सोलापूर : श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी सोलापूर महापालिकेने बेकायदेशीर ठरवून अखेर पाडून टाकली. ही चिमणी जमीनदोस्त झाल्यामुळे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे तब्बल दीड हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय पुढील दोन गळीत हंगाम थांबण्याची शक्यता आहे. यात सुमारे २७ हजार ऊस उत्पादक शेतकरी सभासद आणि १२०० कामगारांचे भवितव्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.
प्रामुख्याने स्थानिक वीरशैव लिंगायत समाजाचे प्रमुख सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या या साखर कारखान्याची चिमणी अखेर पाडण्यात आल्यामुळे सोलापूरचे राजकारण चांगलेच पेटले आहे. यात भाजपच्या लिंगायत समाजाच्याच स्थानिक आमदार-खासदारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे. भाजपच्या दृष्टीने हे प्रकरण तापदायक ठरणार असल्याचे दिसत असले तरी अर्थात हे सारे काही काँग्रेस पक्षाच्या आक्रमकतेवर अवलंबून आहे. मात्र काँग्रेस पक्षाने विशेषतः ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आताच अर्धी संधी गमावल्याचे दिसून येते.
हेही वाचा – जमाखर्च : गुलाबराव पाटील; ‘पाणीवाले बाबां’च्या मतदारसंघातच पाण्याची टंचाई !
होटगी रस्त्यावरील अवघ्या ३५० एकर आकाराच्या जुन्या विमानतळावरून विमानसेवा होण्यासाठी सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा समजला जात होता. गेल्या पाच वर्षांपासून या चिमणीचा मुद्दा राजकीयदृष्ट्या चर्चेत होता. शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या २६ मे रोजी सोलापूर भेटीत विमानसेवा लवकरच सुरू होणार असून त्यात येणारा अडथळा दूर होणार असल्याचे स्पष्ट सूतोवाच केले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने गेल्या १५ जून रोजी तब्बल अडीच हजार पोलिसांच्या बंदोबस्तात कारखान्याची चिमणी पाडून टाकली. या कारवाईमुळे कारखान्याचे सभासद शेतकऱ्यांसह लिंगायत समाजात नाराजीचे पडसाद उमटले आहेत. यात याच समाजाचे भाजपचे आमदार विजय देशमुख आणि खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्या विरोधात रोष प्रकट होत आहे. लिंगायत समाजातील नेतृत्व स्पर्धेतून सिद्धेश्वर साखर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी आणि आमदार विजय देशमुख यांच्यात असलेला सुप्त संघर्ष चिमणीच्या मुद्यावर तीव्रतेने उफाळून आला आहे.
वास्तविक पाहता सोलापूरच्या विमानसेवेसाठी सध्याच्या छोटेखानी विमानतळापेक्षा नजीकच्या बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भक्कम पर्याय होता. बोरामणी विमानतळाची उभारणी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याच पुढाकाराने हाती घेऊन त्यासाठी सुमारे दोन हजार एकर जमिनींचे संपादनही करण्यात आले होते. परंतु गेल्या नऊ वर्षांत या नव्या विमानतळाच्या विकासासाठी राज्य व केंद्र सरकारने दुर्लक्षच केले आहे. या पार्श्वभूमीवर जुन्या विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्यासाठी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्याची मागणी रेटून धरली होती. या प्रश्नावर आंदोलन-प्रतिआंदोलन झाले. परंतु बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ हाच भक्कम पर्याय असल्याचा मुद्दा हेरून त्यासाठी स्वतंत्र मोठे व्यापक आंदोलन होणे गरजेचे होते. त्यासाठी सिद्धेश्वर कारखान्याचे अध्वर्यू धर्मराज काडादी यांच्यापेक्षा दोन पावले पुढे जाऊन सुशीलकुमार शिंदे यांच्या अधिपत्याखालील काँग्रेसने रस्त्यावर उतरायला हवे होते. विशेषतः गेल्या एप्रिलमध्ये सोलापूर महापालिकेने सिद्धेश्वर साखर कारखान्याला बेकायदेशीर चिमणी पाडण्यासाठी ४५ दिवसांच्या मुदतीची नोटीस बजावली होती, निदान तेव्हा तरी बोरामणी विमानतळाच्या विकासाच्या बाजूने मोठे जनमत उभे करण्याची संधी होती. त्यासाठी सिद्धेश्वर कारखान्याच्या हजारो शेतकरी सभासदांसह कार्यकर्त्यांची सहजपणे ताकद उपलब्ध झाली असती.
बोरामणी येथून मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर ‘लाँग मार्च’ काढता येणे सहज शक्य होते. यात राज्यातील शेतकरी संघटनांनाही सहभागी करून घेता आले असते. त्यातून चिमणीसह जुन्या विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याचा मुद्दा बाजूला पडला असता. बोरामणी विमानतळाच्या विकासासाठी जुन्या विमानतळाची जमीन विक्रीला काढणेही सुलभ झाले असते. त्यासाठी शासनाच्या तिजोरीवर अधिक भार पडलाही नसता. पण ही संधी आता गमावली गेली आहे. सुशीलकुमार शिंदे यांचा स्वभाव लढवय्या नाही. पुस्तक प्रकाशन, सांस्कृतिक सोहळ्यात सदैव रममाण होणारे सुशीलकुमार शिंदे हे एखाद्या प्रश्नावर सहसा रस्त्यावर उतरून कधी संघर्ष केल्याचे ऐकिवात नाही. तर धर्मराज काडादी हेसुद्धा संयमी, मवाळ स्वभावाचे.
हेही वाचा – भारत राष्ट्र समितीचे लक्ष आता पुण्याकडे
या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी जमीनदोस्त झाल्यानंतर उडालेल्या राजकीय धुराळ्यात भाजपच्या स्थानिक आमदार-खासदारांच्या विरोधात वातावरण तापले आहे. भाजपमधील आमदार विजय देशमुखविरोधी गटासह महाविकास आघाडीने काहूर माजविले आहे. परंतु भाजपविरोधी पुढे आलेला रोष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत कितपत टिकून राहणार, याची शंका वाटते. हा रोष टिकवून ठेवण्याचे कसब स्थानिक काँग्रेससह धर्मराज काडादी यांच्याकडे दिसून येत नाही. या प्रश्नावर गांभीर्यपूर्वक राज्यात जेथे जेथे लिंगायत समाजाचा प्रभाव आहे, चिमणी पाडण्याचा प्रकार जर महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात घडला असता तर भाजपने त्याविरोधात मोठे रान पेटविले असते. असो.. दुसरीकडे भाजपकडून सलग चौथ्यांदा विधानसभेवर प्रतिनिधित्व करणारे आणि तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सोलापूरचे पालकमंत्री राहिलेले आमदार विजय देशमुख यांची लिंगायत समाजात स्वतःची मोठी ताकद असणे स्वाभाविक आहे. किंबहुना लिंगायत समाजात जेवढा काडादी यांचा प्रभाव आहे, त्याच्या कमीजास्त प्रमाणात आमदार देशमुख यांचाही दबदबा आहे. म्हणजे काडादी यांच्याप्रमाणे आमदार देशमुख यांनाही मानणारा वर्ग आहे.
आजमितीला सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडून काडादी यांना धक्का दिल्यानंतर येणाऱ्या क्रिया-प्रतिक्रिया विचारात घेऊन ग्रामदैवत सिद्धेश्वर देवस्थान आणि संगमेश्वर महाविद्यालयाशी संबंधित प्रकरणे उकरून काढून चौकशी लावून काडादी यांची आणखी कोंडी करण्याची तयारी आमदार देशमुख हे करू शकतात. दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सोलापूरची विमानसेवाही सुरू करण्यात पुढाकार घेतला जाऊ शकतो. विमानसेवा सुरू झाल्यास चिमणी प्रकरण थंड होऊन भाजपही संकटातून सहीसलामत बाहेर पडू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.