-

काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी आज पुण्यात एका वार्तालापासाठी हजेरी लावली. यावेळी त्यांनी देशातल्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यासोबतच पुणे प्रशासनाच्या कारभारावरही ताशेरे ओढले.
-
कंगनाचे स्वातंत्र्याबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य असेल किंवा जय श्रीराम म्हणण्यावरुन होणारा वाद असेल, अशा सगळ्या गोष्टींवर कन्हैय्या यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली मतं स्पष्ट केली.
-
अभिनेत्री कंगना रणौतच्या स्वातंत्र्याबद्दलच्या वक्तव्यामुळे चांगलाच मोठा वाद निर्माण झाला होता. १९४७ साली भारताला मिळालेलं स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं होतं. देशाला खरं स्वातंत्र्य २०१४ साली मिळालं अशा आशयाचं वक्तव्य तिनं केलं होतं.
-
तिच्या या वक्तव्यावरुन राजकीय, सामाजिक वर्तुळात चांगलाच वादंग निर्माण झाला होता. तिच्या याच वक्तव्यावरुन काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी तिला टोला लगावला आहे.
-
देशातील बदलती राजकीय आणि सामाजिक परिस्थिती या विषयावर पुण्यात वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. कंगनाच्या या विधानाबद्दल आपल्याला काय वाटतं असा प्रश्न विचारला असता कन्हैय्या कुमार यांनी कंगनाला टोला लगावला.
-
ते म्हणाले, “स्वातंत्र्य भीक म्हणून कधीच मिळत नाही. स्वातंत्र्य बलिदानानंतर मिळतं, त्यागानंतर मिळतं, संघर्ष केल्यानंतर मिळतं. लोकांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचा त्याग करुन स्वातंत्र्य मिळवलं आहे. भीक म्हणून पुरस्कार मिळू शकतो, स्वातंत्र्य नाही मिळत”.
-
“म्हणून माझं एक आहे की मी अशा प्रकारच्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. माझं माध्यमांना सांगणं आहे की तुम्हीही दुर्लक्ष करा”.
-
अशा प्रकारची विधानं ही मूळ मुद्द्यांकडून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी केली जातात, असं सांगत कन्हैय्या कुमार पुढे म्हणाले, “आपल्या आयुष्यावर थेट परिणाम करणाऱ्या ज्या गोष्टी आजूबाजूला घडत आहेत, त्यावरुन आपलं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे”.
-
“ब्रिटीश डिव्हाईड अँड रुल करायचे. हे लोक आता डायवर्ट अँड रुल करत आहेत. कायमच हेडलाईन आपल्या हातात ठेवायची. असं काही बोलायचं, असं एखादं विधान करायचं की मूलभूत मुद्द्यांकडे लक्षच जाणार नाही”.
-
“आता दोन दिवसांसाठी बँका बंद होणार आहेत. त्यावर चर्चा झाली पाहिजे. ही कोण कंगना? चित्रपट बनवते, तुम्ही बघता, टाळ्या वाजवता, संपवा विषय. स्वातंत्र्य भीक म्हणून नक्कीच मिळालेलं नाही, हे देशाच्या जनतेला माहित आहे. आणि आता तर मला वाटतंय की जास्तीत जास्त लोकांना आता या स्वातंत्र्याचं महत्त्व पटू लागलं आहे”.
-
जय श्रीराम म्हटल्यावर राग का येतो? असा प्रश्न विचारला असता कन्हैय्या कुमार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं.
-
ते म्हणाले, मला कधीच या गोष्टीचा राग येत नाही. एकतर माझं नाव आहे कन्हैय्या, माझ्या वडिलांचं नाव आहे जयशंकर आणि मी कुठून येतो, तर मिथिला नगरीतून. मिथिला माता जानकीची जन्मभूमी आहे. मग मला का राग येईल? मला नथुरामचा राग येतो, प्रभू श्रीरामाचा नाही.
-
“काँग्रेस, क्रिकेट आणि चित्रपट या तीन अशा गोष्टी आहेत ज्याबाबत भारतात सगळेच तज्ञ आहेत. कोणालाही विचारा काँग्रेस इतका सोपा पक्ष आहे की त्याबाबत सर्व तज्ञ आहेत. काँग्रेस पक्ष एकदम उघडलेले पुस्तक आहे. ज्यांना वाचता येते ते वाचतात आणि ज्यांना नाही येत ते त्याची पाने फाडतात”, कन्हैय्या कुमार म्हणाले.
-
“कोणतीही गोष्ट लपलेली नाही. तुम्हाला हात जोडून एवढीच विनंती करतो की जेव्हा कमकुवत असण्याबद्दल बोलता तेव्हा असलेल्या शक्तीबद्दलही बोलायला हवे. भारतात मध्यम मार्ग हा उत्तम मार्ग आहे. या देशामध्ये अतिवादी विचारांना नाकारून मध्यम मार्गावर चालण्याचा प्रयत्न फक्त काँग्रेस करत आहे,” असे कन्हैय्या कुमार यांनी म्हटले आहे.
-
सर्व फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस
PHOTOS: ‘जय श्रीराम’ ते कंगनाचं ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य…काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांची पुण्यात टोलेबाजी
Web Title: Kanhaiyya kumar press conference in pune vsk 98 svk