-
उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानीचं लग्न अवघ्या काही दिवसांवर बाकी आहे. १२ जुलैला अनंत अंबानी राधिका मर्चंट हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे सध्या अनंत-राधिकाच्या लग्नाची जोरदार तयारी असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
अनंत-राधिकाच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. २ जुलैला अंबानींनी लेकाच्या लग्नाआधी ५० गरीब जोडप्यांचं लग्न मोठ्या थाटामाटात, पारंपरिक पद्धतीने लावून दिले.
-
२ जुलैला सायंकाळी ४.३० वाजता पालघर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे हा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सामूहिक विवाह सोहळ्याला स्वतः मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी, श्लोका अंबानी, ईशा अंबानी, आनंद पिरामल उपस्थित होते. या सगळ्यांनी ५० गरीब जोडप्यांना भेटवस्तू आणि आशीर्वाद दिले.
-
अंबानी कुटुंबाने प्रत्येक जोडप्याला मंगळसूत्र, कानातले, नथ, अंगठी असे सोन्या-चांदीचे दागिने दिले. तसेच प्रत्येक जोडप्याला १ लाख १ हजाराचा चेक दिला. याशिवाय वर्षभरासाठी पुरेसा असा किराणा सामान, घरगुती वस्तू प्रत्येक जोडप्याला दिल्या; ज्यामध्ये भांडी, गॅस, मिक्सर, गादी, उशा इत्यादी ३६ प्रकारच्या जीवनावश्क वस्तू अंबानी कुटुंबाकडून देण्यात आल्या.
-
या सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थित असलेल्या पाहुण्यांसाठी भव्य भोजन सोहळा आयोजन करण्यात आला होता.
-
सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या एका जोडप्याने ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी जोडपे अनुभव सांगताना भारावून गेल्याचे पाहायला मिळाले.
-
नव वर म्हणाले, “आम्ही इतके आनंदी आहोत. कारण आम्ही हे स्वप्नात पण पाहिले नव्हते. इतक्या मोठ्या माणसाचा आम्हाला आशीर्वाद मिळेल. याची अजिबात कल्पनाही केली नव्हती. मी खूप आनंदी आहे.”
-
तर नववधू म्हणाली, “मी माझा आनंद शब्दात सांगूच शकत नाही. त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला. आमच्याबरोबर संवाद साधला. त्यांनी आमचं लग्न करून दिलं हे स्वप्नवत आहे. ते देवासारखे आहेत.”
-
दरम्यान, १२ जुलैला अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचं हिंदू पद्धतीनं लग्न होणार आहे. त्यानंतर १३ जुलैला शुभ आशीर्वादाचा कार्यक्रम होणार असून १४ जुलैला मोठा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या लग्नसोहळ्यात बॉलीवूड सेलिब्रिटींसह दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. (सर्व फोटो सौजन्य- अंबानी अपडेट इन्स्टाग्राम पेज आणि एएनआय वृत्तसंस्था)
Photos: “आम्ही स्वप्नात पण पाहिले नव्हते”, अंबानींनी लावून दिलेले लग्न पाहून भारावून गेले नवविवाहित जोडपे, म्हणाले, “देवासारखे…”
Anant Ambani-Radhika Merchant Wedding: पालघर येथे पार पडलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यातील खास क्षण
Web Title: Mukesh ambani and nita ambani organised mass wedding of the underprivileged being a newly married couple reaction pps