कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात दोन बडी घराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुश्रीफ आणि महाडिक यांचा राजकीय प्रवास कधी समांतर तर कधी विरोधातून झाला आहे. गोकुळ दूध संघामध्ये दोन्ही घराण्यातील पुढच्या पिढ्या संचालक मंडळात एकत्रित काम करत असल्या तरी संघाच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने मुश्रीफ – महाडिक यांच्यात कटूता वाढली आहे. गोकुळ मुळे महायुतीत असूनही मुश्रीफ व महाडिक यांच्या राजकीय संबंधात पडलेला मिठाचा खडा राजकारणा बरोबरच सहकारावर परिणामकारक ठरण्याची चिन्हे आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात हसन मुश्रीफ यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ईडीची चौकशी लागल्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केला आहे. तर धनंजय महाडिक हे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या मार्गाने राजकीय वाटचाल करीत राहिले आहे.
महाडिक यांनी २००४ साली लोकसभा निवडणूक लढवली. त्यासह पुढे कोल्हापूर दक्षिण विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागला. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी यश मिळवले. पुढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे काम न केल्याचा ठपका ठेवत पडद्या मागून राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधाची भूमिका घेतल्याने ते पराभूत झाले. त्यानंतर महाडिक यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. पाठोपाठ मुश्रीफ अजितदादांसोबत महायुतीत डेरेदाखल झाले. हसन मुश्रीफ आणि धनंजय महाडिक यांच्यातील राजकीय प्रवास किंचित मधुर आणि बराचसा संघर्षमय असाच राहिला आहे.
पुढच्या पिढ्यातही अंतर
गोकुळ दहीहंडीच्या वेळी धनंजय महाडिक यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीकेचे तोफ डागली. त्याला मुश्रीफ यांच्याकडूनही उत्तर दिले गेले. आता गोकुळ दूध संघामध्ये मुश्रीफ – महाडिक यांच्या पुढच्या पिढ्या काम करताना दिसत आहेत. २०१७ सालच्या जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी होऊन शौमिका महाडिक या प्रथमच विजयी झाल्या. काँग्रेसला शह देऊन त्या थेट अध्यक्षा बनल्या. या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नविद हसन मुश्रीफ यांना पराभवाला तोड द्यावे लागले होते. आता गोकुळमध्ये
नविद मुश्रीफ हे अध्यक्ष झाले असून शौमिका महाडिक या विरोधी गटाच्या संचालिका आहेत. नविद हे महायुतीचे अध्यक्ष असल्याचा दावा केला जात असला तरी महाडिक यांना दिलेल्या वागणुकीमुळे तो कितपत खरा याची गोकुळच्या वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर अधिकच ठळकपणे चर्चा होऊ लागली आहे.
लाडका भाऊ – बहीण
गोकुळच्या वार्षिक सभेत कारभाराविषयी प्रश्न विचारण्याची भूमिका शौमिका महाडिक यांनी घेतली होती. विशेष म्हणजे कागलच्या घाटगे घराण्यातील असलेल्या महाडिक यांनी नविद कागलचे असल्याने ते भावा समान आहेत, असा उल्लेख केला होता. त्यांच्याकडून सभेत चांगल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. प्रत्यक्षात सभेचे कामकाज सुरू झाल्यावर या ना निमित्ताने महाडिक यांना शांत बसवण्याचा प्रयत्न झाला. आणि सभेच्या शेवटी लिखित उत्तरे देण्यात येईल असे सांगून लाडका भाऊ असलेल्या नविद यांनी शौमिका महाडिक यांना परतीच्या वाटेवर पाठवले. ज्या प्रकारे गोकुळच्या सभेत हाताळणी झाली त्यावरून शौमिका महाडिक यांनी संताप व्यक्त केला आहे. महायुतीचे अध्यक्ष असलेल्यांकडून महायुतीच्या संचालिकेस दिलेली वागणूक महाडिक घराण्याच्या पचनी पडलेली नाही.
मुश्रीफ – महाडिक संबंधात दुरावा
गोकुळ दूध संघावरून आधी धनंजय महाडिक आणि पाठोपाठ शौमिका महाडिक यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. परिणामी महायुतीचे नेते असलेले हसन मुश्रीफ आणि महाडिक या दोघांच्या वाटा वेगळ्या होताना दिसत आहे. या ताणलेल्या संबंधांचे युतीतीवर राजकीय परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.