धाराशिव शहरातील ११६ कोटी रुपये रस्ते निर्माणाच्या कार्यरंभ आदेशास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने स्थगिती दिली. ही स्थगिती देण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दोन वेळा लेखी तक्रार केली. तत्पूर्वी हा निधी आपण आणला म्हणून भाजपचे आमदार व ‘मित्र’ संस्थेचे उपाध्यक्ष राणाजगजीतसिंह पाटील यांचे गावभर अभिनंदनाचे फलक लावले होते. या घटनेमुळे राणाजगजीतसिंह पाटील आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील वादाचा तिसरा अंक सुरू झाल्याचे मानले जात आहे.
नगरपालिका व जिल्हा परिषदा निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर आल्याने धाराशिवच्या भाजपच्या मंडळीमध्ये अस्वस्थता आहे. परिणामी राणाजगजीतसिंह विरुद्ध प्रताप सरनाईक असे चित्र धाराशिवच्या राजकीय पटावर दिसू लागले आहे.
शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी ही निविदा रोखून धरण्यात तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा हात असल्याचा आरोप वारंवार केला होता. मात्र, करण्यात आलेल्या आरोपावर जाहीर ‘ समोरासमोर ’ चर्चा करू असे आव्हान राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिले होते. हे आव्हान स्वीकारले असून वेळ आणि ठिकाण ठरावा, असे प्रतिआव्हान खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी दिले होते.
शहरातील रस्त्यांचे श्रेय आपल्याच पदरी पडावे म्हणून राणाजगजीतसिंह पाटील हे सारे घडवून आणत असल्याचा आरोप केला जात होता. तत्पूर्वी निविदा मंजूर करताना करण्यात आलेल्या तांत्रिक चुका, निविदेची मंजूर किंमत, बाजारभावापेक्षा त्यात अधिकची १५ टक्के वाढ हे सारे मुद्देही चर्चेत होते. प्रशासकीय पातळीवर या मुद्द्यांचे महत्त्व लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी या कामाची फेर निविदा काढावी अशी सूचना केली. मात्र, नंतर कंत्राटदाराशी चर्चा करुन १५ टक्के किंमत कमी करुन हे काम त्याच कंत्राटदाराकडून करण्याचा निर्णय घेतला गेला. तो पालकमंत्र्याच्या सूचना डावलणारा होता. त्यामुळे प्रताप सरनाईक यांनी कार्यरंभ आदेशाला स्थगिती दिली. परिणामी राणाजगजीतसिंह पाटील यांचे विरोधक करत असणारे आरोप खरे होते, असा अर्थ प्रताप सरनाईक यांच्या कृतीमधून स्पष्ट होत असल्याने भाजपचे नेते हैराण आहेत. हा तिसरा अंक सुरू होण्यापूर्वी राणाजगजीतसिंह पाटील आणि प्रताप सरनाईक हे यांच्यातील वाद दोन वेळा पुढे आला आहे.
तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या बैठका पालकमंत्र्यांना डावलून सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी प्राधिकरणाची बैठक मुंंबईत आयोजित केली होती. प्रस्तावित कामांमध्ये तुळजाभवानी मंदिराचा कळस उतरवून नवा कळस कसा आवश्यक आहे, अशी मांडणी सुरू होती. मात्र, केंद्रीय पुरातत्व विभागातील अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर हा विषय काहीसा बाजूला पडला. मात्र, तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या कामात राणाजगजीतसिंह पाटील यांचा शब्दच अंतिम मानला जात असल्याने प्रताप सरनाईक यांनी तो कारभार पालकमंत्री म्हणून आपणच पाहत असल्याचे चित्र निर्माण केले होते. या वेळी राणाजगजीतसिंह पाटील आणि सरनाईक यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले होते. तत्पूर्वी जिल्हा नियोजन समितीचा निधी मंजूर करण्यावरुन झालेल्या लेखी वादातून मुंबईत बैठका घ्याव्या लागल्या होत्या.
रस्त्याच्या कामाला स्थगिती दिल्यानेत सत्ताधारी गटातील वाद तर चव्हाट्यावर आलेच शिवाय शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते ओम राजेनिंबाळकर आणि कैलास पाटील यांचीही सरशी झाली. त्यास पालकमंत्री प्रताप सरनाईक कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे.
