-
पुण्यातील कृषी महाविद्यालय येथे गोधन २०२२ देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
-
यावेळी अजित पवारांनी तेथील सर्व स्टॉल आणि गोठ्यांना भेट देऊन पाहणी केली.
-
अजित पवारांनी राजकारणात येण्यापूर्वी शेती आणि दूध उत्पादक म्हणून काम केल्याचं अनेकवेळा भाषणातून सांगितलं आहे. आज त्याची प्रचिती येथील अधिकारी वर्गाला पाहण्यास मिळाली.
-
अजित पवार कार्यक्रमाच्या ठिकाणी येताच तडक एका गोठ्याजवळ गेले.
-
तेथील आतील जमीनीचा स्तर समांतर नव्हता. अनेक ठिकाणचे बांबू तुटलेले होते. हे पाहून अजित पवारांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
-
“अरे काय केलंय, तुम्ही मला सांगा एवढं लागत (निधी) आहे, पुरवण्या मागण्यांमध्ये करून देतो,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
-
“तुम्ही अधिकार्यांनी मला बोलवताना दहावेळा विचार करा. मी तुमचा पंचनामा करेन की कौतुक करेन,” अशा शब्दांत अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं.
-
“माझा काटेवाडीचा आणि बारामतीचादेखील गोठा येऊन पहा. आवड पाहिजे, आवड असल्याशिवाय काही होत नाही,” असं म्हणत अजित पवारांनी अधिकारी वर्गाची कानउघाडणी केली.
-
यावेळी मागील ४० वर्षांपासून मुरघास प्रकल्प यंत्रावर चारा कापण्याचं काम करणाऱ्या छबूबाई कामठे यांच्यासह अन्य तीन महिला या प्रदर्शनाच्या ठिकाणी होत्या.
-
त्या सकाळी सात वाजल्यापासून त्यांच्या प्रकल्पाजवळ उभ्या होत्या.
-
अजित पवार त्यांच्या प्रकल्पाजवळ आल्यावर तेथील महिलांनी फोटोचा आग्रह धरला.
-
त्यावर अजित पवार कुठल्या तुम्ही, आज एकदम नटून थटून आलात, हातावर मेहंदी पण काढली असे म्हणताच उपस्थितामध्ये एकच हशा पिकला.
-
अजित पवारांनी यावेळी त्यांच्या शेजारी उभ्या छबूबाई कामठेंची चौकशी केली. यावेळी त्यांनी “दादा मी सासवड येथील असून ४० वर्षापासून काम करते आणि मला ४० हजार पगार आहे,” अशी माहिती दिली. यावर अजित पवारांनी आश्चर्य व्यक्त करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. यानंतर अजित पवारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पुढील स्टॉलकडे गेले.
-
अजित पवारांनी यावेळी शेणापासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तींसह अन्य वस्तू तयार केलेल्या स्टॉलला भेट दिली.
-
त्यावेळी गणपतीची मूर्ती पाहून अरे असे नको, त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातात असं म्हणत त्यांनी इतर वस्तूंची माहिती जाणून घेतली.
-
त्यानंतर तिथे असलेल्या दोन तरुणींकडे अजित पवारांनी विचापसू केली. “तू कुठली, तुम्हाला मेरिटवर प्रवेश मिळाला का? अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर त्यांनी ‘हो दादा मेरिटवर प्रवेश मिळाला’ असल्याचं सांगितलं.
-
साक्षी खटके हिने ९८.१० आणि सायली देशमुखने ९९.१० टक्के मिळाल्याचं सांगितलं.
-
दोघींचे गुण ऐकल्यानंतर अजित पवारांनी हात जोडत अवघडच आहे असं म्हणत शुभेच्छा देऊन पुढील स्टॉलकडे गेले.
-
त्यानंतर अजित पवारांनी भाषणावेळी साक्षी खटके आणि सायली देशमुख या दोघींच्या गुणांचा संदर्भ देत सांगितलं की, “इथल्या मुली हुशार आहेत. ९८ टक्के मार्क आहेत. आमचे दोन वर्षाचे मार्क एकत्र केले, तरी ९८ टक्के होणार नाहीत”. अजित पवारांचं हे वक्तव्य ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
-
पुढे ते म्हणाले की, “मी दुधाचा व्यवसाय केला आहे. गायींची खरेदी- विक्री करायला आम्ही जायचो. गाडीत गाय घेऊन जायचो. वेळ झाला की विहीर बघून गायीला पाणी पाजणं, चारा घालणं हे काम आम्ही केलं आहे. त्यामुळे यातले बारकावे आम्हाला माहित आहेत”.
-
“शेतकरी गोवंशाबद्दल हळवा असतो आणि कृतज्ञदेखील असतो. वेगवेगळे गोवंश टिकले पाहिजेत. पण काहीजण या सगळ्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत,” अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली.
-
अजित पवारांनी यावेळी सर्व गोष्टी बारकाईने अधिकाऱ्यांकडून जाणून घेतल्या
-
माहिती जाणून घेताना त्यांनी काही महत्वाच्या सूचनादेखील केल्या.
-
(Photos: Video Screengrab)
“मला बोलावताना दहावेळा विचार करा, मी तुमचा…”, अजित पवारांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी; म्हणाले “हे काय केलंय”
“अरे काय केलंय…,” उद्घाटनाला पोहोचताच अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं
Web Title: Maharashtra deputy cm ajit pawar godhan exhibition 2022 pune express anger svk 88 sgy