चंद्रशेखर बोबडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीने पिंपरी-चिंचवडच्या पोटनिवडणुकीत बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देऊन ही जागा भाजपला जिंकण्यासाठी एक प्रकारे मदतच केली.

महाविकास आघाडीने कसबाप्रमाणेच पिंपरी-चिंचवडची जागा जिंकण्यासाठी सर्वशक्तीपणाला लावली होती. थेट लढतीमुळे कसब्यात काँग्रेसने विजय मिळवला. तिरंगी लढतीमुळे चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला. या तिरंगी लढतीतील तिसरा उमेदवार हा सेनेचा बंडखोर होता आणि त्याला वंचित बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा होता. येथे मतविभाजनामुळे भाजपचा विजय सुकर झाला. त्यामुळे वंचितच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा >>>उत्तर भारतातील मजूरांबाबत चुकीचे वृत्त पसरविल्याप्रकरणी भाजपा नेता, २ पत्रकारांवर गुन्हे दाखल; तामिळनाडूमध्ये अफरातफरी पसरविण्याचा प्रकार

विदर्भात पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वंचितचा प्रभाव आहे. एकीकडे भाजपविरोधी भूमिका घेतानाच दुसरीकडे जर-तर,अटी शर्तीची भाषा वापरून भाजप आमचा शत्रू नाही, असेही सांगायचे, अशी भूमिका या पक्षाचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांची राहिली आहे. याचा प्रत्यय २०१४, २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत व त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतही आला. या सर्व निवडणुकीत वंचितमुळे झालेल्या मतविभाजनाचा फायदा भाजपला व फटका काँग्रेस, राष्ट्रवादीला बसला होता.

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत नागपूर शिक्षक मतदारसंघातही वंचितने घेतलेली भूमिका अनाकलनीय होती. वंचितची शिवसेनेशी युती असताना व शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला असतानाही येथे वंचितने स्वंतत्र उमेदवार दिला होता. त्यानंतरही ही जागा काँग्रेसने जिंकली. कारण वंचितचा उमेदवार अपेक्षित मत विभाजन करू शकला नाही.

पिंपरी-चिंचवडमध्येही अशीच स्थिती होती. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी लढवणार असे ठरले असताना आणि त्याला शिवसेनेने संपूर्ण पाठिंबा दिला असताना ऐनवेळी वंचितने सेना बंडखोराला पाठिंबा जाहीर करून आश्चर्याचा धक्काच दिला.

हेही वाचा >>>‘आप’ची कर्नाटकमध्ये एंट्री; पहिल्याच जाहीर सभेत भाजपावर भ्रष्टाचाराचा आरोप करत हल्लाबोल

पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचा विजय हा तेथील संघटनात्मक पाठबळ, कार्यकर्ते तसेच दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी केलेली विकास कामे आणि मोदी, फडणवीस व बावनकुळे यांच्या नेतृत्वाचा विजय आहे. मतविभाजनामुळे यश मिळाले अशी टीका करणे म्हणजे लोकांनी दिलेला कौल अमान्य करणे होय.-चंदन गोस्वामी, प्रवक्ते, भाजप

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adv prakash ambedkar vanchit bahujan vikas aghadi supports rebel candidate in pimpri chinchwad by election print politics news amy