आयुष्याच्या प्रवासात नशिबाची साथ ही फार महत्वाची असते. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर यांचा राजकीय प्रवास असाच आहे. पती आधी आमदार म्हणून निवडून आले होते. तोपर्यंत त्यांचा राजकारणाशी फारसा संबंध नव्हता. पण पती लोकसभेवर निवडून आल्यावर पतीच्या जागेवर आमदार म्हणून निवडून आल्या. पतीच्या निधनानंतर खासदारची निवडणूक लढविली आणि तब्बल २ लाख ६० हजार मतांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या बड्या नेत्याचा पराभव केला.
हेही वाचा: मोहन भागवतांच्या कानपिचक्या संघ आणि भाजपामधील अंतर वाढल्याच्या निदर्शक आहेत का?
यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील परमडोह या छोट्याशा गावात त्यांचा सामान्य शेतककरी कुटुंबात जन्म झाला.आर्थिक परिस्थिती अतिशय सामान्य होती. बी.ए. प्रथम वर्षापर्यंत शिक्षण घेतले. भद्रावती येथील मुख्याध्यापकाचा मुलगा बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्याशी मे २००५ रोजी विवाह झाला. बाळू धानोरकर शिवसेनेत होते. त्यांनी वरोरा येथून विधानसभेची निवडणूक लढवून ती जिंकली होती. त्यावेळी प्रतिभा धानोरकर पतीसोबत प्रचारात होत्या. २०१९ मध्ये बाळू धानोरकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून कॉग्रेस पक्षात प्रवेश केला चंद्रपूरची लोकसभा निवडणुक लढवली व जिंकली. त्यामुळे वरोरा विधानसभेची जागा रिक्त झाली. इथवरच्या प्रवासात श्रीमती धानोरकर यांनी राजकारण अतिशय जवळून बघितले होते. त्यामुळे कॉग्रेस पक्षातील स्थानिक नेत्यांच्या विरोधानंतरही त्यांनी पत्नी प्रतिभा धानोरकर यांना विधानसभेची उमेदवारी मिळवून दिली. . साध्या गृहिणी पासून प्रतिभा धानोरकर थेट आमदार झाल्या. सर्वकाही सुरळीत सुरू असतांना ३० मे २०२३ रोजी खासदार बाळू धानोरकर यांचे अकाली निधन झाले. हा आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी आजवरचा सर्वात मोठा आघात होता. मात्र या आघातातून स्वत:ला सावरत धानोरकर यांनी कॉग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी संघर्ष करीत उमेदवार मिळवली आणि आमदारकीनंतकर आता खासदारकी मिळवली.