पुणे : पुणे जिल्ह्यात आणखी तीन महापालिका असाव्यात की एकच, यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवार यांनी सुचवलेल्या तीन महापालिकांच्या परिसरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असून, सध्या हा परिसर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) हद्दीत आहे. ‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष हे मुख्यमंत्री फडणवीस असून, महापालिका झाल्यास अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ला जिल्ह्यात आणखी ताकद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा हेण्यापूर्वीच या चर्चेतील हवा काढून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पुणे जिल्ह्यात चाकण, हिंजवडी आणि उरळी देवाची-फुरसुंगी-मांजरी अशा तीन महापालिका करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आठ ऑगस्टला केली. ही घोषणा करताना पवार यांनी ‘कोणाला आवडो न आवडो, तीन महापालिका स्थापन करणारच’ असे जाहीरपणे आव्हान दिले. त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘फार तर एक महापालिका होऊ शकेल’ असे वक्तव्य करून उपमख्यमंत्री पवार यांच्या घोषणेतील हवा काढून घेतली. फडणवीस आणि पवार हे कोणताही निर्णय घेताना आपापसात चर्चा करून जाहीर करत आले आहेत. मात्र, नवीन महापालिकांवरून त्यांच्यात मतभेद असल्याचे दोघांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.
चाकण, हिंजवडी आणि उरळी देवाची-फुरसुंगी-मांजरी या तिन्ही क्षेत्रांमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची ताकद आहे. चाकण परिसराची नगरपरिषद असून, या भागात अजित पवार यांना मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. हिंजवडी परिसरातील गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची ताकद आहे. भोर विधानसभा मतदार संघामध्ये या परिसराचा समावेश होतो. त्या ठिकाणी या पक्षाचे शंकर मांडेकर हे आमदार आहेत. उरळी देवाची, फुरसुंगी ही नगरपरिषद करण्याचा निर्णय झाला असला, तरी या गावांतील विकासकामे ही प्रत्यक्ष नगरपरिषदेचा कारभार सुरू होईपर्यंत पुणे महापालिका पाहणार आहे. ही गावे कायम अजित पवार यांना साथ देत आली आहेत. पुरंदरचे शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार विजय शिवतारे यांचाही या भागात लोकसंपर्क आहे. पवार आणि शिवतारे यांच्यात सख्य नसल्याने पवार यांनी मांजरी गावाचा समावेश करून नवीन महापालिका स्थापन करण्याचे सुचविले आहे. मांजरी गावाचा परिसर हा अजित पवार यांंच्या ‘राष्ट्रवादी’ची ताकद असलेला आहे.
मुख्यमंत्री हे ‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष असतात. सध्या हा परिसर ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत येतो. तीन महापालिका स्थापन केल्यास त्याचा फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला होण्याची शक्यता आहे. सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपचे प्राबल्य आहे. हिंजवडीच्या परिसराचा समावेश या महापालिकेत करण्याची मागणी होत आहे. चाकणचा परिसर हा पिंपरी-चिंचवड महापालिका लगत आहे. या महापालिकेत २० गावांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये चाकणही होते. मात्र, चाकणकरांनी विरोध केल्याने २०१५ मध्ये स्वतंत्र नगरपरिषद तयार करण्यात आली. पहिल्या निवडणुकीत तत्कालीन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत झाली. शिवसेनेला आठ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसला सात जागा मिळाल्या. सहा जागांवर अपक्ष निवडून आले. भाजपला एक जागा मिळाली. त्यानंतर पुन्हा निवडणूक झाली नाही. हिंजवडी आणि चाकण या महापालिका करण्यास भाजपचा विरोध आहे.
उरळी देवाची-फुरसुंगी-मांजरी या भागात भाजपची फारशी ताकद नाही. त्यामुळे या भागाची महापालिका झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) या महायुतीतील मित्रपक्षांमध्ये जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपचा या महापालिकेला विरोध नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही ‘फार तर एक महापालिका होऊ शकेल’ असे वक्तव्य करून अप्रत्यक्ष उरळी देवाची-फुरसुंगी-मांजरी या महापालिकेसाठी सुतोवाच केले आहे.
आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नवीन महापालिका हा प्रचाराचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीन महापालिका करण्यास विरोध दर्शवला असल्याने महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) या तिन्ही पक्षांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.