काही दिवसांपूर्वीच उत्तराखंडमधील भाजपाचे माजी आमदार सुरेश राठोड यांनी स्थानिक अभिनेत्री उर्मिला सनावर यांना पत्नी म्हणून सर्वांदेखत जाहीर केलं. त्यानंतर सुरेश राठोड हे राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी सापडले आहेत. १५ जून रोजी आयोजित एका पत्रकार परिषदेत उर्मिला सनावर यांच्यासोबत राठोड यांनी लग्न केल्याचे जाहीर केले होते. राठोड यांच्या या निर्णयामुळे उत्तराखंडच्या राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी राठोड यांनी त्यांची पत्नी रवींद्र कौर हिला घटस्फोट न देताच दुसरे लग्न केले याबाबत त्यांच्यावर टीका केली. काँग्रेसने राठोड यांच्यावर समान नागरी संहिता विरुद्ध जाण्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर भाजपाने राठोड यांना त्यांच्या वागणुकीबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट यांनी नोटीस बजावली होती, तर सरचिटणीस राजेंद्र बिष्ट यांनीही हे प्रकरण पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवत असल्याचे म्हटले आहे.

पक्षाने नोटीस बजावल्यानंतर देहारादूनला पोहोचल्यावर पक्षाच्या नोटिसीला राठोड यांनी उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी माध्यमांनाही मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी दुसरे लग्न केल्याचे पूर्णपणे नाकारले आहे. त्याऐवजी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवरून आणि पुराव्यांवरून त्यांनी प्रश्नचिन्हही उपस्थित केलं आहे. माध्यमांनी याबाबत विचारले असता राठोड म्हणाले की, “तुम्ही मला लग्न करताना पाहिलं का, कुकूं लावताना पाहिलंत का किंवा हार घालतानाचा कोणताही व्हिडीओ पाहिला आहे का? मग हा मुद्दा का उपस्थित केला जात आहे?” राठोड यांनी मोठ्या प्रमाणात शेअर केले गेलेले फोटो हे कथित लग्नाचे असल्याचा दावाही केला आहे. ते प्रत्यक्षात चित्रपटाचे शूटिंग होते असं राठोड यांनी सांगितलं आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हा फोटो भाभीजी विधायक है या चित्रपटातील एका दृश्यादरम्यानचा फोटो असल्याचा दावा राठोड यांनी केला आहे.

भाभीजी विधायक है… हे कारण नवीन नाही

भाभीजी विधायक है याचा काहीच संदर्भ नाही. गेल्या वर्षी एका व्हिडीओमध्ये सुरेश राठोड एका महिलेचे केस विंचरताना दिसले होते. त्यानंतर ती उर्मिला नावाची एक महिला असल्याची ओळख सांगण्यात आली. त्यावेळी राठोड यांनीही असेच स्पष्टीकरण दिले होते की, हा व्हिडीओ त्याच चित्रपटातील एका दृश्याचा असल्याचे सांगितले होते. त्या व्हिडीओचा वास्तविक आयुष्यात काहीच संबंध नाही असे ते म्हणाले होते.
“सहारनपूरमधील उर्मिला नावाची ही महिला वैवाहिक समस्यांना तोंड देत होती आणि व्हिडीओ त्यांच्याविरुद्ध कट रचण्याचा भाग म्हणून वापरला जात होता”, असेही त्यावेळी राठोड यांनी म्हटले होते. मात्र, त्यावेळी उर्मिला यांनी दावा केला होता की, हे दृश्य कुठल्याही चित्रपटातले नव्हते. तो व्हिडीओ त्यांनी स्वत: रेकॉर्ड केलेला होता आणि राठोड तिचे पती आहेत असेही तिने सांगितले होते. ते लवकरच आपल्याला सार्वजनिकरित्या पत्नी म्हणून स्वीकारतील असेही त्यावेळी या महिलेने सांगितले होते.

नेमकं प्रकरण काय?

भाजपाचे माजी आमदार सुरेश राठोड यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचे आणि उर्मिला सनावर यांचे हार घातलेले फोटो प्रसिद्ध केले होते. त्यावेळी त्यांनी दुसरे लग्न केल्याचे जाहीर करत याबाबत माहिती दिली होती. त्यांच्या या कृतीनंतर पक्षातून तसंच विरोधी पक्षातून त्यांच्यावर खूप टीका झाली, कारण हे काही पहिल्यांदाच होत नव्हते. दीड वर्षांपूर्वी अभिनेत्री उर्मिला सनावर यांनी भाजपाचे माजी आमदार सुरेश राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राठोड यांनी मला प्रेमाच्या जाळ्यात ओढून माझ्याशी शारीरिकसंबंध ठेवले, त्यानंतर मला नेपाळला नेऊन माझ्यासोबत गंधर्व विवाह केला. मात्र, लग्नानंतर ते माझ्यापासून दूर गेले आणि मी एकटी पडले, असं उर्मिला सनावर यांनी म्हटलं होतं. या आरोपांनंतर उर्मिला यांनी दोघांचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते आणि यामध्ये काही खाजगी फोटोंचाही समावेश होता. त्याचबरोबर अभिनेत्रीने राठोड यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोपही केला होता.

काँग्रेसच्या दुटप्पीपणावर राठोड यांची टीका

सुरेश राठोड यांच्यावर राजकीय वर्तुळात टीका होत असतानाच त्यांनी काँग्रेसवर उलट टीका केली आहे. राठोड म्हणाले की, जर पक्षाला व्हिडीओमध्ये एवढाच रस असेल तर त्यांनी त्यांच्याच नेत्यांशी संबंधित क्लिप्स तपासाव्यात. त्यातही खासकरून एन डी तिवारी, हरक सिंग रावत आणि हरीश रावत यांचे नाव त्यांनी घेतले आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  • सुरेश राठोड यांनी पलटी मारण्याचे कारण म्हणजे कायदेशीर कचाट्यात ते अडकू शकतात
  • जानेवारी २०२५ पासून उत्तराखंड सराकरने समान नागरी कायदा लागू केला
  • कायद्याने एकापेक्षा अधिक विवाह करण्यावर बंदी
  • सुरेश राठोड आणि उर्मिला यांचा विवाह कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची भीती
  • दोघेही विवाहीत असून घटस्फोट न घेता दुसरा विवाह

एन डी तिवारी यांचा भूतकाळ

सुरेश राठोड यांनी एन डी तिवारी यांचा उल्लेख करत दोन मोठ्या वादग्रस्त प्रकरणांचा संदर्भ दिला आहे, त्यामुळे दिवंगत नेत्याच्या कारकि‍र्दीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. २००९ मध्ये आंध्र प्रदेशचे राज्यपाल असताना एका तेलुगू वाहिनीने राजभवनात तीन महिलांसोबत एन डी तिवारी यांना आक्षेपार्ह स्थितीत दाखवणारी एक व्हिडीओ क्लिप प्रसारित केली होती. त्यानंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने या वाहिनीला क्लिप प्रसारित करणे थांबवण्याबाबतचे आदेश दिले. अखेर तिवारी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता.
२००७ मध्ये एन डी तिवारी पुन्हा एकदा चर्चेत आले. रोहित शेखर तिवारी यांनी एन डी तिवारी यांचा मुलगा असल्याचा दावा केला होता. दीर्घ कायदेशीर लढाईनंतर तिवारींनी अखेर २०१४ मध्ये रोहित ३५ वर्षांचा असताना त्याला बायोलॉजिकल मुलगा म्हणून स्वीकारले. ८८ व्या वर्षी एन डी तिवारी यांनी लखनऊमध्ये त्यांचा मुलगा रोहित शेखरची आई उज्ज्वला शर्माशी लग्न केले. अखेर वयाच्या ९२ व्या वर्षी एन डी तिवारी यांचे निधन झाले