Bjp leader on Bishnoi gang: कॅनडा सरकारने एक मोठा निर्णय घेत, बिष्णोई टोळीला दहशतवादी संघटना घोषित केले. एनडीपी आणि कन्झर्व्हेटिव्ह नेत्यांच्या मागणीनंतर कॅनडा सरकारने २९ सप्टेंबरला लॉरेन्स बिष्णोई गँगला दहशतवादी संघटना घोषित करण्याचा निर्णय घेतला. या टोळीवर भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खंडणी, हत्या, शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांच्या तस्करीच्या संबंधित अनेक गुन्हे दाखल आहेत.

मुख्य म्हणजे याच निर्णयावर भाजपा नेत्या व पेशाने सर्वोच्च न्यायालयात वकील असणाऱ्या नाझिया इलाही खान यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी लॉरेन्स बिष्णोई यांचा बचाव केला आहे. त्या नक्की काय म्हणाल्या? यापूर्वीही त्यांनी या कुख्यात गँगस्टरविषयी काय विधान केले होते? जाणून घेऊयात.

काय म्हणाल्या नाझिया खान?

भाजपा नेत्या नाझिया खान म्हणाल्या, “लॉरेन्स बिष्णोईची टोळी गुन्हा केल्यामुळे चर्चेत आलेली नसून, ही टोळी आपल्या धर्माला वाचवण्यासाठी केलेल्या गुन्ह्यांमुळे चर्चेत आली आहे. काही गुन्हेगारांचा व्यवसायच गुन्हेगारी असतो आणि काही गुन्हेगार दबावामुळे वा इतर कारणास्तव गुन्हेगारीच्या दिशेने वळतात. आम्हाला गुन्हेगारांवर संशोधन करून प्रबंध (थिसीस) लिहावे लागतात. त्यामुळे आम्हाला कोण गुन्हेगार असतो हे माहित आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “बिष्णोई टोळी आपल्या धर्माला सन्मान करत असल्यामुळे गुन्हेगारीकडे वळली. बिष्णोईचे जीवन साध्या वकिलांसारखे राहिले असते, कारण तो वकिली क्षेत्रातील होता. कदाचित तो कपिल सिब्बल होऊ शकला असता, मनू सिंघवी होऊ शकला असता किंवा नाझिया इलाही खान होऊ शकला असता. परंतु, त्याने आपल्या धर्माला प्राधान्य दिले. कदाचित सरकार त्याला योग्यप्रमाणे मदत करू शकली नाही किंवा त्याच्या भावना समजू शकली नाही आणि त्यामुळेच त्याने कायदा हातात घेतला. “

त्या पुढे म्हणाल्या, “बिष्णोई टोळीला दहशतवादी संघटना तो देश घोषित करीत आहे, ज्याचे स्वतःचे अस्तित्व नाही, ज्याची आर्थिक स्थिती कमकुवत आहे.” कॅनडामध्ये अनेक गुन्हेगारी घटना घडतात, अनेक गुन्हेगारी टोळ्या आहेत, त्यावर त्यांचे सरकार का कारवाई करीत नाही, असा प्रश्नही त्यांनी केला. त्यांनी कॅनडात घडणाऱ्या घटनांविषयीदेखील सविस्तर सांगितले. इतकेच नव्हे, तर खान यांनी कॅनडातील खलिस्तानींवरही टीका केली. खलिस्तानींना बिष्णोई टोळीची भीती असल्याचेही त्यांनी म्हटले. त्या म्हणाल्या, “कॅनडा सरकार खलिस्तान्यांना आश्रय देत आहे. त्यांनी खलिस्तानी संघटनेवर आक्षेप घेतला किंवा कारवाई केली, तर सरकारमधील नेत्यांवर त्यांचा प्रमुख पन्नू गोळ्या झाडेल.”

यापूर्वीही घेतली होती बिष्णोईची बाजू

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात लॉरेन्स बिष्णोईचे नाव आल्यानंतर नाझिया खानने मोठे विधान केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, काही लोक लॉरेन्स बिष्णोईच्या प्रकरणाबाबत इतके बोलत आहेत की, जणू काही त्याने १९९३ च्या बॉम्बस्फोटासारखे काहीतरी घडवून आणले आहे. आपण दाऊद इब्राहिमचा १९९३ चा बॉम्बस्फोट विसरणार का?, असा प्रश्नही त्यांनी केला. एका पाकिस्तानी यूट्यूबरशी बोलताना नाझिया इलाही खान पुढे म्हणाल्या, “लॉरेन्स बिष्णोईने सलमान खानला शिवीगाळ केलेली नाही. तसेच तो मुस्लीम समुदायाबद्दल काहीही वाईट बोलला नाही. सलमान खानने केवळ बिष्णोई समुदायाची माफी मागावी, अशी लॉरेन्स बिष्णोईची इच्छा आहे.”

नाझिया इलाही खान यांनी यापूर्वी क्रिकेटपटू शिवम दुबे यांची पत्नी अंजुम खान हिच्याशी सोशल मीडिया साइट ‘एक्स’वर इस्लामबद्दल केलेल्या विधानावरून वाद घातला होता. नाझिया इलाही खान या भाजपाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या सदस्या आहेत. त्या हँडलूम विव्हिंग सेलच्या राज्य समिती सदस्य आणि कामगार सेलच्या राष्ट्रीय निरीक्षकदेखील आहेत.

कोण आहे लॉरेन्स बिष्णोई?

लॉरेन्स बिष्णोईचा जन्म पंजाबमधील उच्चभ्रू कुटुंबात झाला आहे. अबोहर इथल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये त्याने शिक्षण घेतले. त्याचे आई-वडील लविंदर आणि सुनीता सुरुवातीपासूनच श्रीमंत होते. त्यांची वडिलोपार्जित शेकडो एकर जमीन आहे. तसेच लॉरेन्सचे कुटुंबीय प्रतिष्ठित पदावर कार्यरत आहेत. लविंदर हे पोलीस हवालदार पदावर कार्यरत होते. त्याच्या वडिलांना त्याला पोलीस अधिकारी करायचे होते; पण लॉरेन्सने वेगळा मार्ग निवडला. महाविद्यालयात असतानाच त्याने विद्यार्थी संघटना स्थापन केली होती. त्या माध्यमातून पुढे त्याने टोळी उभी केली. चंदिगडमध्ये शिक्षणासाठी गेल्यावर लॉरेन्सचा गुन्हेगारी क्षेत्रात शिरकाव झाला. त्याच्या नावावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.

सिद्धू मुसेवाला हत्येतही हात

प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येच्या प्रकरणातही लॉरेन्स बिष्णोईचा सहभाग होता, अशी माहिती समोर आली होती. त्या २०२२ मध्ये घडलेल्या प्रकरणानंतर बिष्णोई टोळी चर्चेत आली होती. पंजाबमधील गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा कॅनडास्थित साथीदार गोल्डी ब्रार याने सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. या हत्येनंतर बिष्णोई टोळी प्रथम देशपातळीवर चर्चेत आली होती.