सोलापूर : राज्यात सत्ताधारी महायुतीमध्ये वाद उफाळून येत असताना इकडे सोलापूर जिल्ह्यातही मोहोळ तालुक्यात अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यावरून महायुतीमध्ये टोकाचा संघर्ष सुरू आहे. आश्चर्य म्हणजे यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीने अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाले असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नव्या अप्पर तहसील कार्यालयाच्या मंजुरीला स्थगिती देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे शिंदे-पवार यांच्यात पेच निर्माण झाल्याचे दिसून येते. भाजपने या घडामोडीत ‘नरो वा कुंजरो वा’ ही भूमिका घेतल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.
मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वजनदार नेते, माजी आमदार राजन पाटील- अनगरकर यांच्या अनगर गावात दुय्यम निबंधक कार्यालयापाठोपाठ अलीकडे अप्पर तहसील कार्यालयही मंजूर झाले आहे. परंतु या अप्पर तहसील कार्यालयास त्यांच्याच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अन्य नेत्यांसह शिवसेना शिंदे गट, भाजप, काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आदी सर्व पक्षांनी तीव्र विरोध करून आंदोलन सुरू केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागणीवरून हे नवीन अप्पर तहसील कार्यालय महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंजूर केल्याचे बोलले जाते. या नवीन अपहर तहसील कार्यालयास तालुक्यातील शेटफळ, पेनूर, नरखेड आधी महसूल मंडळे जोडण्यात आली आहेत. हा बहुतांश भाग राजन पाटील यांच्या विरोधकांच्या प्रभावाखालील मानला जातो. विरोधकांची राजकीय कोंडी करण्यासाठी हे नवीन अप्पर तहसील कार्यालय राजन पाटील यांच्या गावात अनगरमध्ये सुरू होत आहे, असा प्रमुख आक्षेप आहे. या मुद्द्यावर एकवटलेल्या सर्वपक्षीय विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालून नवीन अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याची मागणी केली असता मुख्यमंत्र्यांनी मागणी पत्रावर अनुकूल शेरा मारून फेर प्रस्ताव मांडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली ताकद राजन पाटील यांच्या मागे उभी केल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी शेरा मारूनही अनगर येथील नवीन अप्पर महसूल कार्यालयास स्थगिती मिळाली नाही. याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी संपर्क साधला असता अनगर येथील नवीन अप्पर तहसील कार्यालयास स्थगिती आदेश आला नसून या कार्यालयाची उभारणी प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या शुक्रवारी जनसंवाद यात्रा घेऊन मोहोळ तालुक्यात येत आहेत. त्यांच्या या भेटीत अनगरच्या नवीन तहसील कार्यालयाच्या मंजुरीच्या वादाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा – अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या निषेधार्थ निदर्शने
हेही वाचा – वाढवण बंदराचे ३० ऑगस्टला पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन
सत्ताधारी महायुतीमध्ये अप्पर तहसील कार्यालयाच्या मंजुरीवरून संघर्ष पेटला असताना त्याचे पडसाद अलीकडे सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या सभेत उमटले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर या मुद्द्यावर शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सदस्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यावर पालकमंत्र्यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन देऊनही आजतागायत या संदर्भात कोणताही तोडगा निघाला नाही. त्या वादात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याची मागणी केली आहे. तर भाजपने ‘नरो वा कुंजरो वा’ची भूमिका घेतल्याचे दिसून येते.