-
उद्धव ठाकरे यांनी अमरावतीत आज जोरदार भाषण करत शिंदे गटावर आणि भाजपावर जोरदार टीका केली. मी घरफोड्या करणारा नाही. घरात बसून काम करतो असं म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी अमरावतीतल्या मेळाव्यात उत्तर दिलं आहे.
-
उद्धव ठाकरेंनी आज बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर भाषण करताना सरकारवर टीका केली. जगातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या या पक्षाला फोडाफोडीची काय गरज लागली असेल? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
-
जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाने शिवसेना फोडली आणि चोरली तसंच त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. उद्या आणखी काय चोरतील. जे देशाचं आहे विकायचं आणि दुसऱ्याचं चोरायचं ही वेळ भाजपावर का आली? कारण भाजपाला सत्तेची मस्ती आली आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
-
ED, CBI, पोलीस यांना कामाला लावलं जातं आहे, मर्दाची अवलाद असाल तर या यंत्रणा बाजूला करा आणि मर्दासारखे समोर या, महाराष्ट्र हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे.
-
मी पंढरपूरच्या वारीत चाललो आहे. अनेक तरुण आपल्या आईला किंवा वडिलांना खांद्यावर बसवून वारीला नेतात हे मी पाहिलं आहे. तसं हे भूत (भाजपा) आपण मानेवर बसवून त्यांना महाराष्ट्र दाखवला आहे. आता ते आम्हाला संपवायला निघाले हे तुमचं हिंदुत्व आहे का? आम्ही २५ वर्षे तुमच्या बरोबर राहिलो पण तुम्ही आम्हालाच संपवायला निघालात?
-
स्वतःच्या मनाला जरा एक प्रश्न विचारला पाहिजे आत्ताच्या पंतप्रधानांनी.. तेव्हा जर बाळासाहेब ठाकरे नसते तर तुमचं नाव राहिलं असतं का? वाजपेयींनी तुमचं नाव कचऱ्यात फेकून दिलं होतं पण तुमची बाजू घेणारे बाळासाहेब ठाकरे तेव्हा होते असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली.
-
शिवसेना संपवायची आणि ज्यांच्याबरोबर लढलात त्यांनाच तुम्ही बरोबर घेतलं आहे. घरफोडे, घरभेदे हेच आहेत. कुटुंबात कलागती लावायची. आमच्या कुटुंबावर वाट्टेल ते बोलायचं पण आम्ही तुमच्या कुटुंबावर बोलायचं नाही. त्यांचे उपरे दलाल सगळ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. मला एक तरी मराठी माणूस दाखवा जो असा आरोप बाहेरच्या राज्यात जाऊन करतो असं म्हणत किरीट सोमय्यांवरही उद्धव ठाकरेंनी टीका केली.
-
मला महाराष्ट्राची जनता कुटुंबप्रमुख मानतं आहे हीच त्यांची पोटदुखी आहे. हिंदूहृदय सम्राटमधला ह पण त्यांच्याविषयी कुणी उच्चारायला तयार नाही. त्यामुळेच त्यांना बदनाम करणं सुरु आहे. माझी प्रतिमा बदनाम केली जाते. मुंबई महापालिकेत घोटाळा शोधायचा असेल तर देशातल्या पीएम केअर फंडाचाही घोटाळा काढा. हे तुमचंं हिंदुत्व आहे का? आमचं हिंदुत्व खुलेआम होतं. गर्व से कहो हे हिंदू हे वीरांच्या तोंडी शोभतं नामर्दांच्या नाही.
-
तुमची आज एकाची तीन तोंडं झाली उद्या दहा होतील. पण एकच राम बाण तुमच्या रावणाला खाली खेचायला पुरेसा आहे. आमचं हिंदुत्व दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारं नाही. मुँह मे राम आणि बगलमें छुरी हे आमचं हिंदुत्व नाही. हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे. जे राष्ट्रवादीला कंटाळून तिकडे गेले त्यांचं आता काय झालं? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
-
रात्रीच्या गाठीभेटी करुन यांनी मला खुर्चीवरुन खाली खेचलं. आता भुजबळांच्या मांडीला मांडी लावून कोण बसलं आहे? मला नावं ठेवलीत आता तुम्ही वेगळं काय करता आहात? मला सर्वात जास्त दया कुणाची येत असेल तर भाजपा उभी करणाऱ्या कार्यकर्त्यांची. मी आठवण आली म्हणून मी सामना सिनेमा पाहत होतो. त्यात ओळी आहेत कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.. आणि पुढच्याच ओळी आहेत कोण मेले कुणासाठी रक्त ओकून..बिचारे निष्ठावान कार्यकर्ते कुठलं ओझं वाहात आहेत हा मला प्रश्न पडला आहे. भाजपा रुजवण्यासाठी जे झिजले त्यांची अवस्था काय आहे? बघा. हनुमान चालीसा पठण करा पण जो काही उपऱ्यांचा जो द्रोणागिरी आहे त्यात कार्यकर्ते दडपले जात आहेत हे लक्षात येतंय का? असा खोचक प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
-
भाजपाच्या कार्यकर्त्यांची ही अवस्था कुणी केली आहे? कार्यकर्त्यांचं कुपोषण आणि नको त्यांना अजीर्णांचं ढेकरं येत आहेत. .हजार कोटींच्या वर घोटाळा केला असेल तर मंत्रिमंडळात स्थान मिळतं. भ्रष्ट तितुका मिळवावा भाजपा पक्ष वाढवावा हे यांचं धोरण. दिसला भ्रष्टाचारी की टाकला गाडीत हे यांचं धोरण मग लाँड्रीमध्ये धुूवून साफ. यांच्याकडे वॉशिंग पावडर आहे तरी कुठली?
“भ्रष्ट तितुका मिळवावा भाजपा पक्ष वाढवावा!”, उद्धव ठाकरेंच्या भाषणातले ठळक मुद्दे
अमरावतीतल्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं घणाघाती भाषण
Web Title: Shivsena uddhav balasaheb thackeray chief uddhav thackeray slams bjp and shinde group in amravati speech scj