-
फेसबुकनं तंत्रज्ञानाच्या वापरातील नैतिकतेबाबत उपस्थित होत असलेले प्रश्न आणि त्यातील वाढते धोके लक्षात घेऊन ‘ऑटो फेस रिकॉग्निशन’ बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं. मात्र, याला मागील काळात फेसबुकवर झालेल्या अनेक गंभीर आरोपांचीही पार्श्वभूमी आहे.
-
नुकतेच फेसबुकच्या माजी कर्मचाऱ्याने फेसबुकचा डेटा लीक करत फेसबुकवर गंभीर आरोप केलेत. त्यामुळे अनेक देशांमधील सरकारांकडून फेसबुकवरील नियंत्रणावर पुन्हा विचार सुरू झालाय. या पार्श्वभूमीवर फेसबुकवर प्रचंड दबाव वाढला आहे.
-
त्यातच ऑटो फेस रिकॉग्निशनमुळे अनेकांनी खासगीपणाचा (Privacy) भंग होत असल्याचाही आरोप केला. तसेच यामुळे हेरगिरी आणि पाळत ठेवण्याचा धोका वाढल्याचंही टीकाकारांचं म्हणणं होतं. त्यामुळेच एकूणच तंत्रज्ञानाचा वापर करताना नैतिकता ठेवण्याच्या आग्रहापोटी फेसबुकने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातंय.
-
ऑटो फेस रिकॉग्निशन तंत्रज्ञान दुकानं, व्यावसायिक ठिकाणं आणि रुग्णालयांमध्ये सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. मात्र, हे तंत्रज्ञान वापरल्यास खासगीपणाचा भंग, अल्पसंख्यांकांना लक्ष्य करणं आणि पाळतीसाठी घुसखोरीचं सामान्यीकरण होईल, असा आरोप टीकाकार करतात.
-
फेसबुकने ऑटो फेस रिकॉग्निशन तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली. यानंतर फेसबुकवरील फोटोज आणि व्हिडीओमध्ये आपोआप टॅगिंग सुरू झालं. हा अनुभव वापरकर्त्यांसाठी नवा होता. त्यामुळे सुरुवातीला अनेक वापरकर्त्यांनी फोटो आणि व्हिडीओत स्वतःला आपोआप टॅग करून घेण्यासाठी हे फिचर वापरण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक डेटा वापरण्याची फेसबुकला परवानगी दिली.
-
फेसबुकवर कोणताही फोटो किंवा व्हिडीओ अपलोड झाला की हे तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेनं त्या फोटोत किंवा व्हिडीओत जी व्यक्ती आहे त्याच्या चेहऱ्याची ओळख करायचं. यानंतर त्या व्यक्तींना टॅग करण्याबाबतचे नोटिफिकेशन जायचे. मात्र, आता हे टॅगिंग आणि नोटिफिकेशन जाणं बंद होणार आहे.
-
फेसबुकच्या या निर्णयानंतर आता ज्या वापरकर्त्यांनी आधी ऑटो फेस रिकॉग्निशनलला परवानगी दिली होती होती त्यांचंही आपोआप टॅगिंग बंद होणार आहे. याशिवाय यापूर्वी ऑटो फेस रिकॉग्निशनसाठी गोळा करण्यात आलेल्या चेहऱ्यांचा कोट्यावधी लोकांचा डेटा देखील फेसबूक डिलीट करणार आहे.
-
फेसबुकनं वेगवेगळ्या वापरकर्त्यांच्या चेहऱ्यांची ओळख पटावी म्हणून त्यांचे अनेक फोटो आपल्या कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी वापरत स्टोअर केले होते. १ बिलियनपेक्षा अधिक असलेले हे सर्व फोटो टेम्पलेट आता काढून टाकण्यात येतील.
-
ज्यांना दिसत नाही त्यांना फोटो किंवा व्हिडीओची माहिती पोहचवण्यासाठी तयार करण्यात आलेले ‘ऑटो अल्ट टेक्स टूल’ देखील यापुढे ऑटो फेस रिकॉग्निशनचा वापर करणार नाहीये. यामुळे फोटोंची माहिती साठवताना त्या व्यक्तीच्या नावाचा समावेश फोटोच्या अल्ट टेक्स्टमध्ये होणार नाही.
-
असं असलं तरी दिव्यांग वापरकर्त्यांच्या सोयीसाठी ‘ऑटो अल्ट टेक्स टूल’ वापरता असेल. केवळ त्यात फोटोच्या ओळखीसाठी वापरलं जाणारं ऑटो रिकॉग्निशन तंत्रज्ञान बंद केलं जाईल.
-
ऑटो फेस रिकॉग्निशन तंत्रज्ञानाचा वापर केवळ वापरकर्त्यांना फेसबुक वापरताना मदतीसाठी केला जाईल. यात लॉगिन करताना, अकाऊंट लॉक किंवा अनलॉक करताना ओळख पटवण्यासाठी हा वापर होणार आहे.
Photos : फेसुबकचा ‘ऑटो फेस रिकॉग्निशन’ बंद करण्याचा निर्णय का? वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? वाचा…
फेसुबकनं ‘ऑटो फेस रिकॉग्निशन’ बंद करण्याचा निर्णय घेतलाय. यामागील कारणांचा आणि यानंतर वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार याचा आढावा.
Web Title: Know why facebook stop face recognition and its effect on users pbs