-

साधारणपणे मार्च ते मे महिन्यापर्यंत पांडाचा मेटिंग सिझन असतो. यालाच अनुसरून सिंगापूर रिझर्व्ह सफारीमधील जायंट पांडा काई-काई आणि जिया-जियाच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जात आहे. गेल्या महिन्यात त्यांची वार्षिक आरोग्य तपासणी करण्यात आली. याअंतर्गत जिया-जियाच्या पोटाची सोनोग्राफी करण्यात आली आणि तिच्या मुत्राचे परीक्षण करण्यात आले. त्याचबरोबर तिच्या डोळ्यांची आणि दातांचीदेखील तपासणी करण्यात आली.
-
काई-काई आणि जिया-जियाने त्यांच्या हालचाली आणि वागण्यातील बदलावरून मेटिंग सिझन जवळ आल्याचे संकेत देण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्यात नैसर्गिकरित्या संबंध प्रस्थापित करण्याचा हा तिसरा प्रयत्न आहे. २०१५ मध्ये १० वर्षांचा काई-काई आणि ९ वर्षांच्या जिया-जियाला पहिल्यांदा जवळ आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. नैसर्गिक आणि कृत्रिम दोन्ही प्रयत्न व्यर्थ गेले. दोघांच्या 'हृदयात वसंत फुलावा' म्हणून रिझर्व्ह सफारीच्या कर्मचाऱ्यांकडून योग्य ते प्रयत्न करण्यात येत आहेत.
-
गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात दोघांच्या राहण्याची ठिकाणे बदलली होती. साधारणपणे जानेवारीमध्ये असे करण्यात येते. परंतु, यावेळी नोव्हेंबरमध्येच हा बदल करण्यात आला. यामुळे दोघांना एकमेकांचा गंध येऊन त्यांच्यातील हार्मोन्समध्ये बदल होण्यास मदत होते.
-
याविषयातील तज्ज्ञ आणि रिझर्व्ह सफारीचे कर्मचारी दोन्ही पांडांवर लक्ष ठेऊन आहेत. त्याचबरोबर जिया-जियाच्या हार्मोन लेव्हलचीदेखील पाहणी करण्यात येत आहे. जिया-जियाच्या ऑस्ट्रोजनची पातळी खाली आल्यानंतर दोघांना सध्याच्या ठिकाणाहून बाहेर काढून अन्य ठिकाणी तीन दिवसांपर्यंत एकत्र ठेवण्यात येईल. या दिवसांमध्ये पर्यटकांना त्यांचे दर्शन होणार नाही.
-
नैसर्गिकरित्या गर्भधारणा न झाल्यास अन्य उपाय म्हणून डॉक्टरांनी अगोदरच काई-काईचे स्पर्मस जमा करून ठेवले आहेत. गरज पडल्यास कृत्रिम गर्भधारणेचा मार्ग अवलंबिला जाईल.
काई-काई आणि जिया-जियाचे ‘हृदयी वसंत फुलताना…’
Web Title: Photo gallery giant panda conservation in wildlife reserves singapore