BJP Defeat in Seven State By-Elections : बिहारमधील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपाला अन्य सात राज्यांतील पोटनिवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. शुक्रवारी बिहारपाठोपाठ राजस्थान, झारखंड, मिझोराम, पंजाब, जम्मू-काश्मीर, तेलंगणा आणि ओडिशामधील विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल लागले. त्यामध्ये आठपैकी तब्बल सहा जागांवर भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेससह आम आदमी पार्टी आणि इतर पक्षांनी दणदणीत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे एका जागेवर माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रालाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. यादरम्यान कोणकोणत्या जागेवर भाजपाचा पराभव झाला? त्याबाबत जाणून घेऊ…

जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाचा विजय

काही महिन्यांपूर्वीच जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत ओमर अब्दुल्ला यांच्या नॅशलन काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवत बहुमतात सत्तास्थापन केली. यादरम्यान बडगाम आणि नागरोटा विधानसभा मतदारसंघातील दोन रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यापैकी नागरोटामध्ये भाजपाच्या उमेदवार देवयानी राणा विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा तब्बल ४२ हजारांहून अधिक मताधिक्याने पराभव केला. या पराभवामुळे जम्मू-काश्मीरमधील सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला मोठा धक्का बसला.

बडगाममध्ये भाजपाचा पराभव

कॅलिफोर्निया विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी घेतलेल्या देवयानी या भाजपाचे दिवंगत आमदार देवेंद्र राणा यांच्या कन्या आहेत. दुसरीकडे बडगाममध्ये भाजपाच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. या जागेवर मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाच्या उमेदवाराने विजय मिळवला, तर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला. झारखंडमधील घटसिला विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या मतदारसंघात भाजपाने माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांचे पुत्र बाबूलाल यांना उमेदवारी दिली होती, पण झारखंड मुक्ती मोर्चाच्या उमेदवाराने त्यांचा तब्बल ३८ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

आणखी वाचा : Bihar Election Results : राजद-काँग्रेसला कशाचा बसला फटका? महाआघाडीचा पराभव नेमका कशामुळे?

मिझोराम-ओडिशातही भाजपाला अपयश

मिझोरम येथील डंपा विधानसभा पोटनिवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंट पक्षाचे उमेदवार डॉ. आर ललथंगलियाना यांनी ५६२ मतांनी निसटता विजय मिळवला. या मतदारसंघात झोरम पीपल मूव्हमेंट पक्षाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला; तर काँग्रेस आणि भाजपाचा उमेदवार अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला या निवडणुकीत केवळ १,५४१ मते पडली. ओडिशातील नौपाडा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला दणदणीत विजय मिळाला. या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार जय ढोलकिया यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा तब्बल ८३ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

पंजाबमध्ये भाजपाचा दारुण पराभव

पंजाबमधील तरनतारन विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पार्टीच्या उमेदवाराने विजय मिळवला. विशेष म्हणजे- आप आमदाराच्या राजीनाम्यामुळेच या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. या जागेवर सत्ताधारी पक्षाचे उमेदवार हरमित सिंग संधू १० हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकावर शिरोमणी अकाली दलाचे सुखविंदर कौर यांना २३ हजार ८०० मते मिळाली. या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार हरजित सिंग संधू यांना १० हजारांपेक्षाही कमी मते मिळाली.

झारखंडमध्येही भाजपाचा विजय नाही

पंजाबसह झारखंड आणि मिझोराम पाठोपाठ राजस्थानमधील अंता विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपाला पराभवाचा धक्का बसला. भाजपाच्या विद्यमान आमदाराला अपात्र ठरवण्यात आल्याने या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रमोद भाया यांनी भाजपाच्या मोरपाल सुमन यांचा तब्बल १५ हजार ५९४ मतांनी पराभव केला. या ठिकाणी अपक्ष उमेदवार नरेश मीणा तिसऱ्या स्थानावर राहिले. अंतामधील विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

हेही वाचा : AIMIM Bihar Performance : बिहारमध्ये ओवैसींचा पक्ष काँग्रेसपेक्षाही शक्तिमान; एमआयएमने कशी केली कामगिरी?

तेलंगणात काँग्रेसचा विजय, भाजपा पराभूत

मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलापासून तिसऱ्या नंबरवर राहिलेल्या मोरपाल सुमन यांना अखेरच्या फेरीत १५९ मते जास्त मिळाल्याने मीणा यांना पिछाडीवर टाकत त्यांनी दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. तेलंगणातील पोटनिवडणुकीतही भाजपाला विजय मिळवता आला नाही. ज्युबिली हिल्स मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला, तर भाजपाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. हा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाकडे होता. गेल्या सात पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला दोन जागांचा फायदा झाला आहे.

बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष

बिहार विधानसभेच्या २४३ जागांपैकी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २०० हून अधिक जागांवर विजय मिळवला, तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील विरोधी महाआघाडीला केवळ ३५ जागांवर विजय मिळवता आला. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसला दोन आकडी जागाही मिळवता आल्या नाहीत. दुसऱ्या बाजूला बिहारच्या जनतेला नवा पर्याय देऊ पाहणारे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला भोपळादेखील फोडता आला नाही. या निवडणुकीत ८९ जागा जिंकून भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे, तर नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने ८५ जागा जिंकल्या आहेत. त्याशिवाय चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने १९ जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे महाआघाडीत तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राजदला २५, तर काँग्रेसला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे.