छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकारणात महायुतीमध्ये वरचष्मा कायम रहावा आणि महापालिकेतील पदाधिकारी आपल्याच पक्षाचे रहावेत यासाठी शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे ) रणनीती आखली जात आहे. गेल्या काही महिन्यात शहरात सात माजी महापौरांना आपल्या बाजूने वळविण्यात पालकमंत्री संजय शिरसाट आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले आहे. त्यामुळे ठाण्यानंतर एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली ताकद वाढवत असल्याचे राजकीय चित्र निर्माण झाले आहे.

मराठवाड्यात एक खासदार आणि १३ आमदार असे संख्याबळ असणाऱ्या शिंदे यांनी आता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीमध्ये बळ पुरवायला सुरुवात केली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये नवे ‘ शिवसेना भवन ’ बांधा, अशी सूचना त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली. मतदारसंघाच्या बांधणीसाठी येणाऱ्या प्रत्येकाला प्रवेश देण्याचे काम सुरू आहे. सोमवारी त्र्यंबक तुपे, आणि माजी आमदार कैलास पाटील यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. नव्या प्रवेशामुळे सातवे माजी महापौर शिंदेसेनेमध्ये आले. या पूर्वी नंदकुमार घाेडेले त्यांच्या पत्नी अनिता घोडेले, विकास जैन, गजानन बारवाल, किशनचंद तनवाणी, कला ओझा या मंडळींनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्त्व स्वीकारले. त्यामुळे महापालिकेवर आपला वरचष्मा राहील, अशी पाऊले उचलण्याची रणनीती पुढे नेली जात असल्याचे दिसून येत आहे. त्र्यंबक तुपे यांना शिवसेनेत प्रवेश देण्यावरुन अंतर्गत वाद असले तरी त्यांचा प्रवेश अखेर करण्यात आला.

सात महापौरांपैकी माजी आमदार किशनचंद तनवाणी हे प्रत्यक्ष निवडणूक लढविणारे नसले तरी शहरातील काही वार्डात आपले समर्थक नगरसेवक निवडून यायलाच हवेत, असा प्रयत्न ते नेहमी करतात. किमान पाच ते सात नगरसेवक निवडून आणण्याची ताकद असल्याने शहराच्या राजकारणात ते वरचष्मा ठेवून असतात. विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमदेवारी मिळवून शेवटच्या क्षणी नामनिर्देशन पत्र माघारी घेऊन त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले होते. त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची नवा उमदेवार देताना दमछाक झाली. होती.

निवडणुकीत सर्व हातखंडे वापरण्यात पुढाकार घेणाऱ्या शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. महायुतीची चिंता तुम्ही करू नका, ते आम्ही ठरवू असे एकनाथ शिंदे सांगत असून ठाण्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यावर महायुतीमध्ये आपला वरचष्मा राहील, असे प्रयत्न सुरू झाले आहेत.

महायुतीमधील या घडमोडींबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘ शिवसेनेच्या शिेंदे गटाकडे काही जुने चेहरे गेले आहेत. खरे तर जुन्या चेहऱ्यांना लोकही कंटाळले आहेत. भाजपमध्ये मात्र नव्या आणि जुन्या चेहरांचे मिश्रण महापालिकेच्या निवडणुकांमध्ये दिसेल. याशिवाय आम्ही प्रत्येक घरापर्यंतची संपर्क मोहीम राबवतो. त्यामुळे भाजप या सगळया राजकीय घडामोडीत मागे नाही. आम्हीही सगळी ताकद लावत आहोत.