कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत सहा वेळा निवडून आलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची सत्ताकांक्षा लपून राहिली नाही. आणखी एकदा आमदार, खासदार, केंद्रात मंत्री, उपमुख्यमंत्री असे स्वप्नांचे इमले त्यांनी आजवर रचले आहेत. आता तर मुख्यमंत्री पदावर डोळा असल्याचे कागल मतदार संघातील एका कार्यक्रमात व्यक्त केल्याने मुश्रीफ यांचे सत्तारंजन चर्चेत आले आहे.

सामान्य कार्यकर्त्यालाही सत्तेची मोठी स्वप्ने पडत असतात. ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवकाला विधिमंडळ जाण्याची घाई झालेली असते. मंत्रिपदही त्यांना खुणावत असते.हसन मुश्रीफ यांची एकंदरीत वाटचाल याच दिशेने जाणारी आहे.

हसन मुश्रीफ हे कागलचे पहिले लोकनियुक्त उपनगराध्यक्ष मियालाल मुश्रीफ यांचे सुपुत्र आहेत. १९७४ साली शिवाजी विद्यापीठातून बी.ए.ची पदवी घेतलेल्या मुश्रीफ यांनी वडिलांच्या निधनानंतर १९ व्या वर्षी घराचा भार खांद्यावर घेतला. १९८५ मध्ये काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी राजकारणात पदार्पण केले. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर त्यांनी हातावर घड्याळ बांधले. कागलच्या राजकारणात दबदबा निर्माण करीत त्यांनी विधानसभा मतदारसंघावरील आपली मांड उतरू दिली नाही.

ऑक्टोंबर २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री पद हे आपले लक्ष्य असल्याचे अधोरेखित केले होते. मी पुन्हा निवडून आल्यास मुख्यमंत्री नाही पण उपमुख्यमंत्री नक्की होऊ शकतो. अल्पसंख्याक असल्याने मला चांगली संधी मिळू शकते ,असेही त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. इतर राज्यांमध्ये तीन-तीन उपमुख्यमंत्री होतात तर आपल्या राज्यात का होऊ शकत नाही, असा सवाल त्यांनी तेव्हा केला होता.

विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मुश्रीफ यांनी पुढील आगामी काळात राजकीय वाटचाल अधोरेखित केली. ‘ सातव्यांदा विधानसभेची निवडणूक लढवण्याची माझी इच्छा आहे. ती शेवटची विधानसभा निवडणूक असेल. सातव्यांदा आमदार झाल्यानंतर मी लोकसभेच्या मैदानात असणार आहे. खासदार होऊन केंद्रात मंत्री होण्याची माझे स्वप्न आहे,’ असेही त्यांनी सांगून टाकले होते. उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुश्रीफ यांना आता त्याहून मोठी खुर्ची खुणावू लागली आहे.

सलग सहा वेळा कागल विधानसभा निवडणुकीत विजय मिळवणारे मुश्रीफ यांचे सत्तेचे मनोरे उंचच उंच झेपावत आहेत. वंदूर या त्यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमात बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी ‘ नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. मला संधी दिली तर मी मुख्यमंत्री झाल्यावर शेतकऱ्यांना ५० हजारां ऐवजी १ लाखांचे अनुदान देईन,’ असे सांगत मुख्यमंत्री पदावर डोळा ठेवत आपली नवी सत्ताकांक्षा बोलूनही दाखवली आहे.