तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा १ मार्च रोजी जन्मदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाला. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव या समारंभाला उपस्थित होते. मात्र वाढदिवसाचे औचित्य साधून तामिळनाडूमध्ये काम करणाऱ्या बिहारी कामगारांवर हल्ले झाल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे अनेक कामगारांनी तामिळनाडूमधून काढता पाय घेतला. अखेर मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी स्वतः पुढे येऊन ही अफवा असल्याचे जाहीर केले. तसेच तीन लोकांवर अपप्रचार केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. या घटनेची चौकशी करण्यासाठी बिहारमधील शिष्टमंडळ तामिळनाडूमध्ये येऊन गेले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी डीएमके पक्षाचे नेते आणि स्टॅलिन यांचे विश्वासू सहकारी टी. आर. बालू यांनी पटना येथे जाऊन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. तसेच स्टॅलिन यांनी दिलेले आश्वासन त्यांना सांगितले. या भेटीच्या निमित्ताने देशभरातील भाजपाविरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या एका सोहळ्यावरदेखील चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे वाचा >> VIDEO : एम.के.स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्याने भेट म्हणून दिला उंट; सोशल मीडियावर जोरदार चर्चा

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना टी. आर. बालू म्हणाले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची मी व्यक्तिशः भेट घेऊन तामिळनाडूमधील परप्रांतीय कामगारांबाबत चर्चा केली. तामिळनाडू सरकार बिहारी कामगारांचे कल्याण आणि संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. आम्ही याबाबत करत असलेल्या कार्यवाहीचे सादरीकरण नितीश कुमार यांच्यासमोर केले आहे. दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मात्र या भेटीबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जेडीयुचे ज्येष्ठ नेते आणि वित्तमंत्री विजय कुमार चौधरी यांनी पटना येथे माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, डीएमकेचे नेते बालू यांनी नितीश कुमार यांची भेट घेतली. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके पक्षाचे प्रमुख एम. करुणानिधी यांची जूनमध्ये १०० वी जयंती आहे. या सोहळ्यासाठी बालू यांनी नितीश कुमार यांना चेन्नईला येण्याचे आमंत्रण दिले.

जेडीयूमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करुणानिधी यांच्या जयंतीचा चेन्नई येथे होत असलेला सोहळा हा देशभरातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न ठरणार आहे. या सोहळ्यात नितीश कुमार यांना राष्ट्रीयस्तरावर विरोधकांचा नेता म्हणून मान्यता दिली जाऊ शकते. “तसेच बालू यांनी मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा निरोपही नितीश कुमार यांना दिला. कामगारांवर कथित हल्ल्याचे जे व्हिडीओ व्हायरल केले गेले, ते खोटे असल्याचे तामिळनाडू पोलिसांनी सांगितले आहे. तामिळनाडू पोलिसांनी दोन व्हिडीओ ट्वीट केले आहेत, ज्यामधून सत्य समोर येत आहे.”, असेही चौधरी यांनी सांगितले.

बालू यांनी सांगितले की, तामिळनाडूमध्ये बिहारी कामगारांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. ज्या काही घडामोडी मागच्या कालावधीत घडल्या, त्या एका कुटिल षडयंत्राचा भाग होत्या. बिहार आणि तामिळनाडू राज्यात संघर्ष निर्माण करण्यासाठी हा बनाव रचण्यात आला होता.

हे वाचा >> उत्तर भारतातील मजूरांबाबत चुकीचे वृत्त पसरविल्याप्रकरणी भाजपा नेता, २ पत्रकारांवर गुन्हे दाखल; तामिळनाडूमध्ये गोंधळ माजविण्याचा प्रकार

करुणानिधींच्या जयंतीसोहळ्याला भाजपाविरोधी नेते एकत्र येणार

डीएमके पक्षाने जूनमध्ये होणाऱ्या या सोहळ्यासाठी देशभरातील बिगर भाजपा नेत्यांना निमंत्रण दिले आहे. राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची मोट बांधण्यासाठी या मंचाचा वापर होऊ शकतो. नितीश कुमार यांनी स्वतः राष्ट्रीय स्तरावर विरोधकांना एकत्र करण्यासाठी एप्रिलनंतर प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते, अशी माहिती जेडीयूच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली. बिहार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांचे जून महिन्याचे वेळापत्रक अद्याप बनलेले नाही. त्यामुळे कदाचित ते या सोहळ्याला भेट देतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

डीएमके नेते बालू यांनी पुढे सांगितले की, जूनमधील सोहळ्याला अद्याप अनेक महिने आहेत. आम्ही अनेक नेत्यांशी याबाबत बोलत आहोत. पण हे सर्व त्यांच्या त्यांच्या वेळापत्रकावर अवलंबून आहे. याबाबतचा अंतिम कार्यक्रम काही दिवसांनी ठरेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amid migrant attack rumours in tn dmks baalu visits nitish with message from stalin kvg