छत्रपती संभाजीनगर : ११७ कोटी रुपयांचा निधी कोणी आणला, त्याचा कंत्राटदार कसा निवडला, कोणी कामे थांबवली यावरुन सुरू असणाऱ्या राजकारणात आता धाराशिव शहरात तुझे एक बॅनर आणि माझे तर माझेही एक बॅनर असा खेळ रंगला आहे. दोन्ही बाजूने ‘ लायकी ’ काढली जात असताना धाराशिवकर मात्र नेहमीप्रमाणे खडबडीत रस्त्यावरुन दुचाकी दामटत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
धाराशिव शहरातील ११६ कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या निविदेच्या कार्यरंभ आदेशास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने स्थगिती दिली. अशी स्थगिती देण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दोन वेळा लेखी तक्रार केली. तत्पूर्वी हा निधी आपण आणला म्हणून भाजपचे आमदार व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष राणाजगजीतसिंह पाटील यांचे गावभर अभिनंदनाचे फलक लावले होते. ‘ पक्ष प्रवेश करतो असे सांगून पालकमंत्र्यांकडे भीक मागून धाराशिवचा विकास निधी थांबविण्याचा प्रयत्न करणारा’ असा मजकूर लिहून भाजपने नाव न घेता शिवसेना खासदार ओम राजेनिंबाळकर यांना छेडले. त्यावर दुसऱ्या फलकावर उत्तर देण्यात आले. ‘ धाराशिवकर विचारतायत शहरातील रस्त्यांची कामं गेल्या १८ महिन्यापासून कोण थांबवली आणि कोणासाठी’ या मजकुराचा फलक लागला. उत्तर द्यायला धैर्य आहे का, असे यातून राणा जगजीतसिंह पाटील यांना विचारण्यात आले आहे. ‘‘लाडक्या कंत्राटदारास टक्केवारीसाठी काम मिळवून दिलं म्हणून तुझ्याच फडणवीस सरकारने कामास स्थगिती दिली’ असे दुसरे बॅनरही लावण्यात आले.
रस्त्याच्या कामास स्थगिती दिल्यानंतर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटालाही फलकातून डिवचण्यात आले आहे. ‘धाराशिवच्या विकासाचा नुसताच भास कमीशन घेऊन स्वत: चा विकास’ असे घोषवाक्य ‘ ओके पॅटर्न’ या नावासह लावण्यात आले आहे. त्यामुळे तुझं एक बॅनर तर माझा एक फलक असे चित्र, सत्ताधारी दोन्ही पक्षात आणि विरोधकांमध्ये सुरू झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाभोवती लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे धाराशिवच्या राजकारणात बॅनरचा खेळ चांगला रंगला आहे. दरम्यान शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या पालकमंत्र्यांनी रस्त्यांच्या कामाला स्थगिती दिल्याने राजकीय पटावर युतीमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत.
