-

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील विविध मुद्द्यावर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्यपालांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानाचाही चांगलाच समाचार घेतला.
-
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊतांची सुरक्षा कपात करण्यावरूनही शिंदे सरकारवर टीकास्र सोडले.
-
”जेव्हा आमची सत्ता होती, तेव्हा आम्ही सुरक्षेचा विषय पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेवर सोपवला होता. ज्यांना-ज्यांना सुरक्षेची आवश्यकता आहे. ज्यांना सुरक्षा आवश्यक आहे, त्यांना सुरक्षा दिली गेली पाहिजे, असा आमचा उद्देश होता”
-
”अनावश्यक सुरक्षा हा विषय वेगळा आहे. संजय राऊतांबाबत बोलायचं झाल्यास त्यांना अनावश्यक सुरक्षा होती, असं कोणीही म्हणणार नाही”
-
”पण जिथे संजय राऊतांच्या वाईटावर टपलेली लोकं आहेत, तिकडे सुरक्षा काढल्यानंतर काही घडलं, तर ती जबाबदारी शिंदे सरकारची असेल”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
-
शिंदे सरकारने सत्तेत आल्यानंतर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती, त्यात संजय राऊत यांचाही समावेश होता. तसेच संजय राऊतांनी काल त्यांच्या घराची रेकी केल्याचा आरोपा केला होता.
-
दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली.
-
“गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहातो आहे, महाराष्ट्रात खोके सरकार किंवा मिंधे सरकार आल्यानंतर राज्याची सातत्याने अवहेलना होते आहे. आज अचानक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय.”
-
”जणूकाही महाराष्ट्रात माणसं राहातच नाहीत. महाराष्ट्राला स्वाभिमान, अस्मिता, हिंमत काहीच नाही आहे. कुणीही यावं, टपलीत मारावं आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून गप्प बसावं, हे आता खूप झालं.”
-
”महाराष्ट्र शिवाजी महाराजांना मानतोच हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यांचा अपमान झाल्यानंतर गुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. ज्यांनी महाराजांचा अपमान केला, त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांकडून दिल्या जात आहेत”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
-
राज्यपालांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानाचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. ”राज्यपाल जे काही बोलतात ते मला असं वाटतं गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण, आपले राज्यपाल तुम्हाला माहीत आहेत.”
-
”त्यांना राज्यपाल म्हणणं मी सोडून दिलं आहे. कारण, राज्यपाल पदाचा मी नेहमी मान, बहुमान करत आलो आहे आणि यापुढेही करेन.”
-
”पण कोणीही व्यक्ती केवळ राज्यपाला पदाची झूल त्यांच्यावर पांघरली, म्हणजे लगेच त्यांनी वेडवाकडं काहीही बोलावं हे मात्र मी आणि आमचा महाराष्ट्र मान्य करेल असं मला वाटत नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
-
पुढे ते म्हणाले, “आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. साधारणता एक प्रघात आहे की, ज्याचं सरकार केंद्रात असतं, त्यांचीच माणसं किंवा त्यांच्याच विचारसरणीची माणसं देशातील विविध राज्यात किंवा सगळ्या राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून पाठवली जातात.”
-
”या माणसांची कुवत काय असते, या माणसांची पात्रता काय असते? ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का? हा सुद्धा एक प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे आणि राज्यपाल नियुक्तीचे निकष सुद्धा ठरवायला पाहिजेत, असं माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे.” असेही ते म्हणाले.
“संजय राऊतांच्या वाईटावर टपलेले लोक….”; सुरक्षा कपातीवरून उद्धव ठाकरेंचे शिंदे सरकारवर टीकास्र
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील विविध मुद्द्यावर आपली भूमिका मांडली.
Web Title: Udhav thackeray reaction on sanjay raut security issue spb