नंदुरबार : १९९६ पासून नंदुरबार विधानसभा मतदार संघावर कायम राखलेले वर्चस्व यापुढेही टिकवून ठेवण्यात आदिवासी विकासमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. विजयकुमार गावित यांच्या मार्गात विरोधकांपेक्षा मित्रपक्षांचाच अधिक अडथळा मानला जात आहे. मुलगी माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नंदुरबार मतदारसंघातील घटते मताधिक्य मंत्री गावित यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
नंदुरबार तालुक्यासह शहादा तालुक्यातील काही भाग मिळून नंदुरबार विधानसभा मतदारसंघ झाला आहे. या मतदारसंघावर डॉ. विजयकुमार गावितांचा कायम दबदबा राहिला आहे. अपक्ष आमदार म्हणून राजकीय कारकीर्द सुरू करणारे गावित यांची नंतर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते म्हणून ओळख झाली होती. परंतु, २०१४ मध्ये मुलगी डॉ. हिना गावित नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार म्हणून निवडून आल्यानंतर डॉ. विजयकुमार गावित हेदेखील भाजपमध्ये डेरेदाखल झाले. मतदारसंघच नव्हे तर, जिल्ह्यासह आजुबाजूच्या आदिवासी क्षेत्रावर स्वत:चा वेगळा प्रभाव राहिलेले गावित हे भाजपच्या पक्ष संघटनेपासून नेहमीच अलिप्त राहिले. त्यामुळे भाजपमध्ये जाऊनही संघटन आणि त्यांच्यात हवा तसा सुसंवाद निर्माणच झाला नाही. परंतु, गावित यांच्या ताकदीला भाजपची जोड मिळाल्यानेच मागील १० वर्षात भाजपने काँग्रेसचा अभेद्या गड समजल्या जाणाऱ्या नंदुरबारमध्ये जोरदार मुसंडी मारली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गावित परिवाराला प्रथमच पराभवाची चव चाखावी लागली. डॉ. हिना गावित सलग दोन वेळा खासदार राहिल्यानंतर तिसऱ्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागल्याने गावित परिवाराच्या राजकीय वजनाला धक्का बसला आहे.
हेही वाचा >>>‘SC, ST आरक्षणात वर्गीकरण नको’, अन्यथा ‘भारत बंद’ पेक्षाही मोठे आंदोलन करू; केंद्र सरकारला संघटनांचा इशारा
राज्यात भाजपसमवेत सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाने खुलेपणे लोकसभा निवडणुकीत नंदुरबार मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा केलेला प्रचार आणि भाजपमधील अनेकांनी मूग गिळून गप्प राहणे पसंत केल्याने डॉ. हिना गावित यांच्या पराभवानंतर आता विरोधकांच्या डॉ. विजयकुमार गावित यांना पराभूत करण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परंतु, काँग्रेसने अनेक वर्षात गावित यांच्याविरोधात सक्षम उमेदवार तयार न करणे, ही गावित यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे. शिंदे गटाचे नेते असलेल्या चंद्रकांत रघुवंशी याचे निकटवर्तीय असलेल्या एका बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या मालकाचे नाव गावित यांच्याविरोधात चर्चेत असले तरी त्यांचा जनसंपर्काचा अभाव आणि त्यांच्या कंपनीवर निकृष्ट कामांमुळे होणारे आरोप त्यांच्या विरोधातील मुद्दे ठरू शकतात.
हेही वाचा >>>माझा मतदारसंघ, ‘राज्यस्तरीय’ कार्यक्रमांची माझीच जबाबदारी, विविध महोत्सवांचा मंत्र्यांकडून पायंडा
अनेक वर्षे डॉ. गावित राष्ट्रवादीत असताना भाजपकडून त्यांच्या विरोधात लढणारे सुहास नटावदकर यांची कन्या समिधा यादेखील विधानसभेसाठी इच्छुक असल्याने आता हा मतदार संघ महाविकास आघाडीत कोणाला सुटतो, यावर बरेच काही अवलंबून आहे. आदिवासी विकास मंत्रालय कायमच ताब्यात राहिल्याने त्या माध्यमातून गावित हे मतदारसंघातील वाड्या-पाड्यांवर पोहोचले आहेत. इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर आदिवासी जनतेला नेमके काय हवे असते, याची त्यांना चांगलीच जाणीव झाली आहे. त्यामुळे भव्यदिव्य विकास कामे करून दाखविण्यापेक्षा दुभत्या जनावरांचे वाटप, विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य, भजनी मंडळांना साहित्य, इतकेच नव्हे तर, वाड्या-पाड्यांवरील संघांना क्रिकेट साहित्याचे वाटप अशा गोष्टींकडे त्यांनी अधिक लक्ष दिले आहे. त्यांची ही नेहमीची कला विरुध्द महाविकास आघाडीसह महायुतीतील विरोधकांची एकजूट यांच्यातच विधानसभा निवडणुकीत लढत होणार आहे.
घटते मताधिक्य
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील नंदुरबार आणि शिरपूर विधानसभा वगळता नुकत्याच झालेल्या निवडणुकीत डॉ. हिना गावित यांना कुठेही मताधिक्य मिळाले नाही. २०१९ मध्ये डॉ. विजयकुमार गावित यांचा बालेकिल्ला म्हटल्या जाणाऱ्या नंदुरबार विधानसभा मतदारसंघात हिना गावित यांना लोकसभा निवडणुकीत ७५ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. तेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत निम्म्यावर आले.