कोल्हापूर : विरोधकांच्या हल्ल्यापुढे सत्ताधाऱ्यांवर घायाळ होण्याची वेळ गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दरवर्षी पाहायला मिळते. यावर्षी उद्या मंगळवारी होणाऱ्या सभेत याला छेद मिळण्याची चिन्हे आहेत. गोकुळ मध्ये महायुतीचा अध्यक्ष झाला असल्याने महायुतीच्या घटक असलेल्या विरोधी गटाचा किल्ला प्रभावीपणे लढवणाऱ्या शौमिका महाडिक यांनी सत्ताधारांसोबत मंचावर बसण्याची तयारी केली असल्याने यावेळी समोरून होणारा विरोधकांचा हल्ला थंडावणार आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध सहकारी उत्पादक (गोकुळ) संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा गेली दहा वर्षे सातत्याने गाजत आहे. वार्षिक सभेच्या निमित्ताने संस्थेच्या वर्षभरातील आर्थिक कामकाजासह एकूणच कामगिरीचा लेखाजोखा करण्याची, सत्ताधाऱ्यांच्या चुकांवर जाब विचारण्याची प्रभावी संधी मिळत असते. पूर्वी गोकुळ मध्ये महादेवराव महाडिक यांची सत्ता असताना तत्कालीन विरोधी गटाचे नेते सतेज पाटील हे वार्षिक सभेला उपस्थित राहून सत्ताधाऱ्यांच्या कामकाज पद्धतीवर प्रहार करीत असत. गोकुळ मधील भ्रष्ट कारभाराचा पंचनामा त्यांच्याकडून सभेत केला जात असे. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षांना हा टोकदार हल्ला परतावून लावणे जड जात असे. विरोधी गटाचा हा किल्ला लढवण्याचा फायदा पुढे सतेज पाटील यांना गोकुळच्या निवडणुकीत होऊन ते सत्तेत आले.
गेली चार वर्ष गोकुळ मध्ये सतेज पाटील – हसन मुश्रीफ या मित्रांची सत्ता राहिली. परंतु गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष झाला पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर सतेज पाटील यांच्या अपेक्षांना धक्का बसला. आणि गोकुळच्या अध्यक्षपदी मंत्री पुत्र नावेद हसन मुश्रीफ यांची निवड झाली. त्यांची उद्या होणारी पहिलीच वार्षिक सर्वसाधारण सभा. त्यांना या सभेत विरोधी संचालकांकडून होणाऱ्या हल्ल्याला टीकेला तोंड द्यावे लागेल असे दिसत नाही.
आयती संधी मिळूनही
गेले पंधरा दिवस वार्षिक सभेच्या निमित्ताने गोकुळ दूध संघाच्या वतीने तालुका निहाय संपर्क सभा सुरू आहेत. या सभांमध्ये गोकुळ मधील वासाचे दूध, विरोधी गटाला सापत्न वागणूक आदी मुद्द्यावरून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळच्या संचालक मंडळाला भेंडाळून सोडले आहे. गोकुळच्या कारभारा विरोधात उद्धव ठाकरे शिवसेना, गर्जना संघटना यांच्याकडून सातत्याने आव्हान दिले जात आहे. शिवसेना ठाकरे केलेल्या तक्रारीनंतर गोकुळ मधील भ्रष्ट कारभाराची चौकशी दुग्ध निबंधकांनी सुरू केलेली आहे. गर्जना संघटनेने कोल्हापूर सर्किट बँक मध्ये भ्रष्टाचारा विरोधात याचिका दाखल केली आहे. गोकुळच्या विरोधात असे वातावरण तापले असताना विरोधी गटाच्या संचालिका महाडिक यांनी मात्र सत्ताधाऱ्यांची हात मिळवणी करीत विरोधाचे शस्त्र म्यान केले आहे.
महायुतीचा खडा
गोकुळचे नेते हसन मुश्रीफ यांनी खासदार धनंजय महाडिक यांना उद्देशून गोकुळ मधील महायुतीच्या सत्तेत दुधाचा खडा टाकू नका असे बजावले होते. त्याचाच परिणाम म्हणून की काय महायुतीच्या घटक असलेल्या शौमिका महाडिक प्रथमच सत्ताधाऱ्यांसमवेत संचालक मंडळासह सभा मंचावर दिसतील असे पूर्वसंध्येला चित्र राहिले. परंतु यामुळे गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत समोरून होणारा विरोधी गटाचे दमदार आक्रमण यावेळी थंडगार लोण्या प्रमाणे गारठणार आहे. सत्तारूढ – विरोधी असे सारेच संचालक आणि नेते सत्तेचे नवनीत चाखायला प्रथमच एकाच पंक्तीत असणार आहेत. सत्तेच्या या सगेसोयऱ्याच्या मधुर नातेबंधात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केलेले जीवन मरणाचे प्रश्न वाऱ्यावर राहण्याची चिन्हे असून त्यांना सत्ताधारी वाली राहिले ना विरोधी!