Tejashwi Yadav Will Contest Bihar all 243 seats : बिहारमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर असताना विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसमध्ये दरी निर्माण झाली आहे. विधानसभेच्या जागावाटपावरून सध्या दोन्ही पक्षांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. काँग्रेसने जागावाटपाबाबत ठाम भूमिका घेतली घेतली आहे. तसेच आगामी निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार याबाबत स्पष्टता देण्यास महाआघाडीने नकार दिला आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी काँग्रेसवर दबाव वाढवला आहे. मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या तेजस्वी यांनी निवडणुकीत सर्वच २४३ जागांवर उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे महाआघाडीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुजफ्फरपूर जिल्ह्यातील कांटी येथील एका कार्यक्रमात राज्याचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी मोठं विधान केलं. “आगामी निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल सर्वच २४३ जागांवर निवडणूक लढवणार… मुजफ्फरपूर असो… कांटी असो किंवा बोरचहा असो… सर्वच जागांवर पक्षाचे उमेदवार उभे केले जाईल,” असं तेजस्वी यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे राहुल गांधी यांनी काढलेल्या मतदार अधिकार यात्रेच्या कथित यशानंतर काँग्रेसनेही जागावाटपाबाबत ठाम भूमिका घेतली असून ७० जागांचा आग्रह धरला आहे. विशेष बाब म्हणजे- गेल्या निवडणुकीतही काँग्रेसने ७० जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यातील केवळ १९ जागांवर पक्षाला यश मिळवता आलं होतं.

आरजेडीने मिळवला होता ७५ जागांवर विजय

२०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत १४४ पैकी ७५ जागा जिंकून राष्ट्रीय जनता दल हा सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला होता, तरीही काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळे महाआघाडीला सत्तास्थापन करण्यात अपयश आलं होतं. गेल्या आठवड्यात अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (AICC) बिहार प्रभारी कृष्णा अल्लावरू यांनी एक सूचक विधान केलं. बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार हे राज्यातील जनताच ठरवेल, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे महाआघाडीत अस्वस्थता वाढली आणि आरजेडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यास सुरुवात केली. राहुल गांधी यांनीदेखील राज्यात काढलेल्या व्होटर अधिकार यात्रेदरम्यान मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य करणं टाळलं. त्यामुळे आरजेडीतील नेते आणखीच अस्वस्थ झाल्याचं दिसून येत आहे.

आणखी वाचा : Narendra Modi Biography : पंतप्रधान मोदींना आई हिराबेन यांच्याकडून कशी प्रेरणा मिळाली?

जागावाटपाच्या बैठकीत काय होणार?

येत्या काही दिवसांत विधानसभेच्या जागावाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलातील नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीपूर्वीच तेजस्वी यादव यांनी सर्वच जागांवर उमेदवार देण्याचे विधान केल्याने काँग्रेसवरील दबाव वाढण्याची शक्यता आहे. या बैठकीत काँग्रेसच्या मागण्यांव्यतिरिक्त महाआघाडीतील घटकपक्ष मुकेश सहानी यांच्या विकासशील इंसान पार्टीची भूमिका, गेल्या निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या डाव्या पक्षांच्या मागण्या, तसेच माजी केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांच्या राष्ट्रवादी लोक जनशक्ती पक्षाला आणि हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाला किती जागा देता येईल, अशा महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

आरजेडीकडून मुख्यमंत्रिपदावर दावा

“तेजस्वी यादव हेच महाआघाडीतील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहेत,” असं आरजेडीचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी दी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं. “आमच्या नेत्यानं केलेल्या विधानाचा अर्थ असा होता की महाआघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार एकमेव तेच आहेत. काहीही झाले तरी जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही लवकरच बैठक घेणार आहोत. या बैठकीत महाआघाडीचे नेतृत्वही ठरवले जाईल. काँग्रेसने बिहारमधील आपली मर्यादा मान्य करावी आणि आरजेडीच्या आघाडीची भूमिका स्वीकारावी. २०२० मध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने २४३ पैकी ११० जागा जिंकून सत्तेजवळ जाण्याचा प्रयत्न केला होता,” असंही मृत्युंजय तिवारी यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : Manipur Violence : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर मणिपूरमध्ये पुन्हा हिंसक निदर्शने; काय आहे कारण?

काँग्रेसची भूमिका काय?

दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्त ज्ञान रंजन गुप्ता यांनी मात्र त्यांच्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडली आहे. “तेजस्वी प्रसाद यादव हे महाआघाडीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत. आगामी निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल याचा निर्णय योग्यवेळी समन्वय समितीकडून घेतला जाईल. “आमचा प्रयत्न सर्वप्रथम जागावाटपाबाबतचा असेल. २४३ जागांवर उमेदवार देण्याचं विधान करणं ही तेजस्वी यादव यांची वैयक्तिक भूमिका आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून जशी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत कटुता आली आहे, तशी महाआघाडीत येणार नाही”, असा टोलाही गुप्ता यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

बिहारमध्ये जागावाटपावरून रणकंदन

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे काँग्रेस आणि आरजेडी यांच्यात जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतही याच मुद्द्यावरून नाराजीनाट्य रंगलं आहे. एनडीएमधील घटकपक्ष हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे नेते आणि केंद्रीय मंत्री जितनराम मांझी यांनी जागावाटबाबत ठाम भूमिका घेतली आहे. वाटाघाटीत आमच्या पक्षाला २० जागा मिळाल्या नाहीत, तर आम्ही १०० जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेऊ, अशी भूमिका मांझी यांनी घेतली आहे, त्यामुळे जागावाटपावरून निर्माण झालेला पेच सत्ताधारी आणि विरोधकांकडून कसा सोडवला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.