नेते राम कदम यांनी भावेश भिंडे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो एक्सवर शेअर करत टीका केली.
-
तसेच किरीट सोमय्या यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. आता या होर्डिंगच्या घटनेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांची बाजू घेतली आहे.
-
“सरकार आमचं, महापालिका आमची, मग उद्धव ठाकरे यांचा काय संबंध?”, असा सवाल भुजबळांनी भाजपाच्या नेत्यांना केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
-
छगन भुजबळ काय म्हणाले?
“घाटकोपरमध्ये काल जी होर्डिंगची घडना घडली, त्यामध्ये दुर्देवी मृत्यू झाले. वांद्रा येथून सांताक्रुज जात असताना मोठमोठे होर्डिंग लावलेले आहेत. अनेक ठिकाणी तर ते रस्त्याच्या मध्येही आलेले आहेत.” -
“त्याचे वजन मोठ्या प्रमाणात असते. त्यातील काही बेकायदेशीर असतात. याबाबत तक्रारीही दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे या सर्व होर्डिंगची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माझी आहे. ही चौकशी महानगरपालिकांनी केली पाहिजे”, असं मत छगन भुजबळ यांनी मांडलं.
-
“असा प्रकारचे होर्डिंग असले की काही सांगतात बेकायदेशीर आहे, नोटीस दिलेली आहे. पण बेकायदेशीर असतील तर वेळ न लावता लगेच कारवाई झाली पाहिजे. लोकांचा मृत्यू झाल्यानंतर हे धाव घेतात. आता त्या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यामध्ये त्यांचा काय दोष? तेथून जाणाऱ्या लोकांचा काय गुन्हा आहे? यानंतर सरकार मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना पाच-पाच लाख देईल, पण म्हणजे सगळं संपलं का? आता तरी सर्व होर्डिंगची चौकशी झाली पाहिजे”, असं भुजबळ म्हणाले.
-
भुजबळांनी घेतली ठाकरेंची बाजू
“आता सरकार आमचं, महापालिका आमचीच, मग उद्धव ठाकरेंचा काय संबंध? जे व्यापारी लोकं असतात ते आमच्याकडे येत असतात. फोटो काढत असतात. आता माझ्याकडे अनेकजण येतात आणि फोटो काढतात. ते कोण आहे हे देखील लक्षात येत नाही. आल्यानंतर आपण त्यांना फोटो काढायला नाही कसे म्हणणार? त्यामुळे फोटोवरून काही तर्क काढणे हे योग्य नाही”, असं छगन भुजबळ यावेळी म्हणाले.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : उद्धव ठाकरे आणि व्यावसायिक भावेश भिंडेच्या फोटोवरून छगन भुजबळ म्हणाले, “ही चौकशी…”
होर्डिंगच्या घटनेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे (All Photos- Chhagan Bhujbal/facebook Page)
Web Title: Chhagan bhujbal on ghatkopar hoarding incident latest statement on uddhav thackeray spl