-
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील सीमा सुरक्षा दलाचे जवान अमित साहेबराव पाटील यांना १६ डिसेंबरला जम्मूमधील पूंछ भागात वीरगती प्राप्त झाली.
-
'वीर जवान अमित पाटील अमर रहे' च्या जयघोषात सीमा सुरक्षा दलाच्या 183 बटालियन मध्ये कार्यरत असलेले जवान अमित पाटील यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
-
दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी त्यांच्या जळगावातील मूळगावी वाकडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
-
शोकाकुल वातावरणात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
-
सर्वात आधी वीर जवान अमित पाटील यांच्या पार्थिवास सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले.
-
त्यानंतर आमदार सर्वश्री गिरीश महाजन, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, उप विभागीय अधिकारी श्री साताळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री कातकडे, तहसिलदार श्री मोरे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
-
तत्पूर्वी सकाळी नऊ वाजता अमित यांचे पार्थिव घरी आणण्यात आले होते.
-
कुटुंबीय आणि नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतले.
-
त्यानंतर फुलांनी सजवलेल्या वाहनातून शोकाकूल वातावरणात अंत्ययात्रा काढण्यात आली.
-
अंत्ययात्रेच्या पुढे तिरंगा धरून तरूण पुढे चालत होते.
-
वाकडी गाव व परिसरातून अंत्ययात्रा मोकळ्या मैदानात आली.
-
त्यानंतर त्यांना पोलिस दल व सीमा सुरक्षा दलातर्फे हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
-
त्यानंतर त्यांच्या पार्थिवास त्यांचे लहान बंधू यांनी अग्नी दिला.
-
वीर जवान अमित पाटील यांच्यामागे वडील साहेबराव पाटील, आई सकुबाई पाटील, पत्नी वैशाली, एक मुलगा, एक मुलगी, एक बहिण, एक भाऊ असा परिवार आहे.
-
यावेळी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी वाय. एन. वाळेकर, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे प्रतिनिधी श्री वाकडे यांच्यासह पाटील कुटुंबीय व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
‘वीर जवान अमित पाटील अमर रहे’, महाराष्ट्राच्या सुपुत्रावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
१६ डिसेंबरला जम्मूमधील पूंछ भागात अमित पाटील यांना वीरगती प्राप्त झाली.
Web Title: Matryr amit patil final cremation ceremony sgy