पश्चिम बंगालच्या वरिष्ठ महिला अधिकारी नंदिनी चक्रवर्ती या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मर्जीतल्या अधिकारी मानल्या जातात. त्यांना राजभवनाने हटवलं आहे. त्यानंतर या नेमक्या आहेत कोण? याची चर्चा सुरू झाली आहे. नंदिनी चक्रवर्ती या नावाची खूप चर्चा सध्या पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे. मागच्या आठवड्यात राज्यपाल सी.व्ही आनंद बोस यांनी त्यांना राजभवनाच्या सचिव पदावरून हटवलं. त्यामुळे त्यांच्या नावाची चांगलीच चर्चा झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहेत नंदिनी चक्रवर्ती?

नंदिनी चक्रवर्ती या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) च्या विद्यार्थिनी आहेत. तसंच १९९४ च्या बॅचच्या सनदी अधिकारी आहेत. तृणमूल काँग्रेसने नंदिनी चक्रवर्ती यांना पदावरून हटवण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे. त्यानंतर राजभवन आणि सरकार यांच्यात तणाव निर्माण झाला होता.

२०११ मध्ये ममता बॅनर्जी या जेव्हा मुख्यमंत्री झाल्या तेव्हा नंदिनी चक्रवर्ती पश्चिम बंगाल औद्योगिक विकास निगमच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होत्या. त्यावेळी पश्चिम बंगाल कॅडरचे १९९० च्या बॅचचे सुब्रत गुप्ता हे WBIDC चे संचालक होते. त्यानंतर त्यांची बदली झाली. गुप्ता यांच्या बदलीनंतर संचालक पद नंदिनी चक्रवर्तींकडे आलं होतं. याच कालावधीत सूचना आणि सांस्कृतिक विभागाच्या सचिव म्हणूनही त्यांनी काम केलं. त्या कालावधीत एक आघाडीच्या आणि धडाडीच्या अधिकारी अशी त्यांची ओळख तयार झाली होती.

नंदिनी चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा विश्वास जिंकला आणि त्या त्यांच्या मर्जीतल्या अधिकारी झाल्या. सुंदरबन प्रकरणातही त्या सचिव होत्या. गेल्यावर्षी जगदीप धनकंर हे उपराष्ट्रपती झाले त्यानंतर मणिपूरचे माजी राज्यपाल गणेशन यांना कार्यवाह राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्यावेळी राज्यपालांच्या प्रमुख सचिव हे पद नंदिनी चक्रवर्ती यांना दिलं गेलं. मात्र मागच्या आठवड्यात त्यांना पदावरून हटवण्यात आलं. राजभवनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुार या महिन्याच्या सुरूवातीलाच सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये जो दिक्षांत समारंभ होता तिथे नंदिनी चक्रवर्ती लिहिलेल्या भाषणावर राज्यपाल नाराज झाले. ते भाषण ममता बॅनर्जींची स्तुती करणारं होतं, या भाषणामुळे भाजपावर टीका झाली होती. याच कारणामुळे नंदिनी चक्रवर्तींना हटवण्यात आलं असं सांगितलं जातं आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Her removal from raj bhavan irked mamata banerjee govt who is nandini chakravorty scj