माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मंगळवारी पासवान यांची जयंती साजरी करण्यात आली. रामविलास पासवान यांच्या निधनानंतर जवळपास दोन वर्षांनी त्यांचे चिरंजीव, खासदार चिराग पासवान आणि भाऊ पशुपती कुमार पारस यांच्यात राजकीय द्वंद्व सुरू झाले आहे. आपणच रामविलास पासवान यांचा खरा राजकीय वारसा चालवत असल्याचा दावा दोघेही करत आहेत. एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याची एकही संधी हे दोघेही सोडत नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हाजीपूरच्या चौहरमल चौकात रामविलास पासवान यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्याची योजना चिराग यांनी आखली आहे, तर पारस हे पक्षाच्या पाटणा कार्यालयात एक कार्यक्रम आयोजित करणार आहेत. त्या कार्यक्रमात पाच हजारांहून अधिक लोकांना अन्न वाटप केले जाणार आहे. पारस यांच्या आरएलजेपीने बिहारमधील जिल्हा मुख्यालयात असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातील अशी घोषणा केली आहे. हाजीपूर येथे पासवान यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर येत्या काही महिन्यांत वडिलांचे पुतळे राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयात बसवण्याची योजना आखली असल्याचे चिरागने पासवान यांनी सांगितले. खगरिया येथील पासवान यांच्च्या शहारबन्नी या मुळ गावातही एक पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हाजीपूरमधून पुतळे उभारण्याच्या मोहिमेला सुरवात करण्याचा चिराग यांचा निर्णय पूर्णपणे राजकीय असल्याची चर्चा सुरू आहे. कारण हाजीपुरचे खासदार चिराग यांचे काका आहेत आणि या मोहिमेच्या माध्यमातून काकांना शह देण्याचा चिराग यांचा प्रयत्न असणार आहे. हाजीपुर हा रामविलास पासवान यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. हाजीपूर मतदार संघातून रामविलास पासवान हे १९७७ मध्ये विक्रमी मताधिक्याने विजयी झाले होते. पासवान यांचा या मतदार संघाशी अनेक वर्षांचा संबंध असून त्यांनी येथून अनेक वेळा निवडणूक लढवली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत रामविलास पासवान यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे या मतदार संघातून त्यांचे बंधू पशुपती कुमार पारस यांना उमेदवारी देण्यात आली.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पासवान यांच्या नेतृत्वाखालील एलजेपीने सहा जागा जिंकल्या होत्या. पासवान यांच्या मृत्यूच्या एका वर्षानंतर एलजीपीमध्ये मोठी फूट पडली. पारस यांनी त्यांचा पुतण्या प्रिन्स कुमार पासवान यांच्यासह पाच खासदारांना घेऊन बंडखोरी केली. पारस हे हाजीपूरचे खासदार असून प्रिन्स समस्तीपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. चिराग आणि पारस यांनी एलजेपी पक्षावर हक्क मिळवण्यासाठी आपापसात दीर्घकाळ लढा दिला. पण अखेरीस पासर यांना नवीन नावावरच समाधान मानावे लागले. मूळ एलजेपीचे बिहार विधानसभेत एकही प्रतिनिधी नाही. त्यांचे एकमेव आमदार राज कुमार सिंह यांनी गेल्या वर्षी जेडी(यू) मध्ये सामील होण्यासाठी राजीनामा दिला होता.

हाजीपूर येथील पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी त्यांनी स्थानिक खासदार आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री असलेले त्यांचे काका पारस यांना आमंत्रित केले आहे का, असे विचारले असता, चिराग यांनी “होय” असे उत्तर दिले. पण पारस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे. पारस यांनी चिराग यांच्या दाव्याचा संदर्भ देत म्हणाले आहेत की “मुलगा त्याच्या वडिलांच्या मालमत्तेचा वारसा घेऊ शकतो, परंतु राजकीय वारसा नाही”.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chirag paswan and his uncle is figthting to own ramvilas paswans political legacy pkd