नागपूर: सरकारी उपक्रमांचे उद्दिष्ट कितीही उदात्त असले, तरी ते राजकीय कार्यक्रमांशी जोडले गेले की, त्यांच्या निष्पक्षतेवर आणि प्रभावीतेवर प्रश्न निर्माण होतो. नागपुरात १८ सप्टेबरला आयोजित ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम आणि दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नागपुरात होणारे चिंतन शिबीर हा योगायोग आहे की शिबिरासाठी आयोग नागपूरच्या दारी आला आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्यात महिला आयोग महिलांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि तक्रारींच्या निवारणासाठी कार्य करतो. अनेक महिलांना मुंबईतील आयोगाच्या कार्यालयात तक्रार करणे शक्य नसल्याने आयोगाने “महिला आयोग आपल्या दारी” उपक्रम सुरू केला आहे. याच उपक्रमांतर्गत १८ सप्टेबरला नागपूर येथे सुनावणी आयोजित करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी १९ सप्टेबरला नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) चिंतन शिबीर होणार आहे.महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आहेत. त्यामुळे त्यांना शिबिरासाठी नागपूरमध्ये उपस्थित राहता यावे म्हणूनच उपक्रमाची तारीख शिबिराच्या एक दिवसा आधी ठरवण्यात आली, का असा सवाल राजकीय वर्तुळातून केला जात आहे.
मागील काही दिवसांपासून सरकारी प्रसिद्धी माध्यमांमधून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या कार्यक्रमाची भरपूर प्रसिद्धी करीत आहे. महिलांपर्यंत आयोग पोहोचतो आहे, असे चित्र या माध्यमातून रंगवले जात आहे. जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी होणार, यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, जनसुनावणीला पोलिस, जिल्हा प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित राहणार असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येईल.
त्यामुळे तक्रारकर्त्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम होईल, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. असे असले तरी मात्र प्रत्यक्षात यामागे पक्षाचे राजकीय आयोजन आणि त्यातील उपस्थितीचा हेतू अधिक स्पष्ट होतो. , सार्वजनिक हिताच्या अनुषंगाने किवा त्या नावाने जाहीर केले गेलेले उपक्रम अनेकदा राजकीय वेळापत्रकांशी जोडलेले असतात. या प्रकरणात, महिला आयोगाचा उपक्रम एखाद्या सामाजिक उद्दिष्टासाठी असणे अपेक्षित होते. पण दुसऱ्या दिवशीच्या चिंतन शिबिरामुळे यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
भुजबळही मैदानात
शिबिराच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते १९ तारखेला नागपुरात दाखल होतील. त्यात काही मंत्रीही आहेत. त्यांच्या खात्याच्याही आढावा बैठका यानिमित्ताने होतील. इतर खासगी कार्यक्रमातही ते सहभागी होण्याची शक्यता आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी १८ तारखेला ओबीसी मेळावा आयोजित केला आहे. त्याचे पडसाद चिंतन शिबिरात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच राष्ट्रवादीचे चिंतन शिबीर सध्या तरी चर्चेत आहे.