नागपूर : भारतीय जनता पक्षाची सदस्य नोंदणी मोहिम सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात प्रदेश भाजपने केलेली नोंदणी ( १ कोटी ५१ लाख) ही फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष असतानाच्या वर्षापेक्षा अधिक असल्याचे खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच भाषणात सांगितले. याचा दुसरा अर्थ सदस्य नोंदणीत फडणवीसांपेक्षा बावनकुळे सरस असा होतो. त्यामुळेच बावनकुळेंच्या वक्तव्याच चर्चा सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजप हा देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे, असे.या पक्षाचे नेते सार्वजनिक कार्यक्रमात सांगत असतात. यासाठी सदस्य नोंदणीचे कोटींचे आकडे सांगितले जातात. सध्या पक्षाकडून सदस्य नोंदणीची मोहिम युद्ध पातळीवर राबवणे सुरू असल्याने त्याची चर्चा होणे अपेक्षितच आहे. त्यानुसार ती भाजपच्या स्थापना दिनी नागपुरात झालेल्या पक्षाच्या शहर कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमातही झाली..यावेळी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गकडकरी उपस्थित होते.

पक्षाचा स्थापना दिन आणि नव्या कार्यालयाचे भूमिपूजन हा योग साधून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सदस्य नोंदणीचा लेखाजोखा सादर केला. महाराष्ट्रात यंदा १ कोटी ५१ लाख सदस्य नोंदणी झाली. फडणवीस प्रदेशाध्यक्ष (२०१३-२०१५)असताना ती ७७ लाख झाली होती. याकडे बावनकुळे यांनी लक्ष वेधले. ही आकडेवारी सदस्य नोंदणीत ते फडणवीस यांच्यापेक्षा बावनकुळे सरस ठरल्याचे दर्शवते.त्यामुळे ही बाब पक्षात चर्चेचा विषय ठरली.

कार्यक्रमाला फडणवीसही उपस्थित होते. पण ते त्यांचे भाषण झाल्यावर लगेच निघून गेले होते. त्यामुळे त्यांना बावनकुळेचे भाषण ऐकण्याची संधी त्यांना मिळाली नाही. त्यामुळे त्यांची त्यावरची प्रतिक्रिया येऊ शकली नाही..मात्र कार्यकर्ते आपआपल्या परीने बावनकुळेंच्या वक्तव्याचा अर्थ काढू लागले आहेत.

फडणवीस यांचा प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळ आणि आत्ताची स्थिती यात अंतर असल्याचे कार्यकर्ते म्हणतात.२०१३ मध्ये फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाले त्यावेळी महाराष्ट्रात आणि केंद्रातही भाजपची सत्ता नव्हती, फडणवीस कुठल्याही सरकारी पदावर नव्हते. तरीही राज्यात सत्ता आणण्याचे काम फडणवीस यांनी केले. बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाले (ऑगस्ट २०२२) त्यावेळी पक्ष महाराष्ट्रात सत्तेत होता. केंद्रातही सत्ता होती. आता बावनकुळे स्वत: कॅबिनेट मंत्री आहेत. केंद्रातील सत्तेचे बळ आहे. याचीही मदत सदस्य नोंदणीत भाजपला झाली, असा दावा केला जात आहे.

१ कोटी ५१ लाख सदस्यांसोबत थेट संवाद

राज्यात १ कोटी ५१ लाख सदस्य झाले आहेत. त्यांच्याशी थेट संवाद साधता येईल, पक्षाचा एक संदेश तत्काळ कार्यकर्त्यांपर्यत पोहचेल, कार्यकर्त्यांची नावे, त्यांचे मोबाईल क्रमांक पक्ष कार्यालयाकडे नोंदवण्यात आले आहेत. त्यांना ओळखपत्र देण्यात आले आहे, असा दावाही बावनकुळे यांनी या कार्यक्रमात केला

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Member registration in state during tenure of devendra fadnavis era and now with bjp president chandrashekhar bawankule print politics news asj