अकोला : विधानसभेच्या जिल्ह्यातील पाच मतदारसंघांमध्ये तुलबळ लढती होत आहे. अकोला पूर्व, मूर्तिजापूर, अकोट व बाळापूर मतदारसंघात तिरंगी सामने होतील. अकोला पश्चिममध्ये भाजपपुढे बंडखोरांनी मोठे आव्हान निर्माण केले. या ठिकाणी पंचरंगी लढत होऊ शकते. पाचही मतदारसंघात जातीय समीकरण व बंडखोरीमुळे होणारे मतविभाजन निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला जिल्हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या निवडणुकीत पाच पैकी चार ठिकाणी भाजप, तर एका ठिकाणी युतीमध्ये शिवसेना ठाकरे गटाची जागा निवडणून आली होती. पाच वर्षांमध्ये बरेच राजकीय समीकरण बदलले आहेत. या निवडणुकीत जिल्ह्यातील वर्चस्व कायम राखण्याचे भाजपचे लक्ष्य असेल. सलग २९ वर्षे भाजपचा झेंडा फडकणाऱ्या अकोला पश्चिममध्ये यंदा महायुतीपुढे बंडखोरीची डोकेदुखी वाढली. माजी नगराध्यक्ष हरीश आलिमचंदानी अपक्ष, तर प्रदेश पदाधिकारी डॉ. अशोक ओळंबे प्रहारकडून निवडणूक रिंगणात उतरले. त्यामुळे मतविभाजन होऊन त्याचा मोठा धक्का भाजपला बसण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा >>> Deoli Assembly Constituency : देवळीच्या जागेबाबत भाजप अधिक दक्ष

दुसरीकडे काँग्रेसने मोठा डाव टाकून वंचितला कोंडीत पकडले. काँग्रेसचे डॉ. झिशान हुसेन यांनी वंचितच्या एबी फॉर्मवर उमेदवारी दाखल केली, मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी माघार घेतली. त्यामुळे काँग्रेसला दिलासा मिळाला. शिवसेना ठाकरे गटाचे राजेश मिश्रा देखील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात असून त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपचेच नुकसान होणार असल्याचे बोलल्या जाते. अकोला पश्चिममध्ये भाजपचे विजय अग्रवाल, काँग्रेसचे साजिद खान पठाण, अपक्ष हरीश अलिमचंदानी, प्रहारचे डॉ.अशोक ओळंबे, अपक्ष राजेश मिश्रा यांच्यात पंचरंगी लढतीचा अंदाज आहे.

हेही वाचा >>> अमरावती : काँग्रेससमोर लोकसभा निवडणुकीतील मताधिक्‍य टिकविण्‍याचे आव्‍हान

शहर व ग्रामीण भाग जोडलेल्या अकोला पूर्व मतदारसंघात १० वर्षांपासून भाजपचे वर्चस्व आहे. अकोला पूर्वमध्ये भाजपचे रणधीर सावरकर, शिवसेना ठाकरे गटाचे गोपाल दातकर व वंचित आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने यांच्यात तिरंगी सामना होईल. मतदारसंघात जातीय राजकारण महत्त्वपूर्ण ठरेल. मूर्तिजापूर मतदारसंघात नाट्यमय घडामोडीनंतर शेवटच्या टप्प्यात हरीश पिंपळे यांना उमेदवारी मिळाली. या मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सम्राट डोंगरदिवे व वंचित आघाडीचे डॉ. सुगत वाघमारे यांच्यात सामना होत आहे. अकोट मतदारसंघामध्ये भाजपचे प्रकाश भारसाकळे, काँग्रेसचे महेश गणगणे व वंचित आघाडीचे दीपक बोडके यांच्यात लढत आहे. बाळापूर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे नितीन देशमुख, वंचित आघाडीचे नातिकोद्दीन खतीब व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांच्यात तुल्यबळ लढत होण्याचा अंदाज आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कृष्णा अंधारे यांनी बंडखोरी केल्याने मतविभाजन होणार आहे. त्याचा फटका मविआसह महायुतीला देखील बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चार मतदारसंघात ‘वंचित फॅक्टर’

जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला मानणारा मोठा वर्ग आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अकोला पूर्व, मूर्तिजापूर, बाळापूर व अकोट मतदारसंघामध्ये भाजप विरूद्ध वंचित अशीच लढत झाली होती. मूर्तिजापूरमध्ये तर अवघ्या एक हजार ९१० मतांनी वंचितला पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदा देखील या चारही मतदारसंघात ‘वंचित फॅक्टर’ महत्त्वाचा ठरेल. अकोला पश्चिम मतदारसंघात वंचित कुठल्या उमेदवाराला पाठिंबा देणार, याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 tought contest in five assembly constituencies in akola district print politics news zws