BJP succession plan राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी वयाच्या ७५ व्या वर्षी निवृत्तीबाबत एक वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आणि त्यांचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा असल्याचेही बोलले गेले. याच चर्चा सुरू असताना काँग्रेसच्या एका नेत्याने पंतप्रधान पदासाठी भाजपातीलच एका नेत्याचे नाव सुचवले आणि मोदींच्या निवृत्तीनंतर त्यांच्या नियुक्तीविषयी म्हटले. नक्की कोणत्या नेत्याने असे विधान केले? काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीविषयी नक्की काय म्हटले? त्याविषयी जाणून घेऊयात.
भाजपातील ते नेते कोण?
- कर्नाटकातील काँग्रेस आमदार बेलूर गोपालकृष्ण यांनी नरेंद्र मोदींच्या निवृत्तीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पंतप्रधान करण्यात यावे, असे म्हटले आहे.
- पत्रकारांशी बोलताना काँग्रेस आमदार म्हणाले की, जर पंतप्रधान मोदी वयाच्या ७५ व्या वर्षी राजीनामा देतील; तर गडकरी यांनी देशाचे पंतप्रधान व्हावे.
- गडकरी यांचे कौतुक करताना गोपालकृष्ण म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विकासासाठी चांगले काम केले आहे आणि ते सामान्य माणसाशी जोडलेले आहेत.
ते म्हणाले, “नितीन गडकरी हे देशाचे पुढचे पंतप्रधान असले पाहिजेत, कारण- गडकरी सामान्य माणसाबरोबर आहेत. त्यांनी महामार्ग आणि इतर गोष्टींमध्ये देशाच्या विकासासाठी चांगले काम केले आहे. देशातील लोकांना त्यांची सेवा आणि ते कोणत्या प्रकारची व्यक्ती आहेत, हे माहीत आहे,” असे गोपालकृष्ण यांनी म्हटले.
बेलूर गोपालकृष्ण यांनी गडकरी यांच्या अलीकडील भाषणाचाही उल्लेख केला. त्या भाषणात केंद्रीय मंत्र्यांनी देशातील वाढत्या संपत्तीच्या विषमतेबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांनी असे म्हटले होते की, श्रीमंत श्रीमंत होत आहेत; तर गरीब जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. बेलूर गोपालकृष्ण म्हणाले, “यावरून असे दिसून येते की, त्यांच्याकडे देशाच्या विकासासाठी एक संकल्पना आहे आणि अशा लोकांना पंतप्रधान केले गेले पाहिजे.” ७५ वर्षांच्या वयात नेत्यांनी पदत्याग करण्याबाबत मोहन भागवत यांनी अलीकडेच केलेल्या एका विधानाबाबत बोलताना आमदारांनी हे वक्तव्य केले. या आठवड्याच्या सुरुवातीला नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात भागवत यांनी संघाचे विचारवंत मोरोपंत पिंगळे यांच्या ७५ वर्षांनंतर सत्तेवरून पायउतार होण्याच्या तत्त्वाचा उल्लेख केला.
त्यांनी याविषयी बोलताना कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतले नसले तरी, त्यांच्या विधानामुळे भाजपाच्या अंतर्गत उत्तराधिकार नियोजनाभोवतीचा वादविवाद पुन्हा सुरू झाला आहे. भाजपा नेतृत्वावर आणखी टीका करत गोपालकृष्ण यांनी नेतृत्वात वयोमर्यादेच्या बाबतीत भाजपा दुहेरी निकष लावत असल्याचा आरोप केला. ज्येष्ठ भाजपा नेते बी. एस. येडियुरप्पा यांना ७५ वर्षांचे झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्रिपद सोडण्यास भाग पाडण्यात आले. मात्र, भाजपाचा कोणताही नेता मोदींबद्दल बोलत नाही, अशी टीका त्यांनी केली.
“भाजपातील नेत्यांनी येडियुरप्पा यांना राजीनामा देण्यास भाग पाडले गेले तेव्हा त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. ते एक ज्येष्ठ नेते होते, ज्यांनी भाजपाची उभारणी केली आणि राज्यात सत्ता आणली. मोदीजींसाठी वेगळा नियम का”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, “जर मोदी येडियुरप्पांना हा नियम लागू करू शकत असतील, तर तो निश्चितच त्यांनाही लागू झाला पाहिजे. मोहन भागवत यांनी ७५ नंतर नेत्यांनी आपले पद सोडावे, असे म्हटले आहे. त्यामुळे मला वाटते की, गडकरींसारख्या व्यक्तीने पदभार स्वीकारण्याची वेळ आली आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
मोहन भागवत नक्की काय म्हणाले?
मोरोपंत पिंगळे : द हिंदू आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्चर या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मोहन भागवत यांनी केलेल्या एका विधानाची सध्या चांगलीच चर्चा होते आहे. आपल्या भाषणात मोहन भागवत म्हणाले, “मोरोपंत पिंगळे एकदा म्हणाले होते की, जेव्हा पंचाहत्तरीची शाल अंगावर पडते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, आता थांबावं. तुमचं वय झालं आहे, बाजूला सरा, आम्हाला काम करू द्या.” त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी या वक्तव्यावरून मोदींवर टीका केली. ते म्हणाले, “मोदी काही महिन्यांत ७५ वर्षांचे होत असून, संघाने मोदींना बाजूला होण्याचा सल्ला दिला आहे.
तसेच, नरेंद्र मोदी व भागवत हे दोघेही येत्या सप्टेंबर महिन्यात ७५ वर्षांचे होतील, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, “पाच दिवसांचा राजकीय दौरा आटोपून मोदी भारतात आले आहेत. बिचारे पंतप्रधान पुरस्कार जिंकून भारतात परतले आहेत आणि कशा पद्धतीने त्यांचे स्वागत केले जात आहे. मोदी भारतात परतताच सरसंघचालकांनी त्यांना आठवण करून दिली आहे की, ते येत्या १७ सप्टेंबर २०२५ रोजी ते ७५ वर्षांचे होत आहेत.”
ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान मोदीदेखील सरसंघचालकांना आठवण करून देऊ शकतात की, तेदेखील येत्या ११ सप्टेंबर रोजी ७५ वर्षांचे होत आहेत.” जयराम रमेश यांच्या टीकेनंतर काँग्रेस नेते पवन खेरा यांनीदेखील मोदींवर टीका केली आहे. ते म्हणाले, “आता दोघांनी आपापल्या झोळ्या उचला आणि एकमेकांना मार्गदर्शन करायला जा.” दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.