नागपूर : ज्यांच्यावर महाराष्ट्र ऑलंपिक असोसिएशनमघील भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा आरोप केला, त्याच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची वेळ नागपूरमधील भाजप आमदार व मुख्यमंत्र्यांचे विश्वासू संदीप जोशी यांच्यावर आली. जोशींच्या निमित्ताने ऑलंम्पिक असोसिएसनवर प्रथमच विदर्भाला प्रतिनिधीत्व मिळाले असले तरी अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपांचे काय झाले ? की, ते दबावाच्या राजकारणाचा एक भाग होता, असा प्रश्न यातून निर्माण होतो.
नागपूरचे माजी महापौर, भाजपचे विद्यमान विधान परिषद सदस्य संदीप जोशी यांची राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची २०२५–२०२९ या कालावधीसाठीची नवी कार्यकारिणी जाहीर झाली. असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजित पवार यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली.याच कार्यकारिणीत आणखी एक नागपूरकर अरुण लखाणी यांची कोषाध्यक्षपदीपदी वर्णी लागली. महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशच्या इतिहासात प्रथमच वैदर्भीयांना या संघटनेत संधी मिळाली.
पश्चिम महाराष्ट्रातील नेतृत्व विदर्भावर कायम अन्याय करते असा आरोप करणाऱ्या वैदर्भीय नेत्यांच्याच हाती सध्या राज्याची सत्ता सुत्रे आहेत. क्रीडा संघटनांवरील पश्चिम महाराष्ट्रातील वर्चस्व मोडून काढण्याच्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेच्या उपाध्यक्षपदी संदीप जोशी यांच्या निवडीकडे बघितले जाते. विशेष म्हणजे क्रीडा संघटनांमध्ये राजकारण नको, असा घोष करणाऱ्यांनाच महाराष्ट् ऑलम्पिक संघटनेवर प्रतिनिधीत्व मिळावे म्हणून शेवटी ‘ राजकारणातील डाव’ टाकावे लागले . हे महत्वाचे.
महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनची निवडणूक ही केवळ एका क्रीडा संघटनेची निवडणूक नव्हती, तर ती महायुतीतील भाजप आणि मित्रपक्ष राष्ट्रवादी यांच्यातील राजकीय वर्चस्वाची लढाईऑहोती. अनेक वर्षापासून या संघटनेचे अध्यक्षपद सांभाळणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्र अजित पवार यांना थेट भाजपनेच आव्हान दिले. पुण्याचे खासदार व केद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पवार यांच्या विरोधात अर्ज दाखल केला. त्यानंतर नागपूरकर भाजप आमदार संदीप जोशी यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. हे दोघेही कट्टर फडणवीस समर्थक. एक पुण्याचा आणि दुसरा नागपूरचा. त्यामुळे या निवडणुकीतील फडणवीस यांचा पडद्याआडचा सहभाग लपून राहिला नाही.
प्रत्यक्ष मतदानाला काही दिवस शिल्लक असताना संदीप जोशी यांनी पुण्यात जाऊन या निवडणुकीतील अध्यक्षपदाचे उमेदवार अजित पवार यांच्यावर ते संघटनेतील भ्रष्ट पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालतात ,असा आरोप केला. जोशी यांचे हे धाडस त्यांच्या नागपूर कनेक्शनच्या पाठिंब्याचे एक प्रकारे संकतेच होते. जोशींच्या आरोपाला अजित पवार यांच्या गटाकडून प्रतिउत्तर देण्यात आले. ते देताना ‘ वर्षा’वर झालेल्या बैठकांचा दाखला देण्यात आला. हे प्रकरण अधिक पुढे ‘वेगळ्या’ वळणावर जाण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून निवडणूकच अविरोध घडवून आणली.
अजित पवार पुन्हा महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेचे बिनविरोध अध्यक्ष झाले. ज्यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचे आरोप केले त्याच संदीप जोशी यांची नियुक्ती त्यांनी संघटनेच्या उपाध्यक्षपदी केली. विशेष म्हणजे जोशी यांनीही ती स्वीकारली. ज्यांच्यावर आरोप करायचे त्यांच्यासोबतच काम करायचे हा नवा फंडा यानिमित्ताने दिसून आला. यातून एकच गोष्ट दिसून येते काहीही करा पण सत्ता मिळवा,ची शक्य नसेल तर किमान त्यात भागीदार तरी व्हा. ती राज्यातील असो, किंवा क्रीडा संघटनांमधली.
