ओडिशाच्या बालेश्वर जिल्ह्यातील निलगिरी मतदारसंघाचे आमदार व भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) ज्येष्ठ नेते संतोष खटुआ यांनी केलेल्या एका वक्तव्याने ओडिशातील राजकारण तापले आहे. त्यांनी बिजू जनता दलाच्या (बीजेडी) एका महिला नेत्यावर केलेल्या लैंगिक स्वरूपाच्या टिप्पणीने हा वाद निर्माण झाला आहे. बीजेडी प्रमुख व ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शुक्रवारी (४ जुलै) भाजपा आमदार संतोष खटुआ यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यांनी बीजेडीच्या लेखाश्री सामंत सिंगार यांच्यावर केलेल्या टीकेला अत्यंत दुर्दैवी आणि अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. हे नेमके प्रकरण काय? भाजपा आमदाराच्या अटकेची मागणी का होत आहे? त्यावर नवीन पटनायक काय म्हणाले? त्याविषयी जाणून घेऊयात.
नवीन पटनायक यांची प्रतिक्रिया
‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये बीजेडी प्रमुख नवीन पटनायक म्हणाले, “भाजपा आमदार संतोष खटुआ यांनी एका बीजेडी महिला नेत्याविरुद्ध केलेली अपमानास्पद टीका अत्यंत दुर्दैवी आणि पूर्णपणे अस्वीकार्य आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी महिलेचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यातून त्याची विकृत मानसिकता दिसून येते. हा महिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे.” भाजपा नेते त्यांच्या वक्तव्यावर मौन बाळगून असल्याचे सांगत पटनायक म्हणाले, “अशा निंदनीय वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी एकही नेता पुढे आलेला नाही. हे मौन सत्ताधारी पक्षाची सार्वजनिक भूमिका स्पष्टपणे दर्शवते.”
गेल्या वर्षीच्या निवडणुकीत भाजपाच्या विजयानंतर पटनायक यांची मुख्यमंत्री म्हणून २४ वर्षांची कारकीर्द संपुष्टात आली. त्यांनी भाजपावर महिलांचा आदर न केल्याबद्दल वारंवार टीका केली आहे. ते म्हणाले, “निवडून आलेल्या प्रतिनिधीकडून असे अपमानजनक शब्द ऐकणे पूर्णपणे असह्य आहे. इतक्या लज्जास्पद पातळीला जाणे हे ओडिशाच्या राजकारणात दुर्मीळ आहे.”
बीजेडीच्या महिला नेत्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली?
बीजेडी नेत्या लेखाश्री सामंत सिंगार यांनीही एक्सवर टीका केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत केलेल्या एका पोस्टमध्ये लिहिले, “प्रिय मोदीजी कृपया ओडिशातील तुमच्या आमदाराचे महिला राजकारण्यांबद्दलचे बोलणे ऐका. ते ऐकल्यानंतर तुम्हाला अजूनही ‘नारी का सम्मान’ किंवा ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलायचे आहे का ते पाहूया,” असे त्या म्हणाल्या. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महिलांनी आपले पती गमावले होते, त्यांच्या सन्मानाचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवविले होते. या हल्ल्यात अनेकांना त्यांच्या धार्मिक ओळखीमुळे दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. सामंत सिंगार म्हणाल्या की, भाजपाच्या महिलांबद्दलच्या वृत्तीमुळे राज्यात हिंसक गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. “जर तुम्ही महिलांबद्दल असे वक्तव्य करणाऱ्या प्रतिनिधींविरोधात कारवाई करण्यात अयशस्वी ठरलात, तर महिलांबद्दलचे तुमचे वचन चुकीचे ठरेल,” असे त्या म्हणाल्या.
बीजेडी नेत्या सामंत सिंगार यांनी खटुआ यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि म्हटले की, महिलांची प्रतिष्ठा आणि सन्मानाचे रक्षण करण्यासाठी संविधानात पुरेशा तरतुदी आहेत. त्या म्हणाल्या, “भाजपा महिलांबद्दलचा द्वेष करणारा, महिलांविरोधी आहे आणि महिलांना समाजात समान स्थान मिळावे, असे त्यांना वाटत नाही. आम्ही याचा निषेध करतो आणि कामाच्या ठिकाणी महिलांचा सन्मान परत मिळविण्यासाठी आम्ही सर्व पावले उचलू. बीजेडी नेहमीच महिलांसाठी समान संधी आणि सुरक्षिततेसाठी लढत आली आहे. कोणत्याही महिलेला नाव ठेवणे अत्यंत निंदनीय आहे.”
खटुआ यांच्याविरोधात तक्रार दाखल
अद्याप बीजेडी नेत्यांच्या टीकेला भाजपा नेत्यांनी उत्तर दिलेले नाही. सामंत सिंगार यांनी शुक्रवारी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यात खटुआ यांच्याविरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप केला आहे. वरिष्ठ बीजेडी नेत्यांसह सामंत सिंगार यांनी भुवनेश्वरमधील महिला पोलीस ठाण्याला भेट दिली आणि आमदाराविरोधात तक्रार दाखल केली. त्यांनी तक्रारीत, “खटुआ यांनी केवळ मला कमी लेखले नाही, तर ओडिशा आणि भारतातील प्रत्येक महिला, तसेच सर्व महिला राजकीय नेत्यांवर टीका केली आहे. त्यांच्या वक्तव्यांनी ते इतके खालच्या पातळीवर गेले आहेत की ते येथे सांगणेही माझ्यासाठी कठीण आहे,” असे म्हटले आहे.