नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे व त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडणारे भाजपचे आमदार सुरेश धस या बीड जिल्ह्यातील दोन नेत्यांमध्ये मनोमीलन घडवून आणण्याचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला प्रयत्न त्यांच्यासाठी राजकीय अडचणी वाढवणारा ठरण्याची शक्यता आहे , विरोधी पक्षाने या मुद्यावर भाजपवर टीका केली आहे.
धस हे भाजपचे आमदार आहेत, व ते महायुतीच्या घटक पक्षातील मंत्र्यावर आरोप करीत असेल तर भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून वाद मिटवण्याचा प्रयत्न म्हणून मी धस आणि मुंडे यांच्यात मनोमीलन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. यात काही गैर नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले असले तरी मुंडेंच्या भेटीची वाच्यता बावनकुळे यांनी का केली ? असा प्रश्न धस यांनी उपस्थित करून प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्त्येचा मुद्दा धस यांनी विधानसभेत आणि रस्त्यावर आंदोलन करून जनतेसमोर मांडला. तो मांडताना या प्रकरणातील आरोपींचे राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी असलेले संबंध सुद्धा त्यांनी जाहीरपणे सांगितले, यासोबत मुंडेचे अनेक कथित घोटाळ्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले. सरपंच हत्ये प्रकरणात धस यांनी घेतलेला पुढाकार हा भाजपपासून दुरावलेल्या मराठा समाजाला जोडण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. नुकताच आष्टी मतदारसंघात एका कार्यक्रमात फडणवीस यांच्या उपस्थितीत धस यांनी ‘मेरे पास फडणवीस है’ असा दिवार स्टाईल डॉयलॉग उपस्थितांना ऐकवला. त्यामुळे धस यांच्या मोहिमेला फडणवीस यांचा पाठिंबा आहे, असे चित्र राजकीय वर्तुळात निर्माण झाले. फडणवीस -धस जवळीक वाढत असतानाच अचानक धस आणि मुंडे यांची भेट झाल्याची बातमी आली. खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच हा गौप्यस्फोट केला. साडेचार तास त्यांच्या निवासस्थानी बैठक झाल्याचा दावा केला. मनभेद दूर करण्यास मी त्यांना सांगितले. यावेळी मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणाची चर्चा झाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आणि तेथूनच या प्रकरणाच्या चर्चेला तोंड विविध अंगाने तोंड फुटले आणि चर्चेच्या केंद्रस्थानी ठरले ते बावनकुळे.

मराठा समाजाला धक्का

बावनकुळे यांच्या गौप्यस्फोटाने मराठा समाजाला धक्का बसला, अशी प्रतिक्रिया समाजाचे नेते जरांगे पाटील यांच्या वक्तव्यातून पुढे आली. धस-मुंडे भेट हा जसा मराठा समाजाला धक्का होता तसाच तो हे प्रकरण लावून धरणारे आणि यानिमित्ताने मराठा समाजाची सहानुभूती मिळवणारे धस यांच्यासाठीही होता. त्यामुळे त्यांची संतप्त प्रतिक्रिया येणे स्वाभाविक होते. ती तशी आलीही, ‘ माझा कोणी तरी गेम करीत आहे’ ही त्यांची प्रतिक्रिया बोलकी ठरली. त्यांचा बोलण्याचा रोख कोणाकडे होता हे अद्याप स्पष्ट झाले नाही, पण ज्यांनी ही भेट घडवून आणली त्या बावनकुळे यांच्या भूमिकेवर चर्चा सुरू झाली.

फडणवीस यांची अडचण ?

आमदार सुरेश धस ज्या आक्रमकपणे सरपंच हत्या आणि मुंडेंच्या भ्रष्टाचार प्रकरणाची सप्रमाण पोलखोल करीत होते, त्यावरून त्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांचा पाठिंबा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती, धस-मुंडे प्रकरणात समझोता करण्याचे सुतोवाच सर्वप्रथम बावनकुळे यांनी केले होते, तेव्हाही फडणवीस यांच्या सूचनेवरूनच बावनकुळे यांनी हे केले असावे, अशी चर्चा होती. दोन्ही नेत्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट झाल्यानंतर त्यांचा काही महिन्यानंतर सार्वजनिकरित्या माध्यमांसोबत गौप्यस्फोट करणे हे सुद्धा बावनकुळे कोणाच्या सांगण्याशिवाय करणार नाही, अशीही चर्चा होती. त्यामुळे एकूणच या प्रकरणात फडणवीस यांच्या नावाची चर्चा होत आहे, हे येथे उल्लेखनीय.

‘कुच्छ तो गडबड है” – वडेट्टीवार

“धस-मुंडे यांच्यात झालेली भेट चार तासाची होती की चार मिनिटाची. पण ही भेट झाली हे खरे आहे . या बैटकीत समझोता झाला नाही, असा दावा भाजप नेते करीत आहे. मग ही भेट परस्परांचे चुंम्बन घेण्यासाठी होती का ? डोळ्यावरील शस्त्रक्रिया सामान्य बाब आहे, यासाठी मुंडे यांना मंत्रिमंडळातील एकही जण गेला नाही. त्यामुळे यात ‘कुछ तो गडबड है’, स्वत:धस हेच प्रदेशाध्यक्षांसंदर्भात प्रश्न निर्माण करीत आहे. ते कोणाच्या इशाऱ्यावर ही हिंमत दाखवत आहे हे बावनकुळे यांनी शोधून काढावे” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते विजय व़डेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader chandrashekhar bawankule trouble dhananjay munde suresh dhas meeting print politics news css