पंजाबमधील अमृतसरमध्ये रविवारी अज्ञात हल्लेखोरांनी शिरोमणी अकाली दलाच्या (एसएडी) नेत्याची गोळ्या घालून हत्या केली. जिल्ह्यातील जंडियाला गुरु येथील नगरसेवक हरजिंदर सिंग यांची गावातील छेहरता साहिब गुरुद्वाराजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर पंजाबमधील राजकारण चांगलेच तापले आहे. शिरोमणी अकाली दलच्या नेत्यांनी पंजाबमधील आप सरकारवर टीका केली आहे. अमृतसरमध्ये नक्की काय घडले? जाणून घेऊयात?
गावातील गुरुद्वाऱ्याजवळ नगरसेवकाची हत्या
जिल्ह्यातील जंडियाला गुरु येथील नगरसेवक हरजिंदर सिंग यांची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. हरजिंदर सिंग यांचे भाऊ आणि मेहुण्यांनी आरोप केला आहे की, हे तेच हल्लेखोर होते ज्यांनी यापूर्वीही हरजिंदर यांच्या निवासस्थानी गोळ्या झाडल्या होत्या आणि त्यांना धमक्या दिल्या होत्या. नगरसेवक हरजिंदर सिंग अमृतसरमधील छेहरता येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. पोलिस उपायुक्त हरपाल सिंग रंधावा म्हणाले की, तीन ते चार जणांनी दुचाकीवरील नगरसेवकाला अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांच्यावर तीन ते चार गोळ्या झाडल्या.
हरजिंदर सिंग यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांचा मृत्यू झाला असे ते म्हणाले. पोलिस उपायुक्तांनी सांगितले, “हरजिंदर सिंग त्यांच्या दुचाकीवर असताना तीन ते चार जण मोटारसायकलवर बसून त्यांच्याकडे आले आणि त्यांनी गोळीबार केला. रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला,” असे त्यांनी ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला सांगितले. पोलिसांनी सांगितले की, त्यांनी नगरसेवकाच्या हत्येत सहभागी असलेल्या तीन जणांची ओळख पटवली आहे. गोपी, अमित आणि करण किरा अशी आरोपींची ओळख पटली आहे. सर्व आरोपी जंडियाला गुरु येथील रहिवासी आहेत, असे पोलिसांनी सांगितले. सर्व आरोपी कृष्णा टोळीशी संबंधित आहेत असे पोलिस म्हणाले. गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाचीदेखील ओळख पटली असल्याचे त्यांनी सांगितले.
नेत्यांकडून घटनेचा निषेध आणि आप सरकारवर टीका
अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप करत आप सरकारवर टीका केली आहे. बादल यांनी म्हटले, “अमृतसर जिल्ह्यातील जंडियाला गुरु येथील अकाली दलाचे नगरसेवक हरजिंदर सिंग यांच्या मृत्यूने पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे उघडकीस आणली आहे.” त्यांनी पोलिस निष्क्रिय असल्याचा आरोप करत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि पंजाब पोलिस प्रमुखांनाही प्रश्न विचारले आहेत.
ज्येष्ठ अकाली दलाचे नेते बिक्रम सिंग मजिठिया यांनीदेखील हत्येचा निषेध केला आणि आम आदमी पक्षाच्या (आप) नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर टीका केली. मजिठिया यांनी दावा केला की, काही दिवसांपूर्वी नगरसेवकाच्या घरावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यांनी हल्ल्यातील सीसीटीव्ही फुटेजदेखील शेअर केले. त्यांनी ‘एक्स’वर लिहिले, “पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. श्री अमृतसर साहिब जिल्ह्यातील जंडियाला गुरु येथील शिरोमणी अकाली दलाचे विद्यमान नगरसेवक हरजिंदर सिंग यांची आज गोळ्या घालून हत्या करण्यात आली. काही दिवसांपूर्वी नगरसेवक हरजिंदर सिंग यांच्या घरावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या,” असे त्यांनी लिहिले.
पोलीस महासंचालकांकडून (डीजीपी) तक्रार मिळाल्यानंतरही कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला. त्यांनी या हत्येसाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांना जबाबदार धरले. ते म्हणाले, “भगवंत मान जी, झोपेतून जागे व्हा आणि कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत करा. आज नगरसेवकाच्या मृत्यूसाठी तुम्ही सर्व जण जबाबदार आहात.” या घटनेचा निषेध करताना पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी लिहिले, “अकाली दलाचे नगरसेवक हरजिंदर सिंग बहमन यांची दिवसाढवळ्या करण्यात आलेली क्रूर हत्या अत्यंत निषेधार्ह आहे.” त्यांनी असा दावा केला की, “यातून पुन्हा एकदा पंजाबमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे चित्र दिसते. गुन्हेगारांना कायद्याचे भय नाही किंवा त्यांना सत्तेचा आश्रय मिळत आहे. आम आदमी पक्ष पंजाबला पूर्णपणे अराजकतेकडे ढकलत आहे.”
पंजाबचे कॅबिनेट मंत्री कुलदीप सिंग धालीवाल यांनी सिंग यांच्या हत्येला दुःखद म्हटले. धालीवाल म्हणाले, “पंजाब सरकार आणि मी या घृणास्पद कृत्याचा तीव्र निषेध करतो. मी पंजाबच्या लोकांना खात्री देतो की गुन्हेगार वाचणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.” ते पुढे म्हणाले, “काही तासांतच मारेकऱ्यांची ओळख पटली आहे. आमचे सरकार पंजाबमधून शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि टोळ्यांना मुळापासून नष्ट करण्यासाठी वचनबद्ध आहे.” त्यांनी घटनेचे राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय पक्षांवरही टीका केली.