दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात कुरघोडीचे राजकारण सुरू असतानाच या मेळाव्यापूर्वी किंवा नेमके दसऱ्याच्या दिवशीच शिवसेनेला मोठा धक्का देण्याची शिंदे गटाची योजना आहे. शिवसेनेचे काही बडे नेते वा लोकप्रतिनिधी शिंदे गटात सामील होण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या बालेकिल्ल्यात शिवसेनेत मोठी फूट पडली. जिल्हाप्रमुखांसह बहुतांशी बड्या नेत्यांनी शिंदे गटात प्र‌वेश केला. ठाण्यात उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व नेस्तानाबूत करण्याची शिंदे यांची योजना आहे. या तुलनेत मुंबईत शिवसेनेत मोठी पडझड झालेली नाही. यामुळेच दसरा मेळाव्यापूर्वी किंवा दसऱ्याच्याच दिवशी शिवसेनेत मुंबईत फूट पाडण्याची शिंदे गटाची योजना आहे. या दृष्टीने स्वत: शिंदे यांनी लक्ष घातले आहे.

हेही वाचा… कोकणात पुन्हा ‘राडा संस्कृती’चा उदय

मुंबईत सध्या शिंदे गटाची सूत्रे किरण पावस्कर, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे यांच्याकडे आहेत. राजकीय नियोजनाचे काम पूर्वाश्रमीचे शिवसेैनिक आणि सध्या भाजपमध्ये असले तरी शिंदे यांना साथ देणारे आशीष कुळकर्णी हे करीत आहेत. मुंबईत आतापर्यंत शीतल म्हात्रे या एकमेव माजी नगरसेविकेने शिंदे गटात प्रवेश केला. अन्य माजी नगरसेवक राजकीय अंदाज घेत आहेत. काही माजी नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न शिंदे गटाने सुरू केले आहेत. १० ते १५ माजी नगरसेवक लवकरच शिंदे गटात प्र‌वेश करतील, असे संकेत शिंदे यांच्या निकटवर्तीयांकडून दिले जात आहेत.

हेही वाचा… शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा मुद्दा उच्च न्यायालयात, उद्या सुनावणी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुंबईतही मोठा झटका देण्याची शिंदे गटाची योजना आहे. या दृष्टीने भाजपही शिंदे यांना मदत करीत आहे. मुंबई उपनगरात शिवसेनेचे चांगले वर्चस्व आहे. यातूनच उपनगरात शिवसेनेला धक्का देण्याची शिंदे गटाची योजना आहे. शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला तीन महिने पूर्ण होत आले आहेत. ठाण्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये विशेषत: खासदार-आमदार आहेत त्या भागात शिंदे यांना शिवसेनेतून चांगले समर्थन लाभले. परंतु मुंबईत शिवसेनेला धक्का देता आलेला नाही. यातूनच शिवसेनेला धक्का देण्याची योजना आहे.

हेही वाचा… दसरा मेळाव्यापूर्वी उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; गटप्रमुखांच्या मेळाव्यात चालणार ‘बाण’!

शिंदे गट फोडाफोडीचे राजकारण करणार हे लक्षात घेऊन मुंबईत शिवसेना सावध झाली आहे. शिवसेनेचे विभाग प्रमुख व अन्य नेते माजी नगरसेवकांच्या संपर्कात आहेत. उद्धव ठाकरे वा आदित्य ठाकरे हे शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत. काहीही करून शिंदे गटाला मुंबईत रोखण्याची ठाकरे यांची योजना आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before dussehra shinde group planning to give a big blow to shiv sena print politics news asj