नवी मुंबई : ठाणे लोकसभेची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी सोडण्यात आल्याने नवी मुंबईतील गणेश नाईक समर्थक कमालीचे नाराज झाले. शिंदेसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के दोन लाख मतांनी पडतील, मतदार त्यांना जागा दाखवतील अशी टोकाची भाषा नाईक समर्थकांनी केली होती. मतदानाला जेमतेम दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना नाईक समर्थकांची ही नाराजी वाढतेच आहे हे लक्षात येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नाईक पिता-पुत्रांसह समर्थकांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. फडणवीस यांच्या प्रतिक्षेत असलेले नाईक कुटुंबियांनी लगेचच ‘आता नाराजी नाही, कामाला लागा’ असे आदेश आपल्या समर्थकांना दिले खरे, मात्र नवी मुंबईतील शिंदेसेना आणि नाईकांमध्ये असलेली टोकाची कटुता लक्षात घेता हे मनभेद मिटतील का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

मुंबईपाठोपाठ ठाण्याचे असलेले महत्व लक्षात घेऊन भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेली ठाण्याची जागाच महायुतीच्या चर्चेत मागितली. मुख्यमंत्र्यांसाठी ठाणे महत्वाचे असल्याची पूर्ण जाणीव भाजप नेत्यांना होती. तरीही ठाणे हवेच असा आग्रह महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी घेतला. हा आग्रह धरत असताना ठाण्यातून गणेश नाईक यांचे माजी खासदार पुत्र संजीव नाईक यांचे नाव पुढे आणले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंड करत एकनाथ शिंदे यांनी कुस बदलून भाजपशी जवळीक साधली असली तरी नवी मुंबईतील गणेश नाईकांशी त्यांचे फारसे सख्य नाही हे स्पष्टच आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच शिंदे यांनी नाईकांच्या नवी मुंबई महापालिकेवर प्रभाव वाढविण्यास सुरुवात केली. या महापालिकेतील साधा कनिष्ठ अभियंता बदलतानाही अनेकदा ठाण्याहून शिफारशी येतात असा अनुभव नाईक समर्थकांना येऊ लागला आहे. महापालिकेतील कंत्राटी कामे, बदल्या, धोरणात्मक निर्णयांवर ठाण्याचा प्रभाव असतो. शिंदे मुख्यमंत्री होताच हा प्रभाव वाढला. त्यामुळे गणेश नाईक यांच्या समर्थकांमध्ये कमालिची अस्वस्थता आहे. ठाण्यावरुन नवी मुंबईवर कब्जा मिळवायचा हा प्रयत्न आहे, असा आरोप नाईक समर्थकांनी पहिल्यांदा जाहीरपणे केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरही नाईकांच्या कट्टर समर्थकांनी हेच दुखणे मांडले.

हेही वाचा – वडेट्टीवार यांच्या पोस्टरला चपलांचा हार; यवतमाळात शिवसेनेचे निषेध आंदोलन

समर्थकांच्या तोंडून नाईकांची नाराजी ?

नवी मुंबई महापालिकेतील राजकारणावर, येथील अर्थकारणावर, निर्णयप्रक्रियेवर मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांच्या नवी मुंबईतील समर्थकांचा वरचष्मा दिसू लागल्यामुळे नाईक नाराज आहेत. नाईक यांचे नवी मुंबईतील कट्टर विरोधक आणि शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांचे प्रस्थ गेल्या काही वर्षात वाढल्याची चर्चा आहे. वाशीसारख्या शहरातील पुनर्विकास प्रकल्पांवरही शिंदेसेनेचा वरचष्मा आहे. नवी मुंबईतील बिल्डरांना कामे करुन घेताना ठाणे आणि मलबार हिलला जावे लागते. नवी मुंबईतील ‘व्हाॅईट हाऊस’वरुन पूर्वीप्रमाणे कामे होत नाहीत अशी चर्चा आहे. ही सगळी नाराजी लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपानंतर उफाळून आल्याचे बोलले जाते. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आणि सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या समोर जे नाईक समर्थक बोलले त्यांची एरवी नाईकांपुढे बोलण्याची टाप नसते. असे असताना नाराजीचा पाढा हे समर्थक वाचत असताना या समर्थकांचा बोलवता धनी कोण अशीही चर्चा सुरु आहे.

हेही वाचा – अकोला : सासूची हत्या करून अपघाताचा रचला बनाव; चारित्र्यावर संशय घेतल्याने जावयाने….

शिंदेसेनेशी मनोमिलन होणे कठीणच

फडणवीस यांच्या भेटीनंतर नाईकांनी ‘आता नाराजी दूर कामाला लागा’ असे आदेश आपल्या समर्थकांना दिले असले तरी स्थानिक शिंदेसेनेच्या नेत्यांसोबत त्यांचे जुळेल का हा प्रश्न मात्र कायम आहे. फडणवीस यांच्या भेटीनंतर बुधवारी नरेश म्हस्के पहिल्यांदा नवी मुंबईत येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचे संपूर्ण नियोजन शिंदेसेनेमार्फत केले जात आहेत. गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबियांना या दौऱ्यात सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न नरेश म्हस्के यांचा आहे. नाईक या दौऱ्यात सहभागी होतीलही मात्र स्थानिक शिंदेसेनेसोबत त्यांचे मनोमिलन होईल का, हा प्रश्न कायम आहे. फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर नवी मुंबईत ठाण्याचा हस्तक्षेप थांबेल असा दावा नाईक समर्थक करत असताना शिंदेसेनेचे पदाधिकारी मात्र ‘मुख्यमंत्र्यांना रोखणारे तुम्ही कोण’ अशी चर्चा दबक्या आवाजात घडवून आणत आहेत. तर नाईक समर्थक मात्र ‘हे दिवस बदलण्यास आता फार काळ लागणार नाही, तुमचे मुख्यमंत्रीपद चार महिन्यांचेच’, असा दावा करताना दिसतात. त्यामुळे नाराजी जरी दूर झाली असली तरी मनभेदांचे काय हा सवाल कायमच आहे.