Chirag Paswan Bihar election 2025 चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (राम विलास) बिहार विधानसभा निवडणुकीत आश्चर्यकारक कामगिरी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवंगत राम विलास पासवान यांच्या राजकीय वारसा हक्कासाठी संघर्ष करत असताना चिराग पासवान यांना अनेक अडथळे आणि अडचणींचा सामना करावा लागला, पण बिहार निवडणुकीतील कामगिरीमुळे त्यांनी आपला प्रभाव निर्माण केला आहे. स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘हनुमान’ म्हणवणारे चिराग पासवान आज बिहारच्या राजकारणातील एक महत्त्वाचा चेहरा ठरत आहेत. चिराग पासवान यांचा राजकीय प्रवास कसा राहिला? त्यांनी कोणत्या आव्हानांचा सामना केला? निवडणुकीतील त्यांच्या दमदार कामगिरीमागे कोणती कारणे आहेत? समजून घेऊयात….
चिराग पासवान यांचा राजकीय प्रवास
राज्यातील दलित समाजाचे दिग्गज नेते, दिवंगत राम विलास पासवान यांच्या निधनानंतर पाच वर्षांनी आणि लोक जनशक्ती पक्षात (एलजेपी) फूट पडल्यानंतरही चिराग यांनी त्यांच्या लोक जनशक्ती पक्ष (रामविलास)ला पक्षाच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीच्या जवळ नेले आहे. यापूर्वी २००५ मध्ये लोक जनशक्ती पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. २००५ च्या निवडणुकीत पक्षाने २९ जागांवर विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीतही एनडीएने एलजेपीला २९ जागा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. निकालाने चिराग यांनी हे सिद्ध केले आहे की, भाजपा नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास ठेवून योग्य निर्णय घेतला.
राम विलास पासवान हयात असताना चिराग राजकारणात आले, तरी त्यांचा प्रवास सोपा नव्हता. त्यांच्या वडिलांच्या अधिकृत निवासस्थानी त्यांना स्मारक तयार करायचे होते, परंतु तेथून त्यांना जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले. राजकीय स्तरावर, त्यांना त्यांच्या दोन्ही काकांकडून विरोध सहन करावा लागला. उत्तराधिकार युद्धात भाजपाने सुरुवातीला त्यांचे काका पशुपती कुमार पारस यांना झुकते माप दिले आणि त्यांना केंद्रीय मंत्री केले, पण या गोष्टींमुळे चिराग डगमगले नाहीत.
तसेच, २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या युतीमध्ये त्यांना एनडीएमधून बाहेर ठेवण्यात आले होते. हे जेडीयूच्या आग्रहामुळे घडले, असे सांगण्यात येते. एलजेपीमध्ये फूट पडल्यानंतर, निवडणूक आयोगाने राम विलास पासवान यांनी दिलेले पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवले, ज्यामुळे चिराग यांना त्यांच्या गटासाठी एलजेपी (राम विलास) हे नाव निवडावे लागले. बिहार निवडणुकीत एक जागा मिळवण्यासाठीही ते संघर्ष करत असल्याचे शेवटच्या आकडेवारीवरून दिसून आले.
चिराग पासवान यांचा राजकारणात उदय
चिराग यांनी भाजपाशी असणारी आपली निष्ठा जाहीर केली, तसेच गरज पडल्यास अल्पसंख्याक प्रश्नांवर पक्षाविरुद्ध मत मांडल्याने ते राज्याच्या विकासासाठी स्पष्ट दृष्टी असलेला एक तरुण नेता म्हणून समोर आले. पंतप्रधान मोदी गेल्या वर्षी पुन्हा सत्तेत आल्यानंतर चिराग यांना केंद्रीय मंत्री म्हणून समाविष्ट करून भाजपाने त्यांना त्यांच्या वडिलांच्या राजकीय वारसाचे दावेदार म्हणून स्वीकारले. परंतु, बिहार निवडणुकांच्या आधी चिराग यांनी बिहारच्या राजकारणात परत येण्याची इच्छा व्यक्त केली आणि मुख्यमंत्री पदासाठीदेखील ते उत्सुक असल्याचे दर्शवले.
आपण राजकारणात ‘फक्त बिहार आणि बिहारमधील लोकांसाठी’ आलो असल्याचे जाहीर केले. चिराग यांनी निवडणूक प्रचारादरम्यान ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “मी मुंबईत काम करत होतो आणि तिथे स्थायिक झालो होतो. बॉलिवूडला आणखी काही वर्षे दिली असती, तर मी चांगले नाव कमावले असते. राजकारणात येण्याचे एकमेव कारण म्हणजे, मी देशाच्या इतर भागांमध्ये बिहारच्या लोकांना कशी वागणूक मिळते, त्यांचा कसा अपमान केला जातो, हे जवळून पाहिले. ‘बिहारी’ हे नावच एक प्रकारे शिवी बनवण्यात आले. तीन वेळा खासदार असताना, माझ्या लक्षात आले की दिल्लीत बसून मी बिहारच्या लोकांसाठी फार काही करू शकत नाही आणि मला राज्यात परत जावे लागेल.”
त्यांनी ‘बिहार फर्स्ट आणि बिहारी फर्स्ट’ यासाठी ‘व्हिजन डॉक्युमेंट’वर आपण काम करत असल्याचे जाहीर केले. चिराग म्हणाले की, “नोकरीच्या संधी निर्माण करणे, महसूल वाढवणे, आरोग्य सुविधा सुधारणे, शिक्षण पायाभूत सुविधा चांगल्या करणे आणि राज्याचा संपूर्ण विकास करणे, यावर त्यांना काम करायचे आहे.” भाजपा नेत्यांनी चिराग यांच्या जागावाटपाच्या वाटाघाटीत दाखवलेल्या परिपक्वतेची प्रशंसा केली, ज्यामुळे त्यांना २९ जागा मिळाल्या. प्रचारादरम्यानही, भाजपा नेत्यांनी चिराग पासवान यांच्या सार्वजनिक सभांना मिळणारी चांगली गर्दी लक्षात घेतली होती. त्यांच्या पक्षाने दिलेल्या आकडेवारीनुसार, १७३ सभा घेऊन, चिराग यांनी राज्यातील सर्व प्रचारकांमध्ये सर्वाधिक रॅलींना संबोधित केले.
चिराग पासवान यांचा बिहारमधील वाढता प्रभाव
चिराग यांनी घेतलेल्या सभांची संख्या हेदेखील दर्शवते की ते एनडीएसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि जेडीयूचे प्रमुख तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह बिहारमधील पाच सर्वात लोकप्रिय प्रचारकांपैकी एक होते. “चिराग एक असा चेहरा आहेत जे भविष्यात जात आणि वर्ग भेद मोडून पुढे येऊ शकतात. ते तरुण, आकर्षक आहेत आणि महत्त्वाकांक्षी लोकांच्या कल्पनाशक्तीला जाणू शकतात,” असे एका भाजपा नेत्याने सांगितले.
चिराग यांनी स्वतः याला त्यांचा ‘MY’ फॉर्म्युला (महिला आणि युवा समर्थन) म्हटले. त्यांचा हा फॉर्म्युला आरजेडीच्या मुस्लिम-यादव (MY) फॉर्म्युलाच्या विरोधात आहे. आरजेडीसाठी ही चिंतेची बाब आहे, कारण यामुळे त्यांचे प्रमुख तेजस्वी यादव यांच्या युवकांमध्ये असलेल्या प्रतिमेवर प्रभाव पडू शकतो. तेजस्वी यादव बेरोजगारी आणि विकास हे मुद्दे मांडत आहेत आणि त्यांचे वडील लालूप्रसाद यांच्या राजवटीपासून स्वतःला वेगळे करत आहेत.
भाजपाने नितीश यांच्यावरील राजकीय वर्चस्वासाठी त्यांचा वापर केला, या दाव्यांना चिराग यांनी फेटाळून लावले आहे. त्यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले, “महाआघाडीचे हेच काम आहे. ते अशा युतीतील लोक आहेत ज्यांना साध्या जागावाटपासाठीही आधार सापडत नाही आणि ते आमच्यावर टीका करत आहेत. एनडीए मित्रपक्षांमध्ये फूट आहे, असा एक भावनिक आणि राजकीय ‘नॅरेटिव्ह’ त्यांना तयार करायचा आणि पसरवायचा आहे. कारण त्यांना माहित आहे की आम्ही एकत्र असताना ते आम्हाला हरवू शकत नाहीत.”
