कोल्हापूर : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू झाला आहे. डॉ. पाटील हे कोल्हापूरचे रहिवाशी असून कालपासून त्यांच्या चौकशीसाठी पोलीस गेले असता त्यांचा शोध लागला नाही. मालवण येथील शिवपुतळा दुर्घटना प्रकरणी डॉ. पाटील यांच्याविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल झाला. यानंतर त्यांच्या शोधार्थ पोलिसांचा रोख कोल्हापूरकडे वळला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे पथक आणि कोल्हापुरातील पोलिसांचे पथक संयुक्तरित्या संबंधित वास्तुविद्या संरचनाकार डॉ. पाटील यांचा शोध घेत आहेत. अद्याप ते हाती लागले नसल्याचे सूत्रांनी बुधवारी सांगितले.

राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याने पोलिसांनी पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे तसेच वास्तुविद्या संरचनाकार डॉ. चेतन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. डॉ. पाटील हे येथील स्वायत्त विद्यापीठात स्थापत्य अभियंता शाखेत कार्यरत आहेत. ते वास्तुविद्या संरचनाकार म्हणूनही काम पाहतात. चबुतरा बांधकामाची पुतळा बांधकाम सल्लागार कामाची निविदा त्यांनी भरली होती. त्यांच्याकडे सल्लागार म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : SP BSP Alliance : सपा-बसपा एकत्र येणार? भाजपाच्या मायावतींवरील टीकेला अखिलेश यादवांचं उत्तर; नव्या आघाडीची चर्चा, बसपाचेही दरवाजे खुले?

आपटे संपर्काबाहेर

मालवण येथील पुतळा उभारणारे कल्याण मधील शिल्पकार जयदीप आपटे यांच्या कल्याण मधील घराला टाळे आहे. त्यांचा मोबाइल बंद आहे. पुतळा कोसळल्याचा विषय संवेदनशील झाल्याने ते शहराबाहेर असल्याचे समजते.