-
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. या सभेला उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीचे नेते उपस्थित होते.
-
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकावर सडकून टीका केली. तसेच, सावरकर गौरव यात्रेवरूनही सरकारला आव्हान दिलं आहे.
-
अजित पवार म्हणाले, “तत्कालीन राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला. सरकारमधील मंत्री, प्रवक्ते आणि आमदारांनीही बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान करण्याचं काम केलं.”
-
“तेव्हा दातखीळ बसली होती का? त्यावेळी का गौरव यात्रा काढण्यात आल्या नाहीत,” असं अजित पवारांनी म्हटलं.
-
“आम्हाला सर्व महापुरूषांबद्दल आदर आहे. सर्व महापुरुषांनी तेव्हा काम केलं, म्हणून आपण हे दिवस पाहतोय. त्यांच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं. वीर सावरकर यांच्याबाबत काही वक्तव्य करण्यात आली.”
-
“पण, काही वडिलधारी लोकांच्या मध्यस्तीने ते सुद्धा वातावरण शांत झालं. आज संभाजीनगरमध्ये सभा होत असताना, जाणीवपूर्वणक दोन केंद्रीय मंत्री आणि राज्यातील तीन मंत्री गौरव यात्रा काढत आहेत,” अशी टीका अजित पवारांनी केली.
-
“गौरव यात्रा काढण्यास आमचा विरोध नाही. पण, दुटप्पीपणा करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घेऊन सरकारमध्ये आलात.”
-
“छत्रपतींचा अपमान झाल्यावर राज्यपालांना कोण काही बोललं नाही. हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. याचा विसर महाराष्ट्राला पडणार नाही,” असेही अजित पवारांनी म्हटलं.
-
“वीर सावरकरांबद्दल आम्हालाही आदर आहे. तुमच्यात खरंच ताकद असेल, तर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा,” असं आव्हान अजित पवारांनी भाजपा-शिंदे सरकारला दिलं आहे.
“तुमच्यात खरंच ताकद असेल, तर…”, वीर सावरकरांचा उल्लेख करत अजित पवारांचं भाजपा-शिंदे सरकारला आव्हान
“छत्रपतींचा अपमान झाल्यावर राज्यपालांना कोण काही बोललं नाही.”
Web Title: Ajit pawar challenge shinde fadnavis govenrment over savarkar bharatratna ssa