रोजच्या अन्याय व शोषणापासून मी व माझी आई आज खऱ्या अर्थाने मुक्त झालो आहोत. माझा भाऊ रोहित आमच्यासाठी ज्या सन्मानजनक जीवनाची आकांक्षा बाळगायचा त्याची आज सुरुवात होत आहे. रोहितने डॉ. आंबेडकरांच्या विचारांची ओळख आम्हाला करून दिली होती, ब्राह्मण्यवादी विचारसरणीच्या लोकांकडून त्याच्यावर करण्यात आलेल्या अन्यायामुळेच आम्ही बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असल्याची भावना गुरुवारी राजा वेमुला याने व्यक्त केली. राजा वेमुला हा हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील आत्महत्या केलेला बुद्धिमान दलित विद्यार्थी रोहित वेमुला याचा भाऊ आहे. राजा याने आई राधिका वेमुलासह गुरुवारी दादर येथील आंबेडकर भवनात झालेल्या धम्म दीक्षेच्या कार्यक्रमात हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यावेळी त्याने बौद्ध धर्माच्या स्वीकारामागील वेमुला कुटुंबाची भूमिका मांडली. डॉ. आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीचे विचार मांडले होते. त्याची अनुभूती वेमुला कुटुंबाच्या धर्मातरामुळे येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वंशश्रेष्ठत्वाची विचारसरणी जनमानसावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, सामान्य माणसानेच लोकशाही हवी की फॅसिस्ट विचार हवेत, याचा विचार करण्याची गरज आहे. – अॅड. प्रकाश आंबेडकर,अध्यक्ष , भारिप बहुजन महासंघ -
रोहित वेमुलाच्या आत्महत्येमुळे देशातील राजकारण व समाजकारण ढवळून निघाले. पीएच.डी. करत असलेल्या रोहितचा विद्यार्थी संघटनांच्या राजकीय संघर्षांतील सहभाग होता. रोहितच्या ठाम राजकीय मतांमुळे तसेच तो दलित असल्यानेच त्याचे मानसिक व आर्थिक खच्चीकरण केले गेल्याने त्याला आत्महत्या करावी लागली, असा आरोप करण्यात येत आहे.
-
रोहितच्या आत्महत्येनंतर झालेल्या गदारोळात तो दलितच नाही, असाही प्रचार करण्यात येत होता. याविषयी बोलताना राजा वेमुला याने सांगितले की, नोव्हेंबर महिन्यामध्ये रोहित घरी आला होता. त्यावेळी त्याच्याशी बोलताना त्याच्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव पडल्याचे जाणवत होते. आपल्या कुटुंबाने बौद्ध धर्म स्वीकारावा यासाठी तो उत्सुक होता. परंतु, त्यावेळी आम्हाला याचे मूल्य कळाले नाही. तो गेल्यावर मात्र अनुभवलेल्या समाजवास्तवामुळे आमचे डोळे उघडले. जातीव्यवस्थेमुळे होत असलेल्या अन्यायाला कंटाळूनच आम्ही जातीमुक्त बौद्ध धर्माचा स्वीकार केला असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.
-
रोहितच्या आत्महत्येबाबत सध्या तेलंगणा राज्य सरकारकडून नेमलेल्या एक सदस्यीय चौकशी समितीच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत कुलगुरू आप्पाराव पोडेलू यांच्यावर अजून कोणतीही कारवाई करण्यात न आल्याबद्दल त्याने केंद्र सरकारवर टीकाही केली.
रोहित वेमुलाच्या कुटुंबाचे धर्मांतर
Web Title: On ambedkars birth anniversary rohith vemulas mother brother embrace buddhism